Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मतदानाबाबत जागृतीसाठी २८ मार्चला ‘युथ मार्च फॉर चेंज’
नागपूर, १४ मार्च / प्रतिनिधी

तरुणांच्या मनात मतदान आणि नकारात्मक मतदानाच्या अधिकाराबाबत जनजागृती करण्यासाठी ‘युथ मार्च फॉर चेंज’ २८ मार्चला आयोजित केलाअसल्याची माहिती युवक काँग्रेसचे माजी

 

सरचिटणीस आशीष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आशीष देशमुख म्हणाले, कस्तुरचंद पार्कमधून २८ मार्चला सकाळी ८ वाजता हा लाँगमार्चनिघेल व यशवंत स्टेडियमवर त्याचा समारोप होईल. यंदा नवमतदारांची संख्या वाढली असून त्यांच्या मनात निवडणूक प्रक्रियेबद्दल जागृती निर्माण व्हावी, त्यांना त्यांच्या मताधिकाराच्या शक्तीचा प्रत्यय यावा म्हणून हा लाँगमार्च काढला जाणार आहे. मतदान व नकारात्मक मतदानाबाबत माहिती दिली जाणार आहे. या निवडणुकीत लायक उमेदवारच जनतेने निवडायला हवा. तो किमान पदवीधर असावा. ३० ते ३५ वयोगटाचा असावा. ५५ ते ७० वयोगटातील उमेदवारांना शक्यतो दुसरी पसंती द्यावी. या वयाच्या उमेदवारांच्या अनुभवाला निश्चित महत्व द्यावे. ७० पेक्षा अधिक वयाचा उमेदवार अजूनही उमेदीने काम करीत असेल आणि त्याचा कार्याविषयक ‘ट्रॅक रेकॉर्ड’ उत्तम असेल तरच त्याला पसंती दर्शवावी. भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नसेल अशा सामाजिक जीवन स्वच्छ असलेल्या उमेदवाराला पसंती दर्शवावी. उमेदवार दलबदलू नसावा. तो दूरदृष्टीचा, सभ्य व सज्जन असावा. निवडणूक नियमानुसार मत न नोंदवण्याचा अधिकारही जनतेला आहे. पसंतीचा उमेदवार नसेल तर मतदान अधिकाऱ्याला सांगून १७(अ) फॉर्म भरून आणि रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करून नकारात्मक मतदान नोंदवता येते. एखाद्या मतदारसंघात नकारात्मक मतदानाची संख्या जास्त असल्यास मतदान प्रक्रिया रद्द होऊन ती नव्याने घ्यावी लागते. नवमतदारांमध्ये ही जागृती मोहीम मोठय़ा प्रमाणावर घेतली जाणार आहे, असे आशीष देशमुख यांनी सांगितले.
या जनजागृती मोहिमेचा काँग्रेस पक्षावर कुठलाच विपरीत परिणाम होणार नाही, कारण तो जनसामान्यात रुजलेला पक्ष असल्याचे आशीष देशमुख यांनी स्पष्ट केले. ही लोकसभा निवडणूक लढवण्याची आपली तयारी आहे. पक्षाकडे उमेदवारी देण्याची विनंती केली असून मुलाखत झालेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.