Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

प्रभाकर पांडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार
नागपूर, १४ मार्च / प्रतिनिधी

प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी ज्येष्ठांकरिता अमृतमहोत्सवासारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले तर कुटुंबात एकोपा राहण्यास मदत होईल व दोन पिढय़ातील अंतर कमी होईल, असे मत अन्न व

 

नागरी पुरवठा मंत्री रमेश बंग यांनी व्यक्त केले.
वर्धमाननगरातील श्री लोहाणा सेवा मंडळ लॉन येथे ग्राहक पंचायतचे ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन पांडे यांचे वडील प्रभाकर पांडे यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बंग बोलत होते. याप्रसंगी रमेश बंग, द्वारकाप्रसाद काकाणी यांच्या हस्ते प्रभाकर व कांताबाई पांडे यांचा शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ पोफळी, अशोक त्रिवेदी, पु.प्र. चन्न्ो, निलेश दुबे, अशोक बाभुळकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यासारखे कार्यक्रम आयोजित केल्यास ज्येष्ठांची जीवन जगण्याची इच्छा बळावते, तसेच आपली काळजी घेणारे कुणीतरी आहे, याची जाणीव निर्माण होते. दुसऱ्या पिढीतील नागरिकांनाही पितृ-मातृ ऋण फेडल्याचे समाधान मिळते. पर्यायाने कुटुंबात एकता निर्माण होते. कुटुंब आणि पर्यायाने समाजाची प्रगती होते, असेही बंग यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन विनायक इंगळे यांनी केले. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष गजानन पांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास ग्राहक पंचायतचे पदाधिकारी कार्यकर्ते व पांडे कुटुंबातील सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सर्वानीच प्रभाकर व कांताबाई पांडे यांना दीर्घायुरारोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.