Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

भिंगाआडून टिपलेल्या चिखली झोपडपट्टीवासीयांच्या व्यथा..
नागपूर, १४ मार्च/ प्रतिनिधी

बेचिराख झालेल्या झोपडय़ांकडे विषण्ण मनाने बघणारे हतबल झोपडपट्टीधारक.. आगीत भस्म झालेल्या वस्तुंचा शोध घेणाऱ्या नजरा.. डोक्यावरील निवारा आणि अन्नधान्य जळून खाक झाल्याने

 

पोटात काय ढकलावे, अशा आशयाचे प्रश्नार्थक चेहरे.. उघडय़ानागडय़ा चिमुकल्यांचे खेळणे, बागडणे.. संपूर्ण परिसर भुईसपाट झाल्याची कल्पनाही नसलेले बाळबोध मन.. अशा चिखली झोपडपट्टीवासीयांच्या जीवनातील विविध पैलूंचे दर्शन छायाचित्रकार संगीता महाजन यांच्या छायाचित्र प्रदर्शनात घडते.
कळमना मार्केट यार्डासमोरील चिखली झोपडपट्टीला २२ फेब्रुवारीला मध्यरात्रीनंतर भीषण आग लागून ४६ झोपडय़ा भक्ष्यस्थानी पडल्या. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला. आगीच्या तांडवाने उघडय़ावर पडलेल्या मजूर कुटुंबीयांची व्यथा मांडण्याचे कर्तव्य या छायाचित्र प्रदर्शनाने बजावले आहे. याची साक्ष व्हेरायटी चौकातून येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या प्रतिक्रियेतून व्यक्त होत होती.
ही छायाचित्रे नागपूर लगतच्या चिखली झोपडपट्टीला लागलेल्या आगीचीच असावीत का, असे बघणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील भाव होते. कुणी ही छायाचित्रे बिहार मधील असावीत असेही म्हणायचा, परंतु, क्षणचित्रांचे स्थळ कळल्यावर, सारा समाज संवेदना हरवून बसला की काय, असा प्रश्न बघणाऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.
रात्री चिखली झोपडपट्टीला आग लागली हे समजले. सकाळी वर्तमानपत्रात आगीची भीषणता कळली. आणि लागलीच म्हणजे सकाळी आठ वाजता घटनास्थळी पोहोचले. येथील मजुरांचे झोपडी वजा घर नेस्तनाबूत झाले होते. कपडेलत्ते, अन्नधान्य आगीत स्वाहा झाले होते. हताश, विषण्ण आणि आता काय या चिंतेत नागरिक होते. हे सारे आपण कॅमेऱ्याने टिपून घेतले. मनाला वेदना होत होत्या. परंतु, व्हायचे ते होऊन गेले होते. आपले कर्तव्य आता समाजासमोर वस्तुस्थिती आणण्याचे आहे, असे मन वारंवार आठवण करून देत होते, असे छायाचित्रकार संगीता महाजन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
या प्रदर्शनातील छायाचित्र सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेदरम्यानच्या घडामोडीवरील आहेत. ही सुमारे ७० छायाचित्रे आहेत, अशीही माहिती महाजन यांनी दिली.
झोपडय़ांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. प्रत्यक्षात अशी आग लागते की लावली जाते, असा प्रश्न पडतो, कारण कोणी कितीही रक्कम दिली तरी, स्वत:च्या झोपडीला, घराला आग लावण्यास कोणीही तयार होणार नाही. झोपडय़ांना आग लावणारे हात ‘वेगळे’ आहेत, अशी शंका उपस्थित करून अशा घटनांची उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
प्रदर्शनातील एकेक छायाचित्र आगीत सर्वस्व गमावून बसलेल्यांचा वेदना तेवढय़ाच ताकदीनिशी दाखवणारे आहे. ही सारी छायाचित्रे संगीता महाजन यांचा समाजिक दृष्टीकेण आणि कला यांचा सुरेख मिलाफ आहे. ही सारी छायाचित्रे कोणत्याही संवेदनशील मनाला भिडल्याशिवाय राहात नाहीत.