Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

विद्वत परिषदेत जयस्वालांच्या प्रश्नांमुळे सदस्य आक्रमक
नागपूर, १४ मार्च/ प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आजच्या विद्वत् परिषदेच्या बैठकीत आमदार आशीष जयस्वाल यांच्या प्रश्नांमुळे सदस्य आक्रमक झाले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या

 

विधिसभेत जयस्वाल यांनी स्थानिक चौकशी समितीची (एलईसी) चुकीची कार्यपद्धत, महाविद्यालयांतील असुविधा, तेथे गुणवत्ता नसणे या मुद्दय़ावर वादळ उठवले होते. त्यामुळे त्यांचे तीनही प्रश्न आजच्या विधिसभेपर्यंत राखून ठेवण्यात आले होते. त्यांचे ते तीन प्रश्न व येत्या २१ व २२ मार्चच्या विधिसभेसाठी पुन्हा विचारलेले ३ प्रश्न, विद्यापीठाच्या विरोधात त्यांनी विधानसभेत मांडलेला हक्कभंगाचा ठराव या बाबींवर आजच्या विद्वत परिषदेत घमासान झाले.
विधिसभा सदस्यांनी आक्रमक होऊन, जयस्वाल कुणाविरोधात बोलतात, याचे काही पुरावे सादर केले का, असा प्रश्न सदस्यांनी (अधिष्ठाता) उपस्थित केला. महाविद्यालयांच्या विरोधात बोलून जयस्वाल आमचा अपमान करीत असल्याचे काही सदस्यांचे म्हणणे होते. यावर चर्चा होऊन एलईसीच्या अहवालासंदर्भात दर तीन महिन्यांनी बैठक होईल, त्यात अधिष्ठाता त्या अहवालांची छाननी करून अंतिम मंजुरी देतील, असे ठरले. नॅकच्या धरतीवर विद्यापीठस्तरावर समिती स्थापन करून ती संलग्नित महाविद्यालयांची तपासणी करेल आणि नवीन अभ्यासक्रमाचे प्रारूप तयार करून विद्याशाखेच्या अधिष्ठात्यांनी ते ३० एप्रिलपर्यंत अभ्यासमंडळाकडे सुपूर्द करणे यावरही सदस्य आक्रमक झाले होते. अभ्यासक्रम बदलण्याची प्रक्रिया सुरू असताना सरकारने याचा अध्यादेश का काढावा, असा काहींचा आक्षेप होता. तसेच महाविद्यालयाने संलग्निकरण मिळाल्याची तारीख, विद्यार्थी प्रवेश क्षमता, प्रवेश शुल्क याविषयी माहिती फलकावर माहिती देणे सक्तीचे करण्यात आले आहे.