Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सामाजिक विकासासाठी वैचारिक सक्षमीकरण आवश्यक -डॉ. गुंडावार
नागपूर, १४ मार्च / प्रतिनिधी

स्त्री आणि पुरुष संसाररूपी रथाची दोन चाके असून एक चाक जरी क्षमतेने कमी पडले तरी कौटुंबिक विकासात अडथळे निर्माण होतात. तेव्हा दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन कौटुंबिक कार्य पार पाडावे, असे मत नागपूर विभागाचे आरोग्य सहायक संचालक (वैद्यकीय) डॉ. ए.पी.

 

गुंडावार यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात ‘स्त्रिया व मुलींवर होणारे अत्याचार संपवण्यासाठी स्त्रिया व पुरुषांनी संघटित होण्याची गरज’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य संस्थेचे प्राचार्य डॉ. मनोहर पवार, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. प्रवीरकुमार दास, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी ज्योती कन्नाके, डॉ. नूतन देव, सहायक संचालक (हिवताप व हत्तीरोग) डॉ. आर.डी. लांजेवार, पोषाहार अधिकारी डॉ. एम.सी. सहारे प्रामुख्याने उपस्थित होते.
मनोरुग्ण तज्ज्ञ म्हणून माझ्याकडे येणारे जास्तीत जास्त रुग्ण हे कौटुंबिक कलहामुळे ग्रासलेले दिसून येतात. यामुळे प्रत्येक स्त्री-पुरुषांनी एकमेकांना समजून घेऊन कौटुंबिक व्यवहार केल्यास बऱ्याच प्रमाणात महिलांना मिळणारी दुय्यम वागणूक नाहीशी करण्यात यश मिळेल, अशी आशा डॉ. मनोहर पवार यांनी व्यक्त केली.
कुटुंबातील स्त्रिया समाजामध्ये भूषणावह भूमिका बजावत असताना मात्र दुसरीकडे उच्चशिक्षित महिलांचा धिक्कार केला जात असल्याचे ज्योती कन्नाके म्हणाल्या. महिलांना सर्वागीण विकास साधायचा असेल तर त्यांना शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, निर्भयता आणि आत्मसन्मान या पंचसूत्रीचा अवलंब केला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. डॉ. नूतन देव म्हणाल्या, दरहजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. स्त्री भृण हत्येचे प्रमाण असेच वाढत राहिले तर समाजात स्त्रियांचे प्रमाण पुन्हा कमी होईल आणि समाजावर त्याचे दुष्परिणाम होतील.
डॉ. प्रवीरकुमार दास यांनी प्रास्ताविकातून महिलांवर अत्याचार होण्याची कारणे सांगून ते कमी होण्यासाठी महिलांना समानतेची वागणूक देणे महत्वाचे आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्त्रियांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी लिहिलेल्या ‘पगडंडी’ या कविता संग्रहातील ‘रोज मर्रा की बाते’ आणि ‘चिंगारी’ या दोन कविता वाचून दाखवल्या. संचालन करुण कांबळे यांनी केले. देविलाल भैसारे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.