Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘हिंदू संस्कृतीचा बागुलबुवा माजवण्यात तथ्य नाही’
‘हिंदू मानस ओळखा’च्या प्रकाशन सोहोळ्यात वक्तयांचे मत
नागपूर, १४ मार्च/ प्रतिनिधी

‘दलित व्हाईस’ या नियतकालिकाचे संपादक व्ही.टी. राजशेखर यांच्या ‘हिंदू मानस ओळखा’ या पुस्तकाचे प्रकाशन धनवटे नॅशनल कॉलेजच्या बिझनेस मॅनेजमेन्ट कॉन्फरन्स हॉलमध्ये थाटात पार

 

पडले. सर्वच वक्तयांच्या भाषणाचा रोख ब्राम्हण आणि ब्राम्हणवादावर केंद्रित झालेला होता.
सतीप्रथा, कन्यादान, देवदासी, वंशाचा दिवा आणि त्यामुळे होणाऱ्या कन्या भ्रूण हत्या या प्रथा वर्षांनुवर्षे हिंदू धर्माने जोपासल्या असताना हिंदू संस्कृतीचा बागुलबुवा माजवण्यात तथ्य नसल्याचे स्त्री अत्याचार विरोधी परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सीमा साखरे यावेळी म्हणाल्या.
सीमा साखरे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. बहुजन संघर्ष समिती, मागासवर्गीय डाक कर्मचारी संघटना व राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
वैद्यकीय महाविद्यालयातील कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. के.एम. कांबळे म्हणाले, हिंदू मानसिकतेमुळे दलितांचे, देशाचे किंवा महिलांचेच नव्हे तर, ब्राम्हणांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. रामानुज या अतिशय विद्वान ब्राम्हणाने विदेशात सोवळे नेसून आंघोळ करण्याच्या हट्टापायी न्युमोनियाने मृत्यू ओढवून घेतला. आनंदीबाई जोशी या पहिल्या स्त्री डॉक्टरांना न्यूमोनिया झाला असताना त्यांनी अनेकदा त्यांच्या कुटुंबियांना डॉक्टरला घेऊन येण्याची विनंती केली होती. मात्र, परपुरुषाला शरिराला हात न लावू देण्याच्या मानसिकतेपायी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना मृत्यूच्या खाईत लोटले. डॉ. राजेंद्रप्रसाद परदेशात जाताना जहाजावर पाण्याचे भरलेले हंडे घेऊन गेले. कस्तुरबा गांधींना न्युमोनिया झाला असताना त्यांना अ‍ॅंटिबायोटिक्स घेण्यासाठी गांधीजींनी मज्जाव केला होता. कारण, त्यामुळे पोटातील बॅक्टेरिया मरतील, अशी त्यांची समजूत होती. मात्र, गांधीजींनी स्वत: अपेंडिसायटिस झाला असताना औषधे घेतली होती. कस्तुरबांचा या आजारातच मृत्यू झाला. केवळ हिंदूंच्या धार्मिक खुळांपायी कित्येत शतके हा देश प्रगती करू शकला नाही.
इतिहासाचे अभ्यासक प्रा. मा.म. देशमुखांनी बदलत्या वातावरणात भेकड झालेल्या बहुजन समाजावर आसूड ओढले. बहुजनांना परिवर्तन हवे आहे. सेवा नको. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर त्यांच्यावर कर्ज घेण्याची वेळच येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले. नागेश चौधरी यांचेही यावेळी भाषण झाले. व्ही.टी. राजशेखर यांनी भाषणात प्रस्थापितांची मानसिकता, त्यांचा दहशतवाद, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकरांविषयी आलेला विचित्र अनुभव यांचा सविस्तर उहापोह केला.