Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आर्थिक दहशतवाद अधिक घातक -गिरीश कुबेर
नागपूर, १४ मार्च / प्रतिनिधी

इस्लामी दहशतवादापेक्षा साम्राज्यवादी देशांनी घडवून आणलेल्या आर्थिक दहशतवादाचा जगाला खरा धोका असून त्यापासून सावध राहण्याची गरज आहे, असा इशारा इकॉनॉमिक टाईम्सचे ज्येष्ठ

 

पत्रकार गिरीश कुबेर यांनी दिला. राजहंस प्रकाशनचे मंथन व्यासपीठ आणि सुधाकर रथकंठीवार मित्र परिवारातर्फे ‘दहशतवाद’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते.
लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक भास्करचे संपादक प्रकाश दुबे हे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे, निवृत्त ग्रुप कॅप्टन एस.व्ही. फाटक आणि निवृत्त कर्नल सुनील देशपांडे हे उपस्थित होते.
गिरीश कुबेर यांनी यावेळी ‘आर्थिक दहशतवाद’ या विषयावर व्याख्यान देताना जागतिक राजकीय संदर्भ उलगडून दाखवत दहशतवादाचा छुपा चेहरा उघडकीस आणला. व्याख्यानाच्या प्रारंभीच कुबेर यांनी, जगातील एकमेव महासत्तेचे तेव्हाचे प्रमुख अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांना इराकी पत्रकाराने जोडा मारण्याच्या प्रसंगाबद्दल आनंद व्यक्त करून अमेरिकेबद्दलची चीड व्यक्त केली.
भारत एक महासत्ता होऊ पाहणारा देश असला तरी अमेरिकेचे साम्राज्यवादी पाश दहशतवादाचा एखाद्या उत्पादनासारखा वापर करून घेत आहेत. आम्ही ज्या धार्मिक दहशतवादाची चिंता करतो तो खरा दहशतवादच नाही तर, साम्राज्यवाद्यांनी बाजारपेठा ताब्यात घेण्यासाठी ठरवून चालवलेल्या क्रूर आर्थिक दहशतवादाची खरी चिंता करण्याची गरज आहे. आम्ही त्याचे बळी ठरलो आहोत पण, भारतातील पारंपरिक, सांस्कृतिक वातावरणामुळे हा धोका दुर्लक्षित राहिला आहे, असे सांगताना कुबेर म्हणाले की, अमेरिकेसोबत अणुकरार करून भारताने अमेरिकेला दहा लाख कोटींचा व्यवसाय दिला आहे. यातील एक लाख कोटी दरवर्षी भारताला त्यांना द्यायचे आहेत. हा आर्थिक ताकदीचा जगद्व्यापी खेळ असून या खेळात आम्ही भारतीय प्याद्यापेक्षाही खालच्या पातळीचे आहोत. आम्ही महासत्तेची स्वप्ने पाहतो पण, साम्राज्यवाद्यांच्या ताकदीचा अंदाज आम्हाला आलेला नाही. भारताचे यंदाचे करसंकलन दोन लाख चाळीस हजार कोटींचे आहे तर, पुढच्या वर्षीचे साडेतीन लाख कोटी इतके अपेक्षित आहे. दुसरीकडे केवळ एका अमेरिकन कंपनीचा वर्षांचा नफा अडीच लाख कोटींपेक्षा अधिक आहे. जगात उत्पादित होणाऱ्या आठ लाख चाळीस हजार कोटी बॅरल तेलापैकी २६ टक्के तेलाचा वापर एकटी अमेरिका करते. याचा अर्थ, जगातील उर्वरित देश ७४ टक्के तेलाचा वापर करतात. यासाठी अमेरिका तेल उत्पादक राष्ट्रांना मुठीत ठेवते आणि अन्य कोणत्याही देशाला तेथून तेल घेण्याची परवानगी नसते. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यानंतर तीन कंपन्यांसोबत अमेरिकेने ४२ हजार डॉलर्सचे करार केले. हा पैसा अरब राष्ट्रांतील तेल विहिरींवर ताबा मिळवण्यासाठी वापरला गेला. याच राजकारणासाठी अमेरिकेने तालिबान्यांना मजबूत करून मोठा खेळ केला. तोच तालिबान आज भस्मासूर बनून उलटला आहे. दहशतवादाला कठोर उत्तर देऊन भारतीयांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या इस्रायलचाही कुबेर यांनी यावेळी उल्लेख केला.
इस्रायलबद्दल आज काही लोक सहानुभूती दाखवत आहेत पण, हमास या दहशतवादी संघटनेला जन्म देणारे तेच आहेत. गेल्या दहा वर्षांतले अमेरिका व त्यांच्या कंपन्यांचे राजकारण लक्षात घेतले तर दहशतवाद हे एक खेळणे म्हणून वापरले जात असून त्यातून जन्माला आलेल्या अनेक घटना म्हणजे ठरवून केलेला प्रकार असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. हा एक कादंबरीचा विषय होऊ शकेल, इतका रोचक आहे पण, यासंबंधीचे पुरावेच आता उपलब्ध झाले असून त्याची सत्यता पटते. अनेक अमेरिकन कंपन्यांचे पदाधिकारी हे अमेरिकन प्रशासनातही आहेत. मीडियासुद्धा ज्यू लॉबीचा बटीक असून त्याचाही या आर्थिक राजकारणात मोठा सहभाग आहे. या बळावर बाजारपेठा ताब्यात घेणे त्यांना सोपे झाले आहे. त्यासाठी माणसांचे बळी घेणे ही क्षुल्लक बाब ठरली आहे. पैशाच्या बळावर गरीब व विकसनशील देशांवर वर्चस्व गाजवणे, त्यांना आपसात लढवत ठेवून लुबाडणे, त्यासाठी हिंसाचाराला प्रोत्साहन व मदत करणे राहणे, असे प्रकार ठरवून केले जात आहेत. त्यामुळे इस्लामी दहशतवादापेक्षाही ऊर्जा क्षेत्रातील राजकारण हा खरा आर्थिक दहशतवाद असून आम्ही त्यांचे खेळणे आहोत, असे सांगून कुबेर यांनी असंख्य उदाहरणांद्वारे विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली.
प्रारंभी विशिष्ठ सेवा पदकप्राप्त निवृत्त कर्नल सुनील वासुदेवराव देशपांडे आणि वायुसेना पदकप्राप्त निवृत्त ग्रुप कॅप्टन एस.व्ही. फाटक यांचा निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गिरीश कुबेर यांच्या ‘अधर्मयुद्ध’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले. स्वागत दीप्ती रथकंठीवार व प्रशांत रथकंठीवार यांनी केले. कार्यक्रमाला विंग कमांडर अशोक मोटे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. आशा सावदेकर, मुकुंद काशिकर यांच्यासह लष्करातील अधिकारी, जवान आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.