Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

युवकांनी शिवचरित्राचा अभ्यास करून देशात परिवर्तन घडवावे -शिवकथाकार
नागपूर, १४ मार्च / प्रतिनिधी

शिवचरित्रातील गनिमी काव्याचा अभ्यास करून दहशतवादी आपल्या देशात हल्ले करीत असताना आपण मात्र त्यांच्यासमोर हतबल झालो असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे युवकांनी शिवछत्रपतींचा आदर्श समोर ठेवून आणि शिवचरित्राचा अभ्यास करून देशात परिवर्तन घडवून आणण्याचा

 

संकल्प करावा, असे आवाहन शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी केले.
शिवचरित्राने प्रेरित होऊन सहा वर्षांंपूर्वी स्थापन झालेल्या ‘रणशिंग’ या संस्थेतर्फे दिला जाणारा दिवं. किशोर माटेगावकर व अनिल कुळकर्णी स्मृती शिवगौरव पुरस्कार सांगलीचे तरुण इतिहास संशोधक व अभ्यासक प्रवीण भोसले यांना शिवकथाकार विजयराव देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख पाच हजार रुपये, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. तात्या टोपे नगरातील गणेश मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला उद्योजक प्रभाकरराव मुंडले व तात्या टोपे नगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश मोहरील उपस्थित होते. तात्या टोपे नगर आणि ‘रणशिंग’ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रवीण भोसले या युवकाने दुचाकीवर लाखो मैल प्रवास करून शिवदुर्गांचा अभ्यास केल्यामुळे त्यांना शिवाजी महाराज जवळून कळले आहे. इतिहासाचा अभ्यास करताना अनेक किल्ल्यांचा अभ्यास केला. त्याच्याशी एकरूप झाल्यावर शिवचरित्र थोडे फार कळायला लागले होते. आज राज्यातील अनेक किल्ल्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. त्या किल्ल्यांचा इंग्रजांनी धसका घेतला होता. १८५७ किल्ले नेस्तनाबूत करताना ते त्यावेळच्या राजकर्त्यांंनी शाबूत ठेवले पण, आज मात्र किल्ल्यांची दुर्दशा झाली असल्याचे चित्र दिसते. त्याचा जिर्णोध्दार युवकांनी करायचा आहे, असेही विजयराव देशमुख म्हणाले.
यावेळी प्रभाकरराव मुंडले म्हणाले, संस्थेने प्रवीण भोसले या तरुणाला शिवगौरव पुरस्कार दिल्यामुळे अन्य तरुणांना यापासून प्रेरणा मिळेल. शिवाजींचे कार्य तरुण पिढीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. रायगडला जीजामातेची समाधी असून त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. राज्यकर्त्यांनी अनेक महापुरुषांचे पुतळे व स्मारके बांधली आहेत पण, त्यांची अवस्था अतिशय वाईट असल्याचे चित्र दिसते आहे. राज्यकर्त्यांंना सुधारावयाचे असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन प्रभाकर मुंडले यांनी केले.
पुरस्कारप्राप्त प्रवीण भोसले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, लाखो मैल प्रवास करून शिवाजी महाराजांचे किल्ले आणि अनेक महापुरुषांच्या समाधीस्थळांची माहिती जाणून घेतली. इतिहास हा आवडीचा विषय असल्यामुळे मेहनत करताना कुठेही त्रास झाला नाही. ‘रणशिंग’ संस्थेने सन्मान केल्यामुळे जबाबदारी वाढली आहे आणि अधिक काम करण्याची प्रेरणा मिळाली.
पुरस्कार समारंभानंतर ‘निश्चयाचा महामेरु’ हा शिवगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात सारंग जोशी, अमर कुळकर्णी, सुधीर ठोसर, सायली कुळकर्णी, रसिका चाटी यांनी गीते सादर केली. कार्यक्रमाचे संचालन मनोहर ढोक यांनी तर, प्रास्ताविक प्रफुल्ल माटेगावकर यांनी केले. अमर कुळकर्णी यांनी आभार मानले.