Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

दलम कमांडर चिक्कूचा अनेक गुन्ह्य़ात सहभाग
गडचिरोली, १४ मार्च / वार्ताहर

धानोरा तालुक्यातील गोडलवाहीच्या जंगलात शुक्रवारी सकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा प्लाटून दलम कमांडर चिक्कू ऊर्फ मल्लेश ऊर्फ, कुल्लू ऊर्फ महारू राजू मुडयामी (३३) याचा अनेक गुन्ह्य़ात सहभाग होता. ५० पेक्षाही जास्त प्रकरणात तो

 

पोलिसांना हवा होता, अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली.
चिक्कू हा भामरागड तालुक्यातील मर्दहूर येथील रहिवासी होता. १९९९ मध्ये तो भामरागड दलममध्ये दाखल झाला. त्यानंतर २००१ मध्ये नक्षलवाद्यांच्या अ‍ॅक्शन टीममध्ये त्याला दाखल करून घेण्यात आले. २००४ पर्यंत तो अ‍ॅक्शन टीममध्ये होता. २००४ मध्ये गट्टा दलमचा उपकमांडर म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. दोन वर्षे त्याने गट्टा दलमचा उपकमांडर म्हणून कामगिरी बजावली. त्यानंतर २००६ पासून तो प्लाटून दलम क्रमांक १८ चा कमांडर म्हणून काम सांभाळीत होता. तो अत्यंत जहाल नक्षलवादी होता. त्याच्यावर खून, जाळपोळ, चकमक, सुरुंगस्फोट यासारख्या ५० पेक्षाही अधिक गुन्ह्य़ांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. एटापल्ली तालुक्यातील कसनसूर पोलीस ठाण्यावर २००१ मधील हल्ला, सुरजागड, हेमलकसा, कोरेल्ली, धोडराज येथील हत्या, गट्टा-जांभीया मार्गावर २००५ मध्ये घडवून आणलेला सुरंगस्फोट, पुरसालगोंदी ग्रामपंचायतीची जाळपोळ, एटापल्ली तालुक्यातील मर्दकुहीजवळ २००५ मधील सुरुंग स्फोट याशिवाय २००३ मध्ये भामरागड जवळील ताडगाव सुरुंगस्फोटतही तो सहभागी होता.