Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

धानोरा तालुक्यातील ३८ गावात पाणी टंचाई
जिल्हाधिकाऱ्यांना ‘सर्च’ चा पाहणी अहवाल सादर
गडचिरोली, १४ मार्च / वार्ताहर

उन्हाळा तोंडावर आलेला असता नक्षलवादग्रस्त धानोरा तालुक्यात ३८ गावांमध्ये भीषण पाणी

 

टंचाई उद्भवण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने आतापासूनच पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना आखव्यात, असा प्रस्ताव ३८ गावांच्या पाहणीनंतर ‘सर्च’ च्या चमूने जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांना सादर केला आहे.
शोधग्राम येथे आयोजित १२ व्या आरोग्य संसदेचे (माँ दंतेश्वरी जत्रा) गावकऱ्यांना निमंत्रण देण्यासाठी ‘सर्च’ची चमू गावागावामध्ये गेली होती. या चमूला गावगावात भीषण पाणी टंचाईचे वास्तव निदर्शनास आले. या ३८ गावांपैकी काही गावातील विहिरी खचलेल्या अवस्थेत आहेत. काही विहिरींचा अनेक दिवसांपासून उपसा न झाल्याने त्यात मोठय़ा प्रमाणावर गाळ साचलेला आहे. काही विहिरींमध्ये मात्र पाण्याचा साठा आहे; परंतु त्यात विंधन विहीर तयार करून पाण्याच्या पातळीत वाढ करण्याची गरज आहे. काही खाजगी मालकीच्या विहिरीवरून गावकऱ्यांना त्या पाण्याचा वापर करता येत नाही.
प्रत्येक गावात किमान ४ हातपंप आहेत. मात्र, ते नादुरुस्त अवस्थेत आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापासूनच धानोरा तालुक्यातील या गावांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाणी टंचाई सोबतच नागरिकांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामेही उपलब्ध नसल्याने ते रोजगारासाठी वणवण भटकत असल्याचेही ‘सर्च’च्या चमूने केलेल्या पाहणी दरम्यान निदर्शनास आले आहे. ‘सर्च’च्या चमूने केलेल्या पाहणी अहवालानुसार धानोरा तालुक्यातील मेंढा येथील ४ विहिरींपैकी २ विहिरींचा खालील भाग खचला आहे. ४ हातपंपांपैकी ३ हातपंप पूर्णत: बंद अवस्थेत आहेत. महावाडा येथील २ हातपंपांपैकी १ बंद आहे. परसवाडी येथील ३ हातपंपांना कमी प्रमाणात पाणी येते. गिरोला येथील हातपंपाचे पाणी गढूळ आहे. टवीटोला येथील एकमेव हातपंपातून पाणीच येत नाही. कोवानटोला येथे २ खासगी विहिरी आहेत. त्या शेतात असल्याने पाण्याची अडचण आहे. हातपंपातून खूप विलंबाने पाणी येत असल्याने नागरिक व महिलांची दमछाक होते.
दराची येथे एकमेव विहीर असून तेथील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी होत नाही. तेथे असलेले हातपंप बंद अवस्थेत आहेत. मक्केपायली येथे विहीरच नाही. एकमेव हातपंपावरून गावाची गरज भागविली जात आहे. भेंडीकन्हार येथील एकमेव विहिरीतील पाण्याचा उपयोग केला जात नाही. ३ पैकी १ हातपंप बंद आहे. याशिवाय एडसगोंदी, गुमळी, टिऱ्यानपार, घोडेझरी, कुपानेर, कोंदावाही, यासह अनेक गावातील हातपंपांची दुरवस्था झाली असल्याचेही ‘सर्च’च्या चमूने केलेल्या पाहणीत आढळून आले.