Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राजस्थान महाविद्यालयात मुलींचे वसतिगृह बांधणार
वाशीम, १४ मार्च / वार्ताहर

विदर्भातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून ख्याती असलेल्या राजस्थान महाविद्यालयात १ कोटी २५ लाख रुपये खर्चून मुलींसाठी अद्ययावत वसतिगृह उभारणार आहे. या वसतिगृहासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ८० लाख रुपयाचे अनुदान मंजूर केले असून उर्वरित ४५ लाख रुपये संस्था

 

खर्च करणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. राम मालू यांनी दिली.
येथील राजस्थान महाविद्यालयामध्ये सद्यस्थितीत ६०० मुली शिक्षण घेत आहेत. त्यातील ४० टक्के मुलींना बाहेर गावावरून शिक्षणासाठी ये-जा करावे लागते. वाशीम शहरामध्ये मुलींच्या निवासाची सुविधा उपलब्ध नसल्याने बाहेरगावच्या मुलींची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन राजस्थान शिक्षण मंडळाने मागील सहा वर्षांपासून प्रयत्न केले. संस्थेचे सचिव राजेंद्र सोमाणी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नामुळेच विद्यापीठ अनुदान आयोगाने राजस्थान महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहासाठी ८० लाख रुपये अनुदान मंजूर केले असून हे अनुदान दोन टप्प्यात मिळणार आहे. एकूण १ कोटी २८ लाख १० हजार ३१० रुपये प्रस्तावित खर्चाच्या या प्रकल्पामध्ये राजस्थान शिक्षण मंडळ ४५ लाख रुपये खर्च करणार आहे.वसतिगृहाबाबत माहिती देताना प्राचार्य डॉ. राम मालू म्हणाले की, हे वसतिगृह अत्याधुनिक आणि सर्व सुविधायुक्त राहणार असून १०० मुलींची येथे व्यवस्था होऊ शकेल. पुणे-मुंबईच्या धर्तीवर हे वसतिगृह उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. या वसतिगृहाचा लाभ मुलींना २०१०-११ या शैक्षणिक सत्रापासून घेता येईल. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदान मंजूर झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुभाष राठी यांचे अभिनंदन करण्यात आले.