Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

साहित्याच्या सामर्थ्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून द्या -डॉ. सुशीला पाटील
मराठी प्राध्यापक परिषदेचे अधिवेशन
कारंजा-लाड, १४ मार्च / वार्ताहर

मराठीच्या प्राध्यापकांनी साहित्याचे सामथ्र्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. साहित्य भावनांना दिशा दाखवते. साहित्यामुळे संवेदना अधिक सुजाण होतात. त्यामुळे साहित्याचा उपासक हा जीवनाचाच उपासक होत असतो. साहित्याच्या या सामर्थ्यांची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे

 

प्राध्यापकांचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉ. सुशीला पाटील यांनी केले.
येथील शंकुतला धाबेकर महाविद्यालयात आयोजित मराठी प्राध्यापक परिषदेचे उद्घाटन शनिवारी सकाळी ११ वाजता झाले. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या. आजचे अभ्यासक्रम, शिक्षणपद्धती, प्राध्यापक-विद्यार्थ्यांची मानसिकता याविषयी अत्यंत चिंतनशील विवेचन त्यांनी केले. त्याच बरोबर मराठीच्या प्राध्यापकांवर असलेल्या जबाबदारीची जाणीवही करून दिली. व्यासंगात गढून गेलेला प्राध्यापक हा विद्यापीठाचा आत्मा आहे. मात्र, हा आत्माच अलीकडे लोपलेला दिसतो. प्राध्यापक आपल्याला पावलोपावली दिसतात पण, व्यासंगात गढून गेलेला प्राध्यापक दिसणे मात्र दुर्मिळ आहे. वाङ्मयाचे वाचन-चिंतन-मनन हा भाषेच्या प्राध्यापकांचा स्थायी भाव असावा लागतो. ज्यांना वाचन-चिंतन-मनन यात रस नसेल आणि साहित्यात रूची नसेल त्यांनी प्राध्यापकांचा पेशा स्वीकारू नये, असे मत डॉ. सुशीला पाटील यांनी व्यक्त केले. शिक्षक-गुरू-आचार्य यांच्यातील फरक स्पष्ट करून धर्म, भाषा, जाती, पंथ अशा अनेक अंगांनी सामाजिक एकतेला तडे जात असल्याचे स्पष्ट करून या विपरीत परिस्थितीत मराठीचा प्राध्यापक महत्त्वपूर्ण कामगिरी करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी प्राध्यापक परिषदेचे प्राचार्य रा.गो. चवरे होते. उद्घाटक डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. बा.दा. जोशी, डॉ. श्रीकांत तिडके, स्थानिक प्रशासन समितीचे सदस्य राजाभाऊ डोणगावकर, आयोजक प्राचार्य केशव यांनी अधिवेशनाचे उद्घाटन केले. दीप प्रज्वलन करून डॉ. लुलेकर यांनी अधिवेशनाचे उद्घाटन केले. प्राचार्य केशव फाले यांनी शाल व श्रीफळ देऊन व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार केला. डॉ. सुशीला पाटील यांना सन्मानपत्र देण्यात आले. या सन्मानपत्राचे लेखन व वाचन डॉ. सुभाष गढीकर यांनी केले.
याप्रसंगी पूर्व अध्यक्ष डॉ. बा.दा. जोशी यांनी अधिवेशनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. सुशीला पाटील यांना सुपुर्द केली. डॉ. श्रीकांत तिडके, राजाभाऊ डोणगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या अधिवेशनाचे उद्घाटक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी आजच्या जागतिकीकरणाच्या काळात मराठी समोरील समस्यांचा आढावा घेतला. मराठीच्या प्राध्यापकावर फार मोठी जबाबदारी असल्याने आपली नेमकी भूमिका ठरवली पाहिजे. पूर्वीचे विश्लेषणाचे निकष कालमानानुसार बदलवले पाहिजेत. त्याच बरोबर भाषा, साहित्य आणि वर्तमान यांचा समतोल साधला पाहिजे. त्यासाठी मराठीच्या प्राध्यापकांनी डोळस दृष्टिकोन बाळगत व्यासंगाची कास धरली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
सुरुवातीला स्वागत गीत झाले. प्राचार्य डॉ. केशव फाले, डॉ. सुभाष गढीकर, डॉ. दिवाकर इंगोले, प्रा. शेख, प्रा. डॉ. मुंदे, प्रा. अनुप नांदगावकर, प्रा. गायकवाड यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्राचार्य डॉ. केशव फाले यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी डॉ. सुशीला पाटील यांच्या हस्ते उद्धव शेळके यांच्या साहित्यातील स्त्रीदर्शन या पुस्तकाचे प्रा. बनसोड यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे संचालन डॉ. शुभांगी काटोलीकर यांनी केले. प्रा. मुंदे यांनी आभार मानले.