Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

भंडाऱ्यात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
भंडारा, १४ मार्च / वार्ताहर

 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वसा घेऊन महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध करावे. चाकोरीबाहेर पडून ज्या महिलांनी आत्मविश्वासाने अनेक क्षेत्रात भरघोस यश मिळविले, असे प्रतिपादन दूरदर्शन अभियंता मोरेश्वर मेश्राम यांनी येथे केले. कर्तृत्ववान महिलांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
अभिनव अभिरुची कला व बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने ‘शेप’ महाबचत गटाच्या पुढाकाराने पहेला येथे झालेल्या महिला दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच गीता गिऱ्हेपुंजे यांनी केले. यावेळी प्रा. वासंती सरदार यांनी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला. संचालन राकेश खोब्रागडे यांनी केले. प्रास्ताविक रिंकू सुखदेवे यांनी केले. आभार प्रकल्प अधिकारी महेश बारसागडे यांनी मानले.
मुलगी घराण्याचा उद्धार करते- साखरकर
पालकांनी मुलगा-मुलगी यांच्यामध्ये भेदभाव करू नका. मुलगा वंशाचा दिवा तर मुलगी घराण्याचा उद्धार करते. तिला तिच्या क्षमतांचा विकास करू द्या, असे आवाहन मुख्याध्यापिका सुरेखा साखरकर यांनी केले.
मानवता पूर्व माध्यमिक शाळेत महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी विविध स्पर्धेत विजयी वनिता वाडीभस्मे, कांचन तांडेकर, बर्वे, सुधा इळपाते यांना बक्षिसे देण्यात आली.
बक्षीस वितरण शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा साखरकर व उषा वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. संचालन हर्षां मेहर यांनी केले. आभार विजया मेश्राम यांनी मानले.