Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

निसर्गवादी चित्रकार
हिरव्या नागपुरातला मॉर्निग-इव्हिनिंग वॉक सुखद असतो. ऋतूचं आगमन फिरताना न सांगताही दिसतं, अनुभवता येतं वातावरणातून. झाडाच्या पानांचा बदलणारा रंग, पक्ष्यांचा आवाज आणि आगमन व स्थलांतरातून दिसून येतो प्रत्येक ऋतू स्वत:च्या वैशिष्टय़ांसह. ‘वसंता’ची चाहूल वाऱ्याने होते न होते तोच सिमेंटच्या डांबराच्या रस्त्यावर झाडाची पानं, फुलं, बिया, पक्ष्यांची पिसं दिसू लागतात. रस्त्याच्या कडेला ‘म्हातारी’च्या शेंगा आणि मधूनच वेलीला. गुंजाच्या लाल-काळ्या बियांच्या लगडलेल्या शेंगा लक्ष वेधून घेतात, कुणी तरी ‘ड्राय फ्लॉवर्स’साठी पॉटही तयार ठेवीत असेल या मौसमात. गावाकडच्या (मुदखेड) सीता नदीवर फुललेल्या पिवळ्या बाभूळबनात, तांबूस पळसबनात अभ्यासाच्या वेळी जमवलेल्या वस्तूची, अभ्यासाची आणि अभ्यासासाठी बाभळीच्या शेंगापासून केलेल्या शाईची आठवण वॉक करताना होते. आकार, सौंदर्य पाहण्याची दृष्टी त्यावेळी नव्हती, वस्तू होत्या त्या आम्हा मित्रांसाठी नदीनं दिलेल्या, नदीकाठच्या धुऱ्यावरच्या आणि निसर्गातल्या.
निसर्गातून कलाभिव्यक्ती साकार करणारं ‘अकल्प’ प्रदर्शन नागपुरात पाहिलं अन् गावाकडची नदी आठवली. नैसर्गिक वस्तूच्या वापराचा ध्यास व श्वास घेत केलेली चित्रं समोर होती आणि प्रदर्शनाच्या गर्दीत मध्यभागी खुर्चीत बसून चित्रकार डी.के. मनोहर, मनोहारी दृश्य. १२, लक्ष्मीनगरच्या तात्पुरत्या घरात ‘या चित्रांना चित्रमूल्य यावं आणि कुणीतरी माझ्यानंतर ‘अकल्प’चा वारसा चालवावा, बस्स, एवढसं मागणं निसर्गाकडे आहे,’ छोटीसी आशा बाळगणारा चित्रकार पहिल्या भेटीत बोलता झाला. माझी स्थिती अवघडली होती. पुन्हा ‘गुड, कीप इन टच, थँक्स!’ एसएमएस आला. औरंगाबादच्या उल्लेखानं आलेल्या चहा बिस्कीटांनी पुढच्या गप्पा सुरू झाल्या. मोठय़ा सूनबाईचं माहेर औरंगाबाद, मग मी अघळ पघळ झालो.
नाशकातील तीन मजली पेशवे वाडय़ातील सनातनी विचाराचे ‘मनोहर’ कुटुंब. घरी सराफा दुकानाचा व्यवसाय. १९३६ मध्ये आठ वर्षांचा मुलगा दिगंबर म्युनिसिपल प्राथमिक शाळेत शिकणारा, कारंजा जेल शेजारी भागवत गल्लीतील शाळेत दर शनिवारी अंकगणिताची आठवडी परीक्षा होत असे. परीक्षेत लक्ष लागत नसल्याने काढलेल्या चित्रामुळे यार्दी गुरुजींनी मारले होते त्या माराची आठवण अजूनही चित्रकाराला ताजी वाटते. धास्तीने एक वर्ष मागच्या वर्गास शिकवणाऱ्या पठाण गुरुजींच्या वर्गात प्रवेश घेतला. चित्रकलेशिवाय संगीतात थोडी रुची होती म्हणून पं. त्रिवेदींकडे संगीत शिकायला जुळे मनोहर बंधू जात असत. एके दिवशी गृहपाठ करून आल्यावरही सर्व मुलांच्या बरोबरीने शिक्षा म्हणून भिरकावून दिलेल्या वहीने अस्वस्थ होऊन दिगंबरने संगीत शिकवणीला पाठ फिरवली ती कायमची. आजही सूर कानावर आले की, कानसेन तयार असतो आतला. परिणामी चित्रकलेकडे आकर्षित झालो हे सांगताना मनोहरांच्या डोळ्यातलं पाणी पाहत होतो.
नाशिक तीर्थक्षेत्र मंदिराचं, घाटाचं गाव. अनेक राष्ट्रीय कीर्तनकार यायचे. १९४२च्या ‘चलेजाव’ चळवळीचा काळ होता. राष्ट्रीय कीर्तनकार कोल्हटकरांचा मुक्काम गंगाघाटावरच्या बालाजी मंदिरात होता. ‘अफझलखानचा प्रसंग’ आख्यानाचा विषय. आख्यान संपलं तसं चित्र काढून आणणाऱ्यासाठी बक्षीस जाहीर झालं. दुसऱ्या दिवशी दोन चित्र जमा. एक ४० वर्ष वयाचे रोकडे पेंटर आणि ८ व्या वर्गातील दिगंबरचे. बक्षीस होतं रुपये ५ आणि स्फूर्ती मिळाली न मोजण्याइतकी. १९४४ला दहावी पास झाल्यावर मनोहर मुंबईत गिरगावात आले, मॉडेल आर्ट स्कूलचे विद्यार्थी होण्यासाठी. याचवेळी रुपये ४०० ‘महाभारत’ चित्रातून मिळाले. एम.वाय. कुलकर्णींनी आयोजित केलेल्या ‘माथेरान लॅण्डस्केप’ शिबिरासाठी उपयोग झाला त्या उत्पन्नाचा. पुढे जे.जे.त अप्लाईडचं एक वर्ष संपत आलं. स्नेहसंमेलनाच्या वेळी डी.के.नी काढलेल्या रांगोळीवरून डीन आडारकर व प्रा. आडूरकर सामना झाला. अप्लाईड सोडलं, पेंटिंगला प्रवेश घेऊन. या अभ्यासाच्या जोरावर कार्टूनिंग, इलस्ट्रेशन, कव्हर्स आदी अनेक कामं करण्याचं बळ आलं असावं. ‘विविधांगी अनुभव नोकरी केली असती तर कदाचित मिळाला नसता,’ बोलता बोलता ‘अनुभव हाच मोठा गुरू असतो’असं चित्रकार दलालांनी सांगितलं होतं, ‘त्यांची आठवण म्हणून मी कशालाही पाठ फिरवली नाही पुढे’ मनोहर एकदमच ६० वर्ष मागे गेले. मॉडेल स्कूलच्या एम.एस. जोशींमुळे पेंटिंगकडे वळणाऱ्या मनोहरांवर राजाभाऊ पाटकर, आर.डी. जोशी आणि नाशकातल्या व्ही.जी. कुलकण्र्याचा प्रभाव, वॉटर कलरचा वापर त्यातूनच आला. पोट्र्रेट हा आवडता विषय राहिला जेजेत. मानवाकृती चित्राचा गाभा झाला. अमूर्तीकरण तेव्हा अन् आताही मनोहरांना मान्य नव्हतं, नाही. नैसर्गिक वस्तूतला मानवाकार शोधणं हाच ध्यास राहिला चित्रासाठी. चित्रकार दलालांकडे मधू दंडवते व रॉय किणीकरांमुळे १९५१ला डिप्लोमा झाल्यावर कामासाठी गेले. दबदबा होताच दलालांचा, मॉडेल न वापरता चित्र करणारा चित्रकार म्हणून. चित्र आणि पुस्तकांची मुखपृष्ठ दोन्हीही कामं करणारे. मनोहरांनी केलेल्या मुखपृष्ठावर दलालांचा प्रभाव दिसून येतो. स्वतंत्र कामं करता आली पाहिजेत, असा सल्ला किणीकरांनी दिला आणि दलालांकडून निरोप घेतला १९५२ मध्ये. गिरगावात धनवटय़ांचा प्रेस होता. शामराव धनवटय़ांमुळे नागपूरच्या प्रेसमध्ये येण्याचा निर्णय पक्का केला. पूर्वी बर्डीवर आजोबा राहत त्याच जागेत नातू आला मोदी नं.३ मध्ये राजाराम वाचनालयाच्या समोर. त्यावेळी मलक, मसोजी, डिखोळे, मुलचंद, भैयाजी, भांजीभाई इत्यादी चित्रकार होतेच. आठवलेंचं आर्ट स्कूल होतं नागपुरात. सामाजिक कार्यातल्या संपर्कामुळे एम्प्रेस मिलच्या अहवालाचं मुखपृष्ठ केलं आणि एका वर्षां आतच ‘फ्रिलान्स आर्टिस्ट’ होण्यासाठी निमित्त झालं.
शहर मध्यप्रांताची राजधानी होतं, वृत्तपत्र, साप्ताहिकं होती, ‘सारथी’ सारखी. कार्टुनिंगने सुरुवात झाली. मेंटल हॉस्पिटल, सेंट्रल जेल, गव्हर्नमेंट प्रेसमधील कामं मिळाली. नॅशनल कॉलेजसाठी शिवाजी महाराज, म. फुले तर इंजिनिअरिंग कॉलेजसाठी विवेकानंद, डॉ. हेडगेवार आणि डॉ. पंजाबरावांच्या पोट्र्रेटने बऱ्यापैकी नाव मिळालं. टिळकांच्या चित्रानं समाधान दिलं. १९५४ मध्ये कुस्तीच्या फडासाठी आलेल्या दारासिंगचं घरी लाईव्ह पोट्र्रेट केलं होतं. विनोबासोबत भूदान यात्रेत छिंदवाडा, बैतूलचे प्रसंग सांगत विनोबांनी गणपतीचं चित्र शिकून घेतल्याची आठवण मनोहर सांगत होते. भूदान सोडलं आणि प्रदर्शनाची मालिका सुरू झाली. मी प्रसंगानुरूप अल्बम पाहत होतो. समोर फाईलमध्ये, काही रेखाटनं, मृखपृष्ठ होती आणि दृक-श्राव्य माध्यमावर आधारित सिनेमागृहातल्या म्युरलसाठी केलेली चित्रमालिका. बारीकसारीक तपशील व नोंदीसह आठवणी ऐकत होतो. शिवचरित्रावरील पुस्तकाचं छापील प्रिंट हाती आलं. मुलांनी त्यातले शिवाजी महाराज रंगवून चिकटवावे ही कल्पना होती, ती कल्पनाच राहिल्याचं नजरेनं हेरलं. मूळ चित्रं, डायरीतील लेखन त्या घरी (ज्याचं बांधकाम चालू आहे) असल्यानं पाहता आलं नाही. या पसाऱ्यातच १९७३च्या बालगंधर्वमधील ‘अकल्प’चा कॅटलॉग सापडला ब्लॅक अँड व्हाईट. ‘निसर्गाकडून निसर्गाकडे’ घेऊन जाणारी चित्रे होती. म. गांधी, जिराफ, हरीण, चित्ता, गाढवावर बसलेला मुलगा व शेजारी बकरी इत्यादी चित्रातली वाळलेली पानं, फुलं, पाकळ्या, काटक्या, पिसं, बिया, टरफलं रंग सादृश्यानुसार चिकटवलेले होते विषय साकारण्यासाठी. दैनंदिन जीवन, ऐतिहासिक प्रसंग, वन्यजीवन मानवाकृतीसह आले. वस्तू गोळा करण्यासाठी सौभाग्यवती कालिंदीसह प्रवीण, प्रफुल्ल, विष्णू व मुलगी सुचित्राने केलेली मदत विसरले नाही सांगण्यासाठी. निसर्गाकडून स्वीकारलेल्या आकारात निसर्गवादी चित्रकारानं वारकरी व आराध्यदैवत विठ्ठलाचं चित्र कोलाज केलंय. वनविभाग आणि प्रशिक्षण केंद्र ‘अकल्प’च्या मागे उभं होतं. अनेक विश्रामगृहात म्हणून ‘मनोहारी कोलाज’ आहेत. नागपूर, इंदूर, भिलाई, पुणे, दिल्ली, मुंबईतील प्रदर्शनं आणि सन्मानामुळं दृष्टीच्या सहाय्याने प्रत्येक सरफेस व नैसर्गिक वस्तूत चित्रकार मनोहर आकार शोधतात, दाखवतात. भूर्जपत्र ते प्लायवूडपर्यंत केलेली चित्रे म्हणजे या कलावंताचा निसर्गोपचार आहे, इझमसारखा. पिकासोनंही असंख्य कोलाज केली. हेब्बरानी रंगवलेलं ‘बदामाचं पान’ आठवत राहावं. इंग्लंडहून एका रसिकानं कुठल्यातरी झाडाच्या मोठ्ठय़ा बिया पाठवल्या म्हणे त्यातूनच ‘मावळ्या’ची ढाल साकारली मनोहरांनी. शाळेतल्या मुलांसाठी १९८८-८९ मध्ये जीपने फिरत लॅण्डस्केप प्रशिक्षण सुरू केलं होतं, अल्बम एकेक आठवण सांगत होता. उधईनं खावून फस्त केलेल्या चित्रापर्यंतच्या. काही लेखन प्रकाशित करायचंय. काव्यसंग्रह प्रकाशित आहे.
केतकी (७ वर्ष) शाळेतून घरी आली. शाळेच्या आवारात गोळा केलेली पक्ष्यांची पिसं दप्तरातून हलकेच आजोबांच्या हातावर ठेवली. गोड हसले आजोबा. ऑगस्ट २००८ मध्ये बातमी वाचूनच मी मुलीसह गेलो होतो प्रदर्शनासाठी. ..आज मॉर्निग वॉक करून परतलो. वाऱ्याच्या झुळुकीनं अंगणातल्या बेलाच्या झाडाच्या पानानी अंगणभर उच्छाद मांडला होता. दूरवरून फांद्याच्या टोकाला आलेले कोवळे धुमारे दिसत होते, पिवळ्या बेलफळासह.
प्रा. विकास जोशी
९४२१७०२०६९