Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वनवैभवातील झगमगता हिरा - नागझिरा
नागपूरपासून अवघ्या १३० किमी असलेल्या नागझिराचा फेरफटका म्हणजे स्वर्गीय आनंदानुभव. येथील दाट वृक्षराजींमधून फिरण्याचा आनंद काही औरच. मध्यंतरी दोन व्याघ्रगणनांच्या काळात नागझिराचे जंगल फिरण्याची संधी मिळाली. नागझिरा हे जैववैविध्यतेचे सुंदर मिश्रण आहे. तिरोडा रेंजमध्ये १५२.८१० चौरस किमी परिसरात विस्तारलेले नागझिरा म्हणजे विदर्भाचा स्वर्ग. नागझिऱ्याला दरवर्षी किमान ३० हजार देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. यावरून त्याचे स्थान लक्षात येते. नागझिरा तलावाच्या काठावर येणारे बहुविविध पक्षी न्याहाळताना वन्यप्रेमी हरवून जातो. क्वचित प्रसंगी ढाण्या वाघाची स्वारी समोरून जाताना दिसते तर कधीकधी झाडावर बसलेला बिबट तुमची प्रत्येक हालचाल नजरेत साठवून ठेवत असतो.. आणि हे कदाचित तुमच्या गावीही नसते. गव्यांचे कळप चरताना दिसतात, मधूनच सुसाट पळणारे हरणांचे कळप तुम्हाला आडवे जातात तर कधीकधी जंगलात भटकलेली नीलगाय तुम्हाला रोखून बघत असते.. शांत जंगलात अचानक पक्ष्यांचा कलकलाट ऐकू येतो, कधी मोराचे नर्तन दिसते तर नित्य चालणारी माकडांची दंगामस्ती नाकी नऊ आणते.. हे सगळे अनुभवायचे असेल तर किमान दोन दिवसांचा वेळ हवा.
दुर्दैवाने वृक्षतोड, वणवे आणि वन्य प्राण्यांच्या शिकारीचे ग्रहण नागझिऱ्याच्या जंगलालाही लागले आहे. दोन वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत या जंगलाची मोठय़ा प्रमाणात राख झाली होती. तरीही महाराष्ट्रातील समृद्ध वनसंपत्तीच्या यादीत असलेले नागझिराचे अव्वल स्थान अजूनही ढळलेले नाही. नागझिराचे वैशिष्टय़ म्हणजे जंगलात जागोजागी असलेले तलाव. या तलावांनीच नागझिऱ्याला हिरवाई दिली आहे. नागझिरा, चोरखामारा, तांडेझरी, बाळापूर, बडबडय़ा, लेंडेझरी, मुरपार, रेंगेपार या तलावांत वर्षभर पाणी साठून राहते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तलावातील पाणी कमी झाले आहे. तृणभक्षी, हिंस्र प्राणी आणि पक्षी असा जीवसृष्टीचा त्रिकोण नागझिऱ्यात झाला आहे. मोठे वृक्ष, झुडपे, गवत आणि औषधी वनस्पतींनी नागझिराची वनराई समृद्ध केली आहे. नवेगावबांध पक्षी अभयारण्यही येथून जवळच असल्याने पक्ष्यांच्या बहुरंगी प्रजाती नागझिऱ्याचे महत्त्व वाढवतात. नागझिरा अभयारण्यात छोटय़ा-मोठय़ा वृक्षांच्या रांगा नजरेस पडतात. साग, धावडा, बीजा, गराडी, तिनसा, तेंदू आणि सूर्या वृक्ष तसेच बांबूची वने येथील खास वृक्षसंपदा. नागझिरात ३४ प्रकारच्या वन्यप्राण्यांच्या प्रजाती, १७० प्रजातींचे पक्षी, चार प्रकारचे उभयचर, साप, अजगरासह विविध सरपटणारे प्राणी, कोळी, कीटक आणि ४९ प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. बिबट, वाघ, गव्यांचे कळप, हरिण, चितळ, चौशिंगा, स्लॉथ बीअर, खवले मांजर, भुंकणारे हरिण, नीलगाय, कोल्हे, ससे, तडस, लांडगे, जंगली मांजरी, घोरपड, उडणारी खार येथे वास्तव्यास आहे. नागझिऱ्याचे वैशिष्टय़ म्हणजे जंगली कुत्र्यांचे कळप. शिकारीत तरबेज असलेले जंगली कुत्रे एकजुटीने एखाद्या तृणभक्षीला घेरून त्याचा फडशा पाडतात. परिणामी त्यांच्या वाटेला वाघही जात नाही.
नागझिराची सफर करण्यासाठी ऑक्टोबर ते मे हा कालखंड योग्य समजला जातो. परंतु, एप्रिल ते मे या काळात नागझिराला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कारण या काळात पाण्याच्या शोधात असलेले वन्यप्राणी पाणवठय़ांवर तहान भागवण्यासाठी येत असल्याने त्यांचे हमखास दर्शन घडते. काही बेशिस्त पर्यटकांमुळे या प्राण्यांना तहानलेले राहण्याची वेळ येते. स्वत:च्या गुर्मीत असलेले पर्यटक जंगलाच्या नियमांचा भंग करून मोठय़ाने आवाज करतात किंवा हालचाली करतात. त्यामुळे भेदरलेले प्राणी पाणवठय़ावर न येता आत जंगलात आश्रय घेतात. वन्यप्राणी चोवीस तासात एकदाच पाणी पित असल्याने सुरक्षेची पूर्ण खात्री झाल्याखेरीज ते पाणवठय़ाची वाट चालतच नाहीत. आपण प्राण्यांना पाणी पिण्यापासून वंचित ठेवत आहोत, याचे साधे भान काहींना नसते. अनेकदा जंगलात फिरणारे पर्यटक पाण्याच्या बॉटल्स, प्लास्टिकच्या थैल्या, बिस्कीटांचे पुडे वाटेतच टाकून देतात. परंतु, हे करताना आपण प्राण्यांच्या आरोग्याला धोका पोहोचवत आहोत, याची जाणीव पर्यटकांनी ठेवायला हवी. अन्य जंगलांप्रमाणेच येथे प्रवेश शुल्क, वाहन शुल्क, कॅमेरा, व्हिडीओग्राफी शुल्क आकारले जाते. रेंज नसल्याने मोबाईल बंद ठेवावे लागतात. नागझिरा १६ जून ते ३० सप्टेंबर या काळात पर्यटकांसाठी बंद असते.
छोटय़ा छोटय़ा टेकडय़ांवर बहरलेले नागझिराचे जंगल पर्यटकांना हाक देत आहे. परंतु, या हाकेला ‘ओ’ देत पुढे जाताना जंगलाच्या नियमांचे पालन करूनच वनभ्रमणाची हौस तुम्हाला पुरी करायची आहे. विदर्भाचा हा अनमोल ठेवा जपण्यासाठी पर्यटक या नात्याने काय करता येईल, याचा पूर्ण विचार करूनच सफरीला निघाल्यास पर्यटनाचा आनंद आणि पर्यावरण रक्षणाचे ध्येय या दोन्ही बाबींना स्पर्श करता येईल. जंगलात जाताना आपण वन्य प्राण्यांच्या घरात जात आहोत, याचे भान पर्यटकाने ठेवले पाहिजे. जंगलाच्या नियमांचे पालन करूनच आपल्याला तेथे वावरायचे आहे, याबाबत कोणतीही शंका मनात ठेवू नये. नागझिराला जाताना वन कार्यालयाशी अधिकृत संपर्क करून स्वतंत्र वाहनाने जाणे सोयीस्कर ठरते. खुली जिप्सी किंवा जीप असेल तर सोने पे सुहागा. प्रवेशासाठी चार गेट आहेत. चेकिंगच्यावेळी हुज्जत घालू नये. साधा सरळ मार्ग असल्याने जाताना कुठेही अडचण येत नाही. महत्त्वाचे म्हणजे नागझिरा वनक्षेत्रात कुठेही वीज नाही. वन्यप्राण्यांना माणसांच्या वावराचा कुठेही त्रास होऊ नये, याच हेतूने वन विभागाने हा निर्णय घेतला आहे. येथे पर्यटकांना राहण्याची सोयही चांगली आहे पण, कंदिलाच्या प्रकाशात राहण्याची तयारी ठेवावी. नीलय रेस्ट हाऊस, लोग हट रेस्ट हाऊस, मधुकुंज, लताकुंज रेस्ट हाऊसमध्ये पूर्वसूचना देऊन राहता येते. कॅन्टिनमध्ये ऑर्डर दिल्यानंतर जेवण तयार होते. नागझिरानजीक नवेगावबांध, गोठणगावातील तिबेटी निर्वासितांचे शिबीर, ईटियाडोह धरण तसेच प्रतापगड किल्ला असल्याने भरपूर वेळ असेल तर धावती भेट तेथेही देता येते.
विक्रम हरकरे
९८२२००४७०१