Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

डिसनी लँड
एका प्रवासी कंपनी सोबत अमेरिकेत भ्रमणासाठी आम्ही सगळे गेलो. आधाश्यासारखं आम्ही खूप खूप बघितलं आणि खूप मजादेखील केली. रात्रीचे जेवण घेताना आमचा वाटाडय़ा म्हणाला, ‘उद्या सकाळी साडे आठला सगळे तयार व्हा. उद्या सकाळी आपल्याला डिसनी लँडला जायचे आहे.’ डिसनी लँड ऐकल्यावर आम्ही लहान मुलांसारखे उत्साहित झालो. सकाळी साडे आठच्या आधीच आम्ही आमच्या प्रवासी बसमध्ये स्थानापन्न झालो. तासाभरात आम्ही डिसनी लँडला पोहोचलो. डिसनी लँडच्या समोरच्या पटांगणात असंख्य मोटारी पार्क केल्या होत्या. सगळ्या गाडय़ा शिस्तीत ठेवल्या होत्या. गोंधळ नाही, गडबड नाही, हॉर्न वाजवणे नाही, शिवीगाळ नाही आणि त्या पार्किंग एरियात ट्रॅफिक पोलीस पण नाही. प्रवासी मंडळींच्या आराम गाडय़ा पण एका ओळीत आखून ठेवलेल्या जागीच पार्क केल्या होत्या. कोणीही आपली कार कुठलाही गोंधळ न होता एका मिनिटात बाहेर काढून हमरस्त्याला लावू शकत होता. हे सर्व बघून मला मौज वाटली. मी आमच्या वाटाडय़ाला विचारलं,
‘आज इथे एवढी गर्दी कशी?’
‘आज रविवार. आज सुटीचा दिवस. आज अमेरिकेतलेच नव्हे तर विदेशातले टुरिस्ट देखील आले असणार! प्रत्येकाला डिसनी लँडचे फार आकर्षण आहे. गर्दी होणारच.’
तिकिटे काढून आम्ही आत शिरलो. डिसनी परिसर अध्र्या नागपूर एवढा पसरलेला. परिसरात फिरायला वाहने आणि टॉय ट्रेनस्. बघ्यांची आणि कच्या-बच्यांची तुफान गर्दी पण, कुठेही गडबड गोंधळ नाही. सगळं आणि सगळेच शिस्तीत. एक गोष्ट जी मला प्रकर्षांने जाणवली आणि दिसली ती म्हणजे स्वच्छता. सगळा परिसर स्वच्छ होता. केरकचरा नव्हता, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकलेल्या नव्हता, प्लास्टिकचे पेले फेकलेले दिसत नव्हते, रस्त्यावर कोणी चूळ भरत नव्हते, पानाचे ठेले (अधर श्रृंगार पान मंदिर) नव्हते आणि कुणी जागोजागी थुंकत नव्हते. विशिष्ट अंतरावर संडास व मूत्रीघर होते. पिण्याच्या पाण्याची सोय देखील जागो जागी होती. खाद्य पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स आणि आईसक्रीमची सोय पण होती. डस्ट बिन्स् तर दहा पावलांवर होते. रिकाम्या बाटल्या, प्लेट्स आणि इतर निरूपयोगी वस्तू लोकं निमूटपणे कचऱ्याच्या डब्यात टाकायचे. मोठी माणसेच नव्हे तर लहान मुले देखील डस्ट बिनचा उपयोग प्रामाणिकपणे करायची. चॉकलेट तोंडात गेल्यावर चॉकलेटवरचे कागदाचे वेष्टन डस्ट बिनमध्येच जायचे. मोठी माणसे लहान मुलांना हे शिकवायचे किंवा करून दाखवायचे.
बरंच फिरून झालं. पुष्कळ बघून झालं. सकाळचे ११ वाजले.
‘ए, जरा थाबूया. मस्त कॉफी घेऊ, एक एक सिगारेट ओढू आणि मग पुढची भटकंती करू. चालेल?’ माझ्या मित्राने, संदीप मुखर्जीने प्रस्ताव मांडला, मला पटला आणि मी लागलीच लगतच्या स्टॉलवरून कॉफीचे दोन पेले घेतले. कॉफी पिऊन झाल्यावर पेपर कप्स् आम्ही डस्ट बिनमध्ये टाकले. संदीपने सिगारेट काढली, एक मला दिली, एक स्वत: शिलगावली आणि आम्ही दोघे मजा घेत भोवतालचा परिसर न्याहाळू लागलो. शुभ्र पांढरा पोशाख घातलेली बरीच शाळकरी मुलं-मुली आम्हाला त्या परिसरात दिसली. सगळ्यांनी पांढऱ्या रंगाची डिसनी वर्ल्डचे लेबल असलेली गोल्फ कॅप घातली होती आणि प्रत्येकाच्या हातात एक लहान झाडू आणि एक प्लास्टिकचा स्पॅचुला होता. ही शाळकरी पोरं सगळीकडे फिरत होती आणि कचरा किंवा घाण दिसल्यास ती गोळाकरून डस्ट बिनमध्ये टाकत होती. हे सर्व बघून आम्हाला मौज वाटली. ती मुले कोण असावी यावर आमचा बराच वादविवाद झाला आणि अखेर काहीच निष्पन्न न निघाल्यामुळे आम्ही दोघांनी तिथून पुढे निघायचे ठरवले. निघण्याआधी आम्ही दोघांनी आपआपल्या सिगारेटची थोटके खाली जमिनीवर टाकली, बुटांखाली विझवली आणि जायला निघणार तेवढय़ात १२ वर्षांची एक मुलगी धावत आली, थोटके आपल्या केरसुणीने आपल्या स्पॅचुल्यात टाकली, स्पॅचुला डस्टबिनमध्ये रिकामा केला, आमच्याजवळ आली आणि म्हणाली,
‘थँक यू व्हेरी मच सर!’
‘तू आमचे आभार कां मानतेस बेटा? मी तिला विचारले.
‘तुम्ही मला काही काम दिलेत हो. सकाळपासून मी नुसती हिंडत होते. सगळा परिसर स्वच्छ होता. तुम्ही सिगारेटची थोटकं टाकलीत आणि ती मी उचलली. थँक्स!’
‘तुम्ही मुलं-मुली इथेच काम करता का?’
‘छे हो! आम्ही शेजारच्या गावातल्या शाळेतले! आज आमच्या शाळेला हे काम मिळाले. आम्हाला दिवसाकाठी प्रत्येकी दहा डॉलर्स मिळतील.’ ती उत्तरली.
‘या पैशाचे तुम्ही काय करणार?’ मी विचारले.
‘सर्व पैसे जमा करून आम्ही त्यातून एक कॉम्प्यूटर घेणार आणि ते आमच्या वर्गातल्या एका गरीब मुलाला देणार.
‘अरे वा! फार छान. अभिनंदन!’ संदीप बोलला.
‘सर, एक विनंती करू?’ तिने विचारले.
‘कर की! जस्ट गो अहेड.’
‘सर, सिगारेट ओढू नका. तब्येतीला ते घातक आहे आणि थोटके जमिनीवर फेकू नका.’
‘कां?’ मी विचारले.
‘आमचा देश घाण करण्याचा तुम्हाला हक्क नाही सर.’ एवढे बोलून ती पळाली मात्र, आम्हाला अंतर्मुख करून गेली.

डॉ. विनय वाईकर
े४२२४४४२४७