Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शिंक्यातलं लोणी खाल्लं कुणी?
नणदा भावजया दोघी जणी दोघी जणी
घरांत नव्हतं तिसरं कुणी तिसरं कुणी
नणंद:- आता माझा दादा येईल गं, येईल गं, वहिनीचं गाऱ्हाणं सांगीन गं ‘दादा तुझी बायको चोरटी-चोरटी
दादा:- घे काठी लगाव पाठी
नणंद:- घरादाराची लक्षुमी मोठी- लक्षुमी मोठी
अगदी अधिकारानं एकमेकींवर आरोप-प्रत्यारोप करतानाच कधीही टोकाचा वाईटपणा येणार नाही हा विश्वास असलेलं. एकमेकींना पूरक-कारक असं मैत्रीचं नातं नणंदा भावजयीचं. आत्मविश्वासानी वहिनीचं गाऱ्हाणं दादाशी करताना दादानं वहिनीला सजा सुनावली तर लगेच या घरच्या लक्षुमीपणाची आठवण वर दादालाच करून देणारी त्याची लाडकी बहीण, घराचं चैतन्य, आणि वहिनीची कायम निंदक समीक्षक नणंद.
नणंद आपल्या आयुष्यात येते तो क्षण किती मार्मिक असतो. बोहल्यावर चढलेली वधू भरून आलेल्या डोळ्यांनी वरमाला घालते-घालून घेते. डबडबल्या डोळ्यांनी वराच्या मागून तिला पहिल्यांदा दिसते करवली रूपी नणंद. नणंद पुढे येते डोळ्याला कलशातलं पाणी लावते, जणू काही वहिनीच्या डोळ्यातलं पाणी पाण्यानच पुसून या नात्यातला ओलावा प्रस्थापित करते. दिव्यानं ओवाळून तिचं पहिलं स्वागत करते. लग्नातल्या महावस्त्राची सळसळ, स्पर्श, कोराकरकरीत सुवास आणि नवीनतेचं तेज जसं नववधूच्या लावण्याचा साज वाढवतं, तसंच सळसळतं नवसंवादाचं, अधिक अधिकाराचं, नवऱ्याच्या खास लाडाचं नणंदेचं नातं आपला बाज दाखवत आपल्या आयुष्यात येते आणि नणंदपणाचे कधी भरजरी, कधी रंगीबेरंगी, कधी टोचणारे तर कधी रेशमी, कधी मखमली, कधी कडक, कधी मायेनं चिंब करणारे, कधी टचकन डोळ्यात पाणी आणणारे तर कधी भरलेले डोळे टिपणारे, असे अनेक पदर आपल्या दैनंदिन जीवनात आपसूक गुंततात. अंतरंगाला त्यात गुंफत नेतात. सुरुवातीच्या आयुष्यातले बोचरे धागे आपल्या मनात मुरतात- कधी भावबंधांची रेशमी वेणी गुंफली जाते कळतच नाही.
आपल्या प्रापंचिक सुखदु:खात बाहेरून प्रथम धावून येणारी, कायम भावजयीला अप्रत्यक्षपणे धाकांत ठेवणारी, टाळतो म्हटलं तरी मनापासून टाळता येणं शक्य न होऊ देणारी, कधी आली नाही तर जिची भक्कम कमी जाणवेल अशी, कुठल्याही समारंभात, कार्यात आपलं अस्तित्व ठळकपणे जाणवून देणारी, रागावली तर आपल्या मनांला हुरहूर वाटेल, अशी अन् सुखावली तर धन्यता वाटेल, अशी विदूषी म्हणजे नणंद. या विदूषीचं मन सांभाळतो म्हटलं तर फारसं कठीण नसतं छोटय़ा-छोटय़ा गोष्टीत तिच्या अत्यल्प अपेक्षा असतात. म्हणूनच निरपेक्ष मैत्रीच्या नात्याइतकचं जवळचं पण भिन्न, विरुद्ध असं हे नातं असतं. अपेक्षापूर्ती नंतर मात्र, सगळा आनंदी-आनंद. भावजयीनं घेतलेली साडी तिला आवडतेच, असं नाही. बहुधा नाहीच. पण, (दादानी) भावानी खास आणलीय सांगितलं की, शंभर टक्के आवडणार. सोपं नं?
मोघम बोलवणं केली, अगत्यानी -आग्रहाचं आमंत्रण केलं नाही तर धुसफुसणार. येणार मात्र नक्की आणि आल्यावर एखादी जबाबदारी त्यांच्यावर विश्वासानं टाकली तर मानपान विसरून संपूर्ण कार्याची धूरा एका स्पिरीट नी सांभाळणार. सोपंय नं?
सासू-सासऱ्यांशी म्हणजे तिच्या आई-वडिलांशी वागताना आपल्याकडून काही आगळीक झाली तर दीर्घ फणफण, तीव्र राग. मात्र, त्याच प्रेमानं करणाऱ्या भावजयीच्या पाठीशी स्टँड बाय म्हणूनही उभं राहायची तयारी हिचीच. नणंदेच्या मनातली नाराजी, अपेक्षाभंग, निराशा या तक्रारीभावनांचं उत्तरही तिच्या अंतरंगात असतं.
भाऊ तो आपला भावजय का लोकाची
माहेरी जाऊन मनं राखावी दोघांची - या अंत:प्रकाशाचा अवलंब ती करतेच करते. नणंद या नात्याला वय नसतं. वैवाहिक आयुष्यभर तिचा प्रेमळ दरारा सौम्य ते तीव्र किंवा तीव्र ते सौम्य असाच राहतो. नात्याबरोबर सुरू होतो आणि आपल्याबरोबरच संपतो.
नणंद जेव्हा मोठी असते, नवऱ्याची वडील बहीण असते तेव्हा तिची मायाळू कृपादृष्टी संसारावर जाणवते. सामंजस्य, सहचर्य, संस्कार करणं, रितभात शिकवणं आपल्या पोटात शिरणं आपल्या चुका पोटात घालणं. आई किंवा सासूसमान पण, मऊ जरब ठवणं या कलांत ती निपुण असते. भावजयही धजावत नाही तिच्या मनाविरुद्ध वागायला. काही मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये तिनं आपल्या कर्तबगारीनं, त्यागानं पाठच्या भावंडांचा सांभाळ केलेला असतो. अशा परिस्थितीत ती त्या परिवाराचा मानिबदू असते. तिच्याशी सगळे प्रेमादरानी वागत असतात. अशावेळी भावजयीनं आपला अहंकार, अधिकार, तोरा दाखवला तर संपूर्ण कुटुंबाला दु:ख होतं. प्रतिकार होतो. अशावेळी भावजया अधिकच तुटक वागू लागतात. तेव्हा त्या भावाची केवळ कुचंबणा होत नाही, तर आपल्या बहिणीसाठी त्याचा जीव तीळ-तीळ तुटत राहतो. कधीच स्वस्थ, शांत तो राहू शकत नाही. आपणही असं नातं बघून हळहळतो. सिनेमा, नाटक, सिरियल्समध्ये अशी भावजय दिसली तरी कळवळतो.
एका कुटुंबातली गोष्ट. वडील निवृत्त झालेले, भाऊ बेताच्याच नोकरीतले, लग्न झालेले. मुलगी शिकलेली, कमावती. तिला धाकटी, आपल्या पायावर उभी नसलेली (आर्थिकतेनं) बहीण. लग्नाचं वय दोघींचही होऊन गेलेलं. या मुलीनं आपण कमावते-शिकलेले आहोत, आपला आयुष्यात कसाही निर्वाह होईल पण, धाकटीला मात्र जगण्यासाठी आधार लागेल, या विचारानं पुढाकार घेऊन धाकटीचं लग्न लावून दिलं. भावांचे संसार सुरळीत केले, आई-वडिलांची दुखणी-खुपणी काढली, येणाऱ्या जाणाऱ्यांचं हसत मुखानं आणि आदरानं केलं, भावांच्या मुलांना स्वत:ची मुलं समजून प्रेमानं वाढवलं, संस्कारीत केलं. ती मात्र, लग्नाविना राहिली. करतंच गेली, झिजतंच गेली. तिच्या प्रगल्भतेपुढे सगळ्यांनी आपापल्या परी तिला गृहीतच धरलं. आज सगळे स्थिरस्थावर झाले, मुलं मोठी झाली. जबाबदाऱ्या संपल्या. या घरासाठी वयाची पन्नास वर्ष खस्ता खाणाऱ्या नणंदेचं अस्तित्व वहिनीला बोचू लागलं. मानाची कधीही अपेक्षा न केलेल्या नणदेला पदोपदी अपमान, तिरस्कार सोसावा लागू लागला. तिच्या शब्दाची कर्तृत्वाची किंमत कमी-कमी होऊ लागली पण, तरीही या कुटुंबाशी, घराशी तिची असलेली निष्ठा जराही कमी झाली नाही. ज्यांनी तिचा जीवनप्रवास बघितला ते तिला आदर्श मानतात, सन्मान देतात. उदंड तिच्यावर प्रेम करतात पण, भावजयीला कां आठवत नाहीत ते दिवस? भावाला का स्मरत नाही तिचा मौलिक सहयोग? म्हणजे एका बाजूनी प्रेम असलं अन् दुसऱ्यानं प्रतिसाद नाही दिला तर ही प्रेमप्रक्रिया पूर्ण होत नाही. प्रेम म्हणजे प्रतिसाद. नणंद भावजय जेव्हा एकमेकींना प्रतिसाद देतात, तेव्हाच या नात्याचे सुरेल पडसाद उमटतात.
याउलट एका बहिणीनं वडील वारल्यानंतर इस्टेटीसाठी भावाचा जीव खातानांही बघितलं. कोर्टकचेऱ्या, कायदा, बदनामी, शिव्याशाप देताना पाहिलं. थोडय़ाशा पैशासाठी भाऊ भावजयीशी, भाचे -भाच्यांशी भांडण घेणाऱ्या, माहेरचे दरवाजे आपल्या हातानं बंद करणाऱ्या नणदांचं आश्चर्य वाटतं. त्यांच्यातला तो ओलावा जातो कुठे? पैशासाठी आंधळ्या का होतात? माहेरी अधिकार-हक्क दाखवणं वाईट नाही पण, त्याला मर्यादा असाव्या. सामंजस्य आणि परस्पर प्रामाणिक पारदर्शक व्यवहारातून या समस्या सोडवाव्या त्यासाठी माहेराचं हे मौलिक नातं तोडू नये.
नणंद-भावजय-भाऊ या त्रयीतल्या कुठल्याही दोघांचे संबंध तुटक झाले तर त्याचा परिणाम भावावर-नवऱ्यावरच होतो, म्हणून नणंद-भावजय या नात्यातलं बळ हे भावाच्या सुखासाठी कारणीभूत ठरतं. म्हणूनच या नात्याचा केंद्रबिंदू या भूमिकेतून त्याला दोघींनाही सागावंसं वाटतं- ‘शिंक्यातलं लोणी दोघीही अगदी राजरोसपणे खा आणि लोण्यासारखं मऊ असं तुमचं नातं स्निग्ध ठेवा.’
भावजयीला नणंद समजायला वेळ लागतो. तथापि आपल्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी, मुलांवर अपार माया करणारी आत्या, सासू-सासरे जिच्या येण्याची, खुशालीची वाट बघत असतात अशी त्यांच्या काळजाचा तुकडा या चष्म्यातून बघते तेव्हा या नात्यातली मुग्धता तिला कळते, पटते, मान्य होते.
नणंदेची मात्र, कुठल्याही परिस्थितीत भाऊ-भावजय-भाच्यांवरची ममता ओसरत नाही. भाऊ तिचा ‘विक पॉइंट’ असतो. भावाबद्दलचा भरवसा, काळजी, माया, ओढ वाढतच जाते. ऊन्हं-वारा-पाऊस जास्त झाला तरी भाऊ कुठे असेल? सुखरूप असेल की नाही? या चिंता तिला चैन पडू देत नाही. भावाचे सगळे दुखा:चे प्रश्न ती आपलेच समजते. त्याच्या सुखात फुटाण्यासारखी फुटते तर दु:खात तुटत-तुटत जाते. होई होईस्तोवर त्याला आयुष्यात कुठलाच त्रास होऊ नये, अशीच प्रार्थना करीत राहते. म्हणूनच या प्रेमस्वरूप नणंदेच्या प्रेमप्रवाहात भावजयांनी स्वत:ला चिंब ठेवावं असं वाटतं. आयुष्यातलं हे सुरेख सुंदर नातं सुलभ सुखाची आनंदकिल्ली आहे, त्याला समजून जपावसं वाटतं-
साखरेचा रवा नको तोडू मुंगीबाई
बहिणीचा भाऊ नको तोडू भावजयी
शुभदा फडणवीस
९८६०२८०२६८