Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मॅडम
रोजच्यासारखी तुरुंगातली डाक आली. प्रज्ञा मॅडमकडे पत्र देताना उघडय़ा पोस्टकार्डवर माझी नजर गेली.
‘आई मला तुझी खूप आठवण येते, तू केंव्हा येशील?’ माझ्या डोळ्यासमोर पाण्याचा पडदा झाला. मी पुढे वाचू शकले नाही. ८ व्या वर्गात शिकणाऱ्या मुलाने जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आपल्या शिक्षिका आईला लिहलेलं ते पत्र होतं.
प्रज्ञा मॅडम नावाप्रमाणे विद्यावती आहेत. अतिशय सभ्य व सुसंस्कृत, त्याचे शालिन व्यक्तिमत्त्व पाहिले की, त्यांना अगदी हात जोडून, ‘नमस्ते बाई’ असं म्हणावसं वाटतं. प्रज्ञा मॅडम तुरुंगातही बंदिनींना शिकवण्याचं काम करतात. त्यांना पुस्तकं वाचून दाखवतात. अर्ज लिहून द्या, पत्र लिहून द्या, म्हणून बायका नेहमी त्यांच्याभोवती कोंडाळं करून राहतात. मॅडमला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. हायकोर्टात अपील केल्यावर मुलं लहान आहेत. या कारणावरून, ती नुकतीच कमी होऊन तीन वर्षांची झाली आहे पण, मुलांना आई-वडीलाविना राहाणं म्हणजे एकेक दिवस मोजत जाणं! मॅडमला हे तीन वर्षे तीन युगाइतके मोठे वाटत असतील. मॅडमच्या डोळ्यात नेहमीच ढग भरून असतात. त्यांच्याशी बोलताना हा ढग फुटला तर आपण वाहून तर जाणार नाही, अशी भीती वाटते.
५ मे २००१ शाळेला ग्रीष्मकालीन सुटय़ा लागल्या, मोहाडीला शिक्षक असलेले विशाल धकातेसर आपल्या मुलांमध्ये नांदेडला सुखरूप परत येतील, अशी काही त्यांची तब्येत नव्हती. पाच सहा महिन्यांपासून त्यांनी नियमित घ्याव्या लागणाऱ्या गोळ्या घेणे बंद केले होते. त्यामुळे त्यांचे वागणे असंबद्ध झाले होते.
परीक्षा सुरू असताना एक दिवस अचानक मुख्याध्यापकांच्या पायावर डोकं ठेवून हमसाहमशी रडू लागले. कधी पानठेल्यावर, तर कधी रस्त्याने जाताना अनेकांनी विशालसरांना रडताना पाहिले. अन् म्हणून या वर्षी शेवटच्या दिवशी मोहाडीला जाऊन वडिलांनी सरांना घरी आणले, सर फारच कृश झाले होते. तसेही ते एकटेच नोकरीच्या गावी राहात. मॅडम नांदेडला राहात असत. कारण, तिथेच त्यांची नोकरी होती. मोठा सत्यम ५ चा अन् छोटी प्रिया दीड वर्षांची झाली. मुलांना घेऊन मॅडमला नोकरीच्या ठिकाणी नांदेडला राहाणं भाग होतं, सुटय़ांमध्ये सरांना घरी आणलं. मग त्याचं अचानक आक्रमक होणं सांभाळण्या पलीकडचं होतं. मुलीला ढकलून दिलं. बायकोला मारलं, आवरावं तरी कसं? .
म्हणून मॅडमनी ब्रह्मपुरीला अंदनकारकडे फोन केला. सरांच्या बहिणीला अंदनकार पती- पत्नी लगोलग नांदेडला आले. सर मनोरुग्ण आहेत हे कारण कुणाला माहीत नव्हतं. शिक्षण झाल्यावर नोकरीच्या शोधात ते मुंबईला गेले होते. असं म्हणतात की, तिथे ते गुंडाच्या तावडीत सापडले. गुंडाच्या मारहाणीत त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. मनोविकार तज्ज्ञांची ट्रिटमेंट सुरू होती. नेहमी एकटय़ात राहणारे सर फारसं कुणाशी बोलत नसतं. शाळेतही कामाशी काम किंवा काम केलं नाही तरी सर्वजण त्यांना सांभाळून घेत असतं. दोन मुलं झाली आता जगण्यात काही अर्थ नाही, असा त्यांचा नेहमी सूर होताच, तशात गोळ्या बंद केल्यामुळे वेडेपणाचे झटके वारंवार येऊ लागले. म्हणून ब्रह्मपुरी वरून सरांच्या बहिणीला व तिच्या यजमानांना मॅडमने बोलावून घेतले. अंदनकार पती- पत्नी देखील शिक्षक आहेत. त्यांच्या मदतीने सरांना दवाखान्यात नेता येईल, गरज पडली तर अ‍ॅडमिटही करता येईल. म्हणून मॅडमचा आटापिटा चालू होता. मदतीला नणंद आल्यावर मॅडमला जर बरे वाटले पण, सरांची तब्येत जास्तच बिघडली. रात्री घराबाहेर पडून विहिरीत जीव दिला, तर आवरायचे कसे म्हणून विचार विनिमय सुरू झाले. कुणा मांत्रिकाकडे न्यायचे का म्हणून अंगाऱ्या धुपाऱ्याचे घरात वारे वाहू लागले. पोस्टमास्टर रामटेके व इंदिराबाई घुघुसकर यांची आठवण झाली. कारण, त्यांनी एकदा सांगितलं होतं की गावाबाहेर एक दत्ताचं ठाणं आहे. तिथे आणून पहा, अंगात कसंही भूत असलं तर ते तिथे निघतचं. रात्र कशी निघेल या विवंचनेत असणारे सर्व शिक्षकांनी एका शिक्षकाला ओटय़ावर नेवून ठेवले, तो ओटा मेश्राम यांच्या घरासमोर होता. तिथे रोज दुपारी इंदिराबाई घुघुसकर व रामटेके येऊन आरती करत. जमलेले भाविक आरतीत शंभर रुपयाची नोट ठेवत. त्या नोटा घेऊन इंदिराबाई आपल्या घरी परत जायची पण, जाताना जे काही बजावून जायची त्या आज्ञाचं पालन भाविक लोक निमूटपणे करत. ती अधिकार वाणीनं अन् जबरदस्त जरबेत म्हणत असे, ‘याला बांधून ठेवा, उन्हात ठेवा, उन्हाचे चटके बसले म्हणजे अंगातलं भूत बोलू लागले. याला पाणी ही कुणी पाजू नका’.
मे महिन्याचं उन्हं पोटात कणभर अन्न नाही की घोटभर पाणी नाही. ११ मे २००१ दुपारचा एक वाजला. कडकडीत उन्हात आरती करून घुघुसकर बाई आपला भीतिदायक धाक मागे सोडून, नोटा जमा करून आपल्या घराकडे परत गेली. ३/४ दिवसांपासून सुरू असलेल्या या थरारनाटय़ाची खबर एव्हाना अं.नि.स.च्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली होती. पोलीस आले तेव्हा थोडं उशीर झाला होता. हातपाय बांधलेल्या अवस्थेत उन्हाचा चटका लागून विशाल सर नुकतेच गतप्राण झाले होते. पोलिसांनी ज्याच्या घरासमोर हा खुनी खेळ मांडला होता. त्या ओटय़ाचे मालक मेश्राम पती- पत्नी, कर्त्यां करवत्या इंदिराबाई घुघुसकर, रामटेके पोस्ट मास्तर, अंदनकार पती- पत्नी या सर्वाना खुनाच्या गुन्ह्य़ाखाली अटक केली. सर्वाना शिक्षा झाली. अन् प्रज्ञा मॅडम ? मॅडम म्हणतात, हो माझं ही चुकलंच, मी अंधश्रद्धेच्या आहारी जायला नको होतं. मी डॉक्टरकडे नेण्याचाच आग्रह धरायला हवा होता पण, मी काय करू? मी एकटी पडले. माझा आग्रह क्षीण होता. मी तेव्हा असहाय्य होते. त्यांना वाचवायला तिथे घेऊन गेलो. शिक्षा मात्र, नवऱ्याला मारण्याची भोगते आहे मी!
प्रा. विमल गाडेकर
९३७०३१०९९८