Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

उत्सर्ग आणि प्राणाश्म पाकळी
‘चांदणी चाळण आईच्या हाती असायची. फुंकणीची धून खोंदारी धुरात वाजायची. वलाणीवर वाळत घातलेल्या जुनेरातील इंद्रधनूने केलेली रंगांची चोरी व त्या पाठीमागून पळालेला सूर्यही दिसायचा. उंच धुरांडय़ावरून कुंद धुरात घार घिरटय़ा घेत जायची, तेव्हा निळाईच्या भाळी दारातील निष्पर्ण पांगाऱ्यावरील एक झुंबर झुलायचे. संध्याकाळी शाळेच्या वळणावरील कातळ भिंतीकडेची वाऱ्याची धुम्मस आणि आटोपती घ्यावी लागलेली पिंढऱ्यांवरील ओघळती सू..इवल्याशा हातात धागा पकडून गरम फुफाटय़ातून पळताना, पाठीमागे अडकलेला पतंग विजेच्या तारांतील ‘बुंग’ ऐकत खटय़ाळपणे हसायचा.’ पुनप्र्रत्ययाची ताकद आणि आयुष्यभर साथ देणाऱ्या आठवणींची ही काही कवितारुपी पिसे ‘उत्सर्ग आणि प्राणाश्म पाकळी’ या कवितासंग्रहात डॉ. अनंत मोकळ यांनी गोळा केलेली आहेत. स्वत:च्या गुंतागुंतीच्या भावविश्वाचे उत्खनन डॉ. मोकळ यांनी या संग्रहात केले आहे. प्रसिद्ध विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी ‘वाताहतींना हसत सामोरे जावून अत्तसूर्यत्व निर्मू पाहणारी कविता’ असे वर्णन करून कवितासंग्रहाला उचित न्याय दिला आहे. कवी डॉ. अनंत मोकळ हे फिजिशियन आणि सर्जन आहेत. वृत्तीत असलेली संवेदनशीलता त्यांना कवितेच्या स्वरुपात स्फूरली आहे. मुखपृष्ठ, मलपृष्ठ व आतील रेखाटने डॉ. मोकळ यांची आहेत. सर्जनशील कवीमनाची साक्ष देणारा त्यांचा हा पहिलावहिला कवितासंग्रह वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल. ठाण्याच्या डिंपल प्रकाशनच्या नम्रता मुळे यांनी पुस्तक प्रकाशित केले असून पुस्तक मूल्य १२० रुपये. अधिक माहितीसाठी डॉ. अनंत मोकळ ९५२५१- २५५०५३७ किंवा नम्रता मुळे ९५२५०-२३३५२०३ यांच्याशी संपर्क साधता येईल.
कथा चातुर्याच्या लाल-बाल-पाल
आणि असे जगू या
दहावी बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर सुट्टय़ांचा विचार करून ‘कथा चातुर्याच्या’, ‘लाल बाल पाल’ आणि ‘असे जगू या’ सारखी बोधपर पुस्तके ज्ञानेश प्रकाशनच्या शैलजा काळे यांनी बाजारात आणली आहेत. चातुर्य कथांमध्ये कृष्ण, अर्जुन, बिरबल आणि तेनालीरामा आदींच्या चातुर्य कर्था रंगवल्या आहेत. भारतात स्वातंत्र्याची मशाल पेटवली ती लोकमान्य टिळक, लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र पाल यांनी. या तीन अग्रगण्य नेत्यांबद्दल ‘लाल बाल पाल’मध्ये लिहून आले आहे. जीवन अधिक सुंदर, अर्थपूर्ण बनवता येईल, हे अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत सांगण्याचा प्रयत्न शैलजा काळे यांनी ‘असे जगू या’मध्ये केला आहे. अधिक माहितीसाठी ०७१२-२२२७४७९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
ज्योती तिरपुडे
९४२१८०१८७८