Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘मधमाशी!’
छोटा मोहित! त्याच्या बालमनाला खरंच वाटलं सगळं! तो आजीला विचारू लागला, ‘होऽऽ पणजीकडे खरंच असं ‘इन्व्हिजिबल’ घडय़ाळ आहे?’ मोहितच्या मोठय़ा डोळ्यातलं आश्चर्य पाहून सर्वानाच हसू आलं. तसे मोहितचे आजोबा त्याला आपल्या मांडीवर बसवत म्हणाले, ‘मोहित बेटा! असं एकच गुप्त घडय़ाळ आहे आणि ते आहे देवाजवळ! सूर्याच्या किरणांचे काटे असलेलं आणि पृथ्वीच्या फिरण्यावर (परिवलनावर) चालणारं!’ मोहितला यातलं काऽऽही समजलं नव्हतं. निरागस चेहऱ्यानं डोळ्यात प्रश्नचिन्ह घेऊन एकटक आपल्या आजोबांकडे तो पहात होता.
पणजीनं त्याच्या केसात हात फिरवला. म्हणाली, ‘बाळा, कळेल हो तुला सुद्धा हे देवाचं घडय़ाळ, समजायला लागेल. त्यासाठी देवाची प्रार्थना रोज करायची नि खूप शिकून खूप मोठ्ठं व्हायचं!’
‘.. म्हणजे मघाशी तू शिकवलेली ना! ओके! डन! मी रोज म्हणणार.’
मोहितनं पणजीचा हात हातात घेऊन तिला ‘प्रॉमिस’ केलं.. पणजी आजी लगबगीनं उठत म्हणाली, ‘चल मधू, ती केळीची पानं जरा व्यवस्थित कापून आण बघू! सुनीता चल धुवून-पुसून पान मांड.. चला रे पोरांनो न्याहारी करायला.’
‘न्याहारी?’ पण, पोहे-उपमा-शिरा-इडली- डोसा कशाचीच तयारी तर नाही दिसत. ना ही कशाचा वास पण येत! मग ही आजी कसली न्याहारी (नाश्ता) देतेय?’ सगळ्या नातवंडा-पतवंडांना मोठ्ठा प्रश्न पडला होता.. आणि इतका वेळ तर आपल्याशी बोलत होती! मग तिनं नाश्ता बनवला तरी कधी?’
मुलं निमूटपणे येऊन गोल पंगत करून बसली.. त्यांचे आई-बाबाही बसले. आजी एक मोठ्ठं वाफाळलेलं पातेलं घेऊन आली आणि प्रत्येकाला वाढू लागली. गरम-गरम गुरगुटय़ा भात त्यावर जात्यावर घरी दळलेलं मेतकूट नि घरीच कढवलेलं साजूक तूप; जोडीला पोह्य़ाचा भाजलेला पापड..! मुलं या नव्या मेनूवर अक्षरश: तुटून पडली.
‘आवडलं का रे..?’ पणजी-आजीचा प्रश्न.
मुलांना बोलायला वेळ कुठे होता? हातानेच ‘मस्त!’ अशी खूण करून ती ताव मारत राहिली..
‘बरं का मुलांनो, तुमचे आई-बाबा ही अशीच न्याहारी करून शाळेत जायचे बरं रोज..! दुपारच्या सुट्टीत येऊन जेवायचे!’ आजी सांगत होती.
‘पण, आजी तू हे केलंस तरी कधी?’ निखिलनं इतका वेळ मनात दडवलेल्या प्रश्नाला वाट करून दिली.
‘अरे बाबांनो तुमची ही आजी-पणजी म्हणजे ‘मधमाशी’ आहे ‘मधमाशी..!’ म्हणजे ती कसं सतत काहीतरी काम करतच असते. तशी ही सतत काहीतरी कामात व्यस्त..! सकाळी लवकर उठून स्नान-पूजा, सडा-संमार्जन आटोपत असते; तोपर्यंत चुलीवर मऊ भात चढवलेला असतो. दिवसभर हे सत्र सुरूच असतं तिचं!’ सुहास आपल्या भाचेकंपनीला सांगत होता. आम्हाला एक कविता होती ‘मधमाशीची!’ कवीचं नाव नाही आठवत पण, कविता आठवते.
‘उठुनी सकाळी ती मधमाशी
जाते की मध मिळवायासी
थेंबे थेंबे साठवी त्यासी।। ..
उद्योगी मोठी ।। १।।
आळस तिजला ठाऊक नाही
सर्व दिवस ती खपते पाही
‘थंडी ऊन्ह’ म्हणेना काही।। ..
उद्योगी मोठी ।। २।।
गोड गोड मध निपटुनि घेते
थोडा म्हणुनी मुळी न रूसते
साठवुनी तो जपुनि ठेविते।। ..
उद्योगी मोठी ।। ३।।
थोडाही गुण मिळतां घ्यावा
साठा त्याचा नित्य करावा
कोणालाही तो शिकवावा
ठेवा हे चित्ती ।। ४।।
‘आजी तुला पण होती ही कविता?’ रोहितनं विचारलं.. ‘नाही रे, ही तुमची वडीलमंडळी तुझ्यासारखी आठवीत नवनीत असतील त्यावेळी त्यांच्या पुस्तकात होती हो!’ आजी म्हणाली.. ‘पण रोहित, या कवितेच्या शेवटच्या ओळी महत्त्वाच्या!’
‘आमच्यासाठी एकदम लागू!’ सोनल म्हणाली. आता ऑफिसमध्ये दमतो म्हणून आणि पूर्वी अभ्यासाचा कंटाळा म्हणून सुट्टीच्या दिवशी आम्ही नुसता आळस करायचो नि आता हातात पैसा आहे म्हणून जीवाची चैन करत बसतो इतकंच!’
‘.. बरं झालं बाई, तूच कबूल केलंस आपल्या तोंडानं ते..! अगं सेव्हिंग कर! सेव्हिंग कर! म्हणून सांगून थकले मी. सोनलच्या आईनं मध्येच तोंडसुख घेतलं.. ‘वेळ मिळाला थोडा की जरा घरातली चार काम शिकावी.. पण, नाही टी.व्ही.समोर बसायचं नि फास्ट फुड खायचं!’
‘आई बघितलंत ही सोनल-मिनल, राहुल-निखिल सगळे पंचविशीच्या घरातले पण, वाटतायत तिशीचे..! व्यायाम नाही नि घरकामही नाही..! बाहेरचे तळलेले पदार्थ हादडायचे नि झोपा काढायच्या नुसत्या! शिळावळ संपवतो मग आम्ही!’ ..आजीच्या मोठय़ा सूनबाईनंही मन रिकामं करून घेतलं.
सोनल निर्लज्जपणे म्हणाली, ‘आजी तू मात्र एकदम सॉलिड ‘मेन्टेन्ड’ आहेस हं या वयातही!’
सोनलचा होरा आपल्या आईच्या दिशेनं वळतोय हे आजीच्या लक्षात आलं. आजी म्हणे.. ‘सोनल काय आहे, गेलेला क्षण वाळूसारखा हातातून निसटून गेलेला असतो. तो पुन्हा परत आणायचा म्हटलं तर अशक्य! मग आताचा क्षण जगता जगता थोडी बंधनं पाळली तर आयुष्याचे पुढचे सगळे क्षण सुखाचे होतात.. असं थोरा-मोठय़ांनी उपदेशून ठेवलंय. आपण फक्त आचरणात आणायचं इतकंच!’
रोहित यावर सोननला चिडवायला लागला,
‘आनेवाला पल जानेवाला है
हो सके तो इसमें जिंदगी बिता दो
पल ये भी जानेवाला है..’
‘तसं नाही हं रोहित’.. आजीनं त्याला अडवत म्हटलं कवी केशवसुतांच्या कवितेसारखं..
‘गडबड घाई जगात चाले
आळस डुलक्या देतो पण;
गंभीरपणे घडय़ाळ बोले
‘आला क्षण, गेला क्षण’ ।। १।।
घडय़ाळास या घाई नाही;
विसावाहि तो नाही पण,
त्याचे म्हणणे ध्यानी घेई
‘आला क्षण, गेला क्षण’ ।। २।।
कर्तव्या जे तत्पर त्यांचे
दृढ नियमित व्हावयास मन,
घडय़ाळ बोले आपुल्या वाचे
‘आला क्षण, गेला क्षण’ ।। ३।।
कर्तव्याला विमुख आळशी
त्यांच्या हृदयी हाणित घण,
काळ-ऐक! गातो आपुल्याशी
‘आला क्षण, गेला क्षण’ ।। ४।।
लवाजम्याचे हत्ती झुलती
लक्ष त्याकडे देतो कोण,
मित रव जर हे सावध करिती
‘आला क्षण, गेला क्षण’ ।। ५।।
आनंदी आनंद उडाला,
नवरीला वर योग्य मिळाला!
थाट बहुत मंडपात चाले,
भोजन, वादन, नर्तन, गान!
काळ हळू ओटीवर बोले,
‘आला क्षण, गेला क्षण’ ।। ६।।
कौतुक भारी वाटे लोकां
दाखविण्या पाहण्या दिमाखा,
तेणें फुकटचि जिणें होतसे
झटा! करा तर सत्कृतिला!
सुचवित ऐसे काळ वदतसे
‘क्षण आला, क्षण गेला!’ ।। ७।।
वार्धक जर सौख्यात जावया
व्हावे पश्चात्ताप नुरुनियां
तर तरुणा रे! मला वाटते,
ध्यानी सतत आपुल्या आण
घडय़ाळ जे हे अविरत वदते,
‘आला क्षण, गेला क्षण!’ ।। ८।।
उमा विसुभाऊ बापट
(०२२) २४३६ ०४६०