Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

ज्ञान, अज्ञान आणि आनंद
साडी खरेदी करणं म्हणजे एक दिव्यच. दहा दुकानं पालथी घालायची, दिवस घालवायचा, ‘तुमच्यासारख्या भिकार लोकांनी काय खरेदी करावी? तुमची औकातच नाही,’ अशा अर्थाच्या दुकानदाराच्या नजरा सहन करायच्या आणि मग दिवस कारणी लावण्यासाठी एखादी पसंत करायची. अशा या दिव्यातून जात परवा एक साडी खरेदी केली. पॅटर्न, पोत, रंगसंगती सगळं कसं नवीन वाटलं. किंमतही वाजवी. बऱ्यापैकी आनंदात होते. हौसेनं नेसले. कौतुकभरल्या, ईर्षांभरल्या नजरांच्या कल्पनेत तरंगतच बाहेर पडले. मैत्रीण म्हणाली, ‘‘तूही घेतलीस ही साडी? सगळीकडे झालंय हे पॅटर्न.’’ एवढं म्हणून थांबली नाही ती. किंमत विचारली आणि त्यावर मोलाचं भाष्य केलं, ‘‘किमान दीडशे रुपयांनी महाग लागली. त्या ‘लाजरी’मध्ये फक्त साडेचारशेला घेतली परवा माझ्या भाचीने.’’ झालं माझ्या आनंदाचं दूध नासलं. मी फसले होते याचं ज्ञान झालं आणि आनंद संपला.
जीवनात किती तरी वेळा, नेहमीच साध्यासुध्या गोष्टीतील आनंद हे ज्ञान हिरावून घेतं. वाटत राहतं - अमुक गोष्टीबद्दल अज्ञानच असतं तर बरं झालं असतं.
अनंत काणेकरांच्या ‘अज्ञानातील आनंद’ हा निबंध अशा वेळी आठवतो. त्यातील तो गलेलठ्ठ मुलगा. सगळे त्याला ‘हिप्पोपोटॅमस’ म्हणतात. शब्दाच्या आकारावरून आणि उच्चारावरून भारदस्तपणावरून काही तरी मोठी पदवी आपल्याला मिळतेय, या भ्रमात ते भाबडं पोर अतिशय आनंदात असतं. पण एकदा तो प्राणिसंग्रहालयात जातो आणि बघतो एक प्राणी. अत्यंत बेढब, लठ्ठ, थुलथुलीत, सगळीकडून ओघळत असल्यासारखा. मन लावून हसतो तो त्याच्याकडं बघताना. पण परतताना समोर पाटी दिसते. ‘हिप्पोपोटॅमस’. बापडय़ा त्या पोराचा आनंद या ज्ञानाने कसा नासून गेला असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्याच्या अज्ञानाने त्याला, तत्कालिक का होत नाही, दिलेला आनंद ज्ञानाने हिसकावला.
ख्रिश्चन पुराणात (ठी६ ळी२३ंेील्ल३) माणसाच्या निर्मितीची कथा आहे. परमेश्वराने ईडन नावाची सुंदर बाग (ही सृष्टी) निर्माण केली. त्या बागेत पहिला मानव अ‍ॅडम व त्याच्यासोबत पहिली स्त्री ईव्ह यांना पाठवलं. ही अवघी बाग, या बागेतील अवघी सुखं या दोघांची होती. तीत त्यांचा मुक्त संचार. निर्भेळ आनंदात जगत असतात. एकच अट होती. बागेत एक विशिष्ट झाड होतं. त्या झाडाचं फळ मात्र त्यांनी खायचं नव्हतं. परमेश्वराचा शत्रू सैतानाला हे सुख बघवेना. एका सापाचं रूप घेऊन एके दिवशी तो ईव्हच्या कानात कुजबुजला, ‘दुष्टपणे देवाने तुम्हाला या फळापासून वंचित ठेवलंय. ते खाल तर तुम्हीही देवाइतकेच शक्तिशाली व्हाल.’ ईव्ह आणि अ‍ॅडम मोहाला बळी पडतात. ईश्वराची आज्ञा मोडून ते फळ खातात आणि प्रथमच ‘शरम’ या भावनेने त्रस्त होतात. म्हणतात, तिथून त्यांच्या दु:खाला, माणसाच्याच दु:खाला सुरुवात झाली. ते ज्ञानाचं झाड होतं, ते ज्ञानाचं फळ होतं. ते खाल्लं आणि त्यांचा निखळ आनंद संपला!
अज्ञानाची वकिली करण्यासाठी हा शब्दप्रपंच नाही. ती तशी करताच येत नाही. ज्ञान तर स्वयंभू, स्वयंप्रकाशित, त्याचं महत्त्व शब्दातीत. कालातीत. ‘ज्ञानेचिये सरी न पवति’. ज्ञानातून मिळणाऱ्या चिरंजीव आनंदालाही तोड नाही. तो मिळवणं हेच तर माणसाच्या जीवनाचं प्रयोजन. हा स्वच्छ, निखळ, चिरंतन आनंद देणारं ज्ञान. ते मिळविण्याच्या ध्यासातून तर माणूस अश्मयुगापासून अवकाशयुगापर्यंत, चकमकीच्या ठिणगीपासून ते न्यूट्रॉनपर्यंत पोहोचला. या ज्ञानाचीही एक गंमतच. ते मिळेल तो तो माणसाला अज्ञानाची जास्त जाणीव होते. आईनस्टाईन म्हणायचा म्हणे, ‘मला इतकंच ज्ञान झालंय की मला फार कमी ज्ञान आहे.’ आद्य ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटिसही म्हणायचा, ‘मला शहाणा समजतात लोक कारण मी एकच माणूस असा आहे की, ज्याला माहीतंय की त्याला अत्यल्प ज्ञान आहे.’
जीवनात ज्ञान आलं की सोबत संघर्ष येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्याआधी म. फुल्यांनी शोषितांची अस्मिता जागी केली. आपण ‘शोषित’ आहोत याचं ज्ञान त्यांना झालं. त्या दु:खाच्या जाणिवेतून व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष सुरू झाला. असा हा ज्ञानाचा प्रकाशमान प्रवास. त्याचं महत्त्व इतकं वादातीत की, सॉक्रेटिसने विषाचा प्याला स्वीकारून त्याची किंमत चुकवली. गॅलिलिओने जन्मठेप सोसली.
अज्ञानाने तर कायम अनर्थच केलेत. तरीही थोडंसं धाडसानेच म्हणावंसं वाटतं - अज्ञानातही आनंद असतोच. कधी कधी त्याच्यामुळं सुसह्य़ बनतं जीवन. तात्पुरता असेल तो आनंद, पण तेवढय़ापुरतं ते सत्यच असतं. मृत्यू हे जीवनातील एकमेव चिरंतन सत्य. जीवन कळू लागल्यापासून माणसाला त्याची जाणीव होते. पण ती सुसह्य़ होते एका अज्ञानामुळे. ते अज्ञान असते ‘मृत्यू के व्हा नि कसा येणार?’ याचं. हे जर कळू लागलं तर जीवनातला अवघा आनंद जळून खाक होईल.
अंतोन चेकॉव्ह या जगद्विख्यात कथाकाराची एक छोटीशी कथा आहे. ‘वेंका’. वेंका हा एक पोरका पोर. फक्त आजोबा असतात त्याला. वार्धक्यामुळं त्यांच्यानं काम होत नाही. पोटापाण्यासाठी वेंका मॉस्कोला जातो. तिथं एका हॉटेलात नोकरी करू लागतो. हॉटेलमालक उलटय़ा काळजाचा. खूप त्रास देतो वेंकाला. एके दिवशी वेंका मोडक्या-तोडक्या शब्दात आजोबाला पत्र लिहितो. ‘मला इथे खूप त्रास दिला जातो. खूप काम करावं लागतं. पोटभर खायला देत नाहीत. आज तर मला मालकाने खूप मारलं. आजोबा, मला इथून घेऊन जात. मला कोणंय तुमच्याशिवाय?’ अशा अर्थाचं काळीज हेलावून सोडणारं पत्र तो बंद करतो. त्यावर ‘गावाक डच्या आजोबास’ असा पत्ता लिहितो. थोडा वेळ विचार करून त्याखाली आजोबाचं नावही लिहितो आणि उत्तेजित मनाने पत्र पोस्टाच्या पेटीत टाकतो. पत्र आजोबाला मिळणार. आजोबा येऊन घेऊन जाणार, अशी स्वप्न रंगवीत काम करीत राहतो. कथा इथं संपते. पण वाचकाच्या मनात सुरू होते. वाचकाला ज्ञान असते की पत्र आजोबाला पोहोचणार नाही, वेंकोचे हाल संपणार नाहीत. तो अस्वस्थ होतो. वेंकाचा अज्ञानातून आलेला आनंद सुंदर की वाचकाची ज्ञानातून आलेली अस्वस्थता अर्थपूर्ण? प्रश्नाला पूर्ण उत्तर नाही. कोणत्याही गोष्टीबाबत मानवी जीवनात अंतिम सत्य नाही, हेच एक अंतिम सत्य.
ललिता गादगे