Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

एकाग्रता
सध्या सर्वत्र परीक्षेचे वातावरण आहे. बारावीची परीक्षा आटोपली आणि दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. शाळेतल्या इतर वर्गाच्याही परीक्षा सुरू झाल्या आहेत, विद्यापीठातील परीक्षांसाठी विद्यार्थी तयारीला लागले आहेत. एकूण काय की आपल्या आणि आपल्या आजूबाजूच्या घरांमध्ये रात्री उशीरापर्यंत अभ्यासासाठी जागणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे दिवे जळतांना दिसू लागले आहेत. या साऱ्या पाश्र्वभूमीचा तपशील एवढय़ासाठीच, कारण आज आपण परीक्षेतील यशासाठी लागणाऱ्या ‘एकाग्रता’ याविषयावर माहिती बघणार आहोत.
‘एकाग्रता’ या शब्दाबरोबरच सर्वाना काही परवलीच्या सूचना हमखास आठवल्या असतील. ‘बाळा, नीट लक्ष दे बरं’, ‘ध्यान देना पढाई में बेटा’, ‘कॉन्सन्ट्रेट किड्स’.. वगैरे, वगैरे सूचनांचा आई, बाबा, भाऊ-बहीण, टीचर आदींनी केलेला भडिमार आठवला असेल, नाही का? जो येईल तो एकच सांगतो, ‘कॉन्सन्ट्रेट कर’.
पण, हे ‘कॉन्सन्ट्रेशन’ कसे करावे,हे कोणीच सांगत नाही. आणि कसे सांगणार? त्यांच्या काळातही शिक्षक त्यांना केवळ ‘कॉन्सन्ट्रेट कर’ एवढेच सांगत होते, आणि आजही तेच आणि तेवढेच सांगत आहेत. पण हे ‘कॉन्सन्ट्रेशन’ कसे करावे हे आज आपण बघणार आहोत.
‘कॉन्सनट्रेट’ करणे म्हणजे ऐकण्याची क्षमता विकसित करणे. हे काहीसं तुम्हाला चमत्कारिक वाटेल. कारण ऐकण्याची क्षमता कशी विकसित करावी याची माहिती कुठल्याही पाठय़पुस्तकात मिळणार नाही. पण लक्षपूर्वक ऐकणे किंवा बघणे ही एक कला आहे. ‘ऑफ लिसनिंग, ऑब्जव्‍‌र्हिंग’ असेही तिला म्हणतात. ही कला आपल्या पूर्वजांनी विकसित केली आहे.. योगाच्या माध्यमातून!
आपल्या शरीरात विराजमान असलेला एक ‘देवपुरुष’ आपल्या पाच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून कोणताही ‘ज्ञान विषय’ आपल्या मनाच्या, बुद्धीच्या सहाय्याने समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याला आपण ‘आत्मा’ किंवा ‘अंगुष्ठमात्र पुरुष’ म्हणतो. तो आहे आपल्या हाताच्या अंगठय़ा एवढा. प्रत्येकाने आपली मूठ बंद करून अंगठा आकाशाच्या दिशेने उभा धरला की अंगठय़ाचा जेवढा भाग दिसतो, तेवढाच तो आहे. त्याचे स्थान आहे आपले हृदय. छातीच्या पिंजऱ्यात सुरक्षित असलेल्या आपल्या हृदयाचा बराचसा भाग छतीच्या डाव्या बाजूला असला तरी त्याचा एक छोटासा कोपरा छातीच्या उजव्या भागात आलेला आहे. तो अंगठय़ाएवढा भाग म्हणजेच ‘अंगुष्ठमात्र पुरुष’!
आपले हे अंगठय़ाएवढे आत्मतत्व कोणताही विषय शिकतांना डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा यांचा उपयोग करून त्या-त्या माध्यमातून मिळणारे ‘ज्ञान’ मेंदूत साठवून घेते. अर्थातच यात ‘मन’ हे एक प्रभावी घटक आहे व प्रत्येकवेळी ते उपस्थित हवेच असते. हेच थोडे अधिक स्पष्ट करून बघू या..
अर्जुनाने खाली पाण्यात पाहून वर चक्रावर फिरणाऱ्या मत्स्याच्या डोळ्याचा वेध घेतला अथवा राजा दशरथाने श्रावणबाळाच्या घागरीचा पाणी भरतांना होणारा आवाज ऐकून केलेला ध्वनिवेध. ही दोन्ही उदाहरणे उत्तम एकाग्रतेची आहेत. आणि त्याचप्रमाणे ती ‘स्किलफुल लर्निग’ची देखील उत्तम उदाहरणे आहेत. एका विशिष्ट पद्धतीने अभ्यास केला म्हणूनच त्यांना या कौशल्यासाठी लागणारी एकाग्रता अंगी बाणता आली, असेही आपण म्हणू शकतो.
वर्गात उपस्थित ४०-५० विद्यार्थ्यांमध्ये आपण बसलेलो असतो. शिक्षक ब्लॅक बोर्डवर एखादे वाक्य किंवा समीकरण लिहितात. ते आपल्या डोळ्यांद्वारे ग्रहण करून मनाच्या मदतीने मेंदूपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया घडते, त्याच वेळेस फळ्यावरील वाक्य लिहितांना शिक्षक तोंडाने काहीतरी सांगतही असतात, तेही आपल्या कानांद्वारे त्याचवेळी मेंदूत यशस्वीरित्या पोहोचवले जाते व ते वाक्य आणि समीकरण नेहमीसाठी आपल्या लक्षात राहते. ही क्रिया आपल्या थोडय़ाशा प्रयत्नाने घडून येते. ते प्रयत्न म्हणजेच ‘कॉन्सन्ट्रेशन’ किंवा ‘एकाग्रता’ होय.
‘मी अभ्यासू विद्यार्थी आहे, दिन प्रतिदिन प्रत्येक बाबतीत मी त्यात सर्व मार्गानी अधिकाधिक यशस्वी होत आहे.’ हे वाक्य एकाचवेळी डोळा व कानांद्वारे मन:पटलावर उमटले की ते एखाद्या चित्रासारखे मेंदूच्या ‘मेमरी’ नावाच्या ‘लाईब्ररी’मध्ये जमा होईल, आणि मेंदूत विविध ज्ञानेंद्रियांद्वारे पोहोचणारे ज्ञान साठवले जाऊन ते तुम्हाला खरोखरीच यशाची पायरी चढवत नेईल.
ही सारी प्रक्रिया एका क्षणात घडत असते. पापणीची उघडझाप होते, अगदी तेवढय़ा वेळात! ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडून ‘कॉन्सन्ट्रेशन’ करता येते. या प्रक्रियेलाच ‘चंचल मन’ या आपल्या ‘वीक-पॉईंट’मध्ये बदल करणे असेही म्हणतात. थोडक्यात काय की, डोळे व कान आणि त्यांच्यासोबत मन-बुद्धी-शरीर यांचा सर्वोत्तम ताळमेळ असलेली कृती म्हणजेच ‘कॉन्सन्ट्रेशन’ होय. म्हणजेच डोळे-कान-मन-बुद्धी-आत्मा यांना एका माळेत गुंफून ‘ऊर्जा’ निर्माण करून आपले कार्य सिद्ध होणे म्हणजेच यश होय. हे सगळे घडण्यासाठी सकारात्मक भाव व प्रयोगशीलता हवी.
एक छोटासा प्रयोग आपण नेहमी बघतो. उन्हात एखाद्या कागदावर धरलेले भिंग लाखो सूर्यकिरणांना एकत्रित करून ऊर्जा निर्माण करते व कागद जाळते, तसेच हे ‘कॉन्सन्ट्रेशन’ किंवा ‘एकाग्रता’ होय.
आपल्या जीवनातील यशासाठी एका गीतातील दोन ओळी सांगतो..
हम को मन की शक्ति देना, मन विजय करे।
दुसरों की जय से पहले, खुद की जय करे।।
थोडक्यात म्हणायचे तर, आपले शरीर ज्या कामात व्यस्त आहे त्याच कामात मन, बुद्धी, भावना त्याच क्षणी उपस्थित असणे म्हणजे ‘एकाग्रता’ अथवा ‘कॉन्सन्ट्रेशन’ होय. मग हे मिळविण्यासाठी एक मंत्र अवश्य म्हणा.. लिहून घ्या..
‘दिन-प्रतिदिन प्रत्येक बाबतीत मी सर्व मार्गांनी अधिकाधिक यशस्वी होत आहे.’ हा मंत्र तुम्हांला नक्की यशस्वी करेल! माझ्या शुभेच्छा!!
मुकुल गुरू
९३७१५३८६४५