Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मी शेंगा खाल्ल्या नाही..
झुकू झुकू झुकू झुकू अगीन गाडी ।
धुरांच्या रेषा हवेत काढी ।।
पळती झाडे पाहू या ।
मामाच्या गावाला जाऊ या ।।
नागपूर आकाशवाणीवर कुंदाताई आणि अरविंद मामांचा ‘बालविहार’ प्रसारित होत होता. बंडूकाका वस्तीतल्या बाळगोपाळांसह रेडिओवर प्रसारित होणारी बालगीतं ऐकण्यात गुंग झाले होते. बाल-बालिकांवर चांगले संस्कार व्हावे म्हणून त्यांनी आठवडय़ातून एकदा प्रसारित होणारा ‘बालविहार’ मनोभावे ऐकावाच, अशी त्यांची सक्त ताकीद असायची. बंडूकाकांमुळेच मुलांनाही ‘बालविहार’चा नाद लागला होता. एखाद्या रविवारी बालविहार प्रसारित झाला नाही तर मुले कासावीस होऊन जात. कुठल्याशा दुर्घटनेमुळे राष्ट्रीय शोक पाळण्याची घोषणा झाल्यामुळे आदल्या रविवारी बालविहारवर संक्रांत कोसळली होती. त्यामुळे आज बालविहार ऐकण्यासाठी फुल कोरम होता.
मामाच्या गावाला जाऊ या.. हे गाणे ऐकताच बंडूकाका भूतकाळात गेले. लहानपणी मामाच्या गावाला गेल्यावर केलेल्या गमती-जमती त्यांच्या डोळ्यापुढे रुंजी घालू लागल्या. मामाच्या वाडीत पाटाचे पाणी सोडण्यासाठी करावी लागणारी कसरत, शेतातील पेरणी, निंदणासाठीची धावपळ, पिकं आणि पालेभाज्या हाताशी आल्या की, बैलबंडीत टाकून त्या नजिकच्या बाजारापेठेत विक्रीसाठी नेण्यासाठी करावी लागणारी कसरत त्यांना आठवली. गावातल्या मुलांबरोबर नदीत डुंबणे आठवले. वडीलधाऱ्या मंडळींच्या अनुपस्थितीत करावी लागणारी देवपूजासुद्धा त्यांच्या डोळ्यापुढे साक्षात उभी ठाकली. वावरात अथवा वाडय़ांमध्ये कुणी रखवालदार नाही, हे बघून पेरू, आंबा, चिंचा आणि चिचबिलाईच्या केलेल्या चोऱ्याही त्यांना आठवल्या. अनेकवार चोरी करताना चौकीदाराच्या हाती लागल्याने त्यांच्या वडीलांची झालेली बदनामी आणि प्रसंगी सवंगडय़ांसोबत खावा लागलेला बेदम मारही त्यांना हुडहुडी भरवून गेला. उन्हाळ्यात तर बंडूकाका मामाच्या गावी ठाणच मांडून बसत. या दिवसात रानमेव्याची मजा काही औरच असे. त्यासाठी करावी लागणारी कसरतही त्यांना आठवली.
मामाच्या गावाला कचरं खूप सुंदर मिळत. हीच कचरं हिंदीभाषिक राज्यात कचरकांदा म्हणून ओळखली जातात. तळ्यातील वेलींवर पाण्याखाली कचरं लगडलेली असत. ती तोडण्यासाठी चिखलतोड करावी लागे. प्रसंगी पाण्यात बुडण्याची अथवा चिखलात रुतण्याची भीतीही असायची पण, जीव धोक्यात टाकूनही सवंगडय़ांबरोबर चोरलेली कचरं आणि ती लपून खाण्याचा घेतलेला आनंद आठवून बंडूकाकांना या वयातही हसू फुटलं. काळे कुळकुळीत, दिसायला कुरूप बोराएवढे पण, लंबोळके फळ म्हणजे कचरं. वरची केसाळ साल दातानं सोलायची आणि आतील बटाटय़ासारखे गोडसर फळ चवीनं चाखायचं, हा उन्हाळ्यातला एक कार्यक्रमच असे. भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आदी झाडीपट्टीत आढळणारा आणखी एक रानमेवा म्हणजे खिरण्या. कडुलिंबाच्या लिंबोण्यांसारख्या दिसणाऱ्या पिवळ्या रंगाच्या पिकलेल्या खिरण्या फक्त उन्हाळ्यातच नजरेला पडतात. नजिकच्या जंगलातून वेचलेल्या खिरण्या बाजाराच्या दिवशी विकायला येत असत. या आंबट-गोड खिरण्यांनी अनेकदा बंडूकाकांची भूक शमवली होती.
याच काळात मिळणारी चारंही अफलातून म्हणावी लागतील. बारक्या बोरांच्या आकाराची हिरवी-पोपटी किंवा लालसर चारं अमृतासारखी लागतात. एखाद-दुसरी चाखायला घेतली तर मन भरत नाही. शेर-दीड शेर चारं पोटात गेल्याशिवाय पोटाचा दाह शांत होत नसे. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, या चारांच्या बिया फोडल्या की, त्यातून चारोळ्या निघत. त्यामुळे एकाच वेळी दोन वस्तू खाल्ल्याचा आनंद उपभोगता येई.
टेंभुर्णीच्या झाडाला लागलेली हिरवी फळं म्हणजे टेंभरं. उन्हाळ्यात टेंभरं पिकून पिवळी धम्म झाली की, ती खाण्याचा मजा काही औरच असतो. ही फळंदेखील झाडीपट्टीची म्हणून ओळखली जातात. उंबराच्या आकाराच्या या टेंभरांनाही बंडूकाकांनी अनेकदा त्यांच्या पोटात जागा दिली होती.
चारांची लहान आणि शिडशिडीत बहीण शोभावी, अशा येरोण्यांच्या जंगलात खूप वेली असत. याच येरोण्या बाजाराच्या दिवशी गावात विकायला येत. मामाकडे नको त्या दिवशी येरोण्या आणण्याचा आग्रह धरल्यामुळे त्याने बंडूकाकांना अनेकदा फटकारले होते. मुळातच लहान आकाराच्या आणि त्यातही कमी गराच्या म्हणून येरोण्यांना बाजारात फारशी किंमत नसे पण, तरीही कच्ची-बच्ची दगड-माती-गोटे सोडून काहीही खायला तयार असत. घरातल्या बायकांच्या डोक्यालाही परस्पर दुपारच्या वेळी मुले बाहेरच्या-बाहेर काहीतरी खाऊन येत म्हणून शांतता असे.
विचारांचा प्रवाह सुरू असताना बंडूकाकांच्या नजरेपुढे शिंदोडेसुद्धा आले. उंचच्या उंच शिंदीच्या झाडाला लागणारी ही फळं तोडण्यासाठी मुलांना महत्प्रयास करावा लागे. कारण, शिंदीच्या सरळसोट झाडावर चढण्याचं अग्निदिव्य कोणीच करू शकत नसे पण, पिकलेले केशरी रंगाचे शिंदोडे गोड-तुरट चवीसाठी प्रसिद्ध असत. किंबहुना, खजुरासारखी त्याची चव असे. या झाडाच्या शेंडय़ावर लगडलेल्या फळांच्या दिशेनं १० दगड भिरकावल्यावर एखाद दुसरा शिंदोडा खालच्या काटेरी झाडीत कुठंतरी पडे. मोठय़ा मुलांनी दगड मारायचे आणि सोबतच्या बाळगोपाळांनी शिंदोडे वेचायचे, हा कार्यक्रम दिवसभर उन्हातान्हातही चालायचा. नंतर मिळून मिसळून शिंदोडय़ांवर ताव मारला जायचा. याच शिंदीच्या झाडापासून निरा तयार होतो आणि फर्मेंटेशनमुळे दुपारनंतर त्याची ताडी होते, हे आठवून बंडूकाकांची किक् लागली. बंडूकाकांची नजर हळूहळू पुढे सरकत असताना त्यांना कवठं, मोहफुलं, बेलफळं, जांभळं, बकुळीच्या झाडाची लंबोळकी फळं, पिटूंडीच्या झाडाची फळं (शाईचं झाड), उंबरं, सैतुक, चिंचा आदी कितीतरी फळांबाबतच्या आठवणी ताज्या झाल्या. चंद्रज्योतीच्या बियांच्या अतिसेवनामुळे दोन दिवस गुंगीत पडून राहण्याचा प्रसंगही अंगावर कापरं आणून गेला.
बंडूकाकांची नजर भिरभिरतच होती. एव्हाना अरविंद मामा आणि कुंदाताईंनी जयहिंद केल्यानं आकाशवाणीवरील बालविहार आटोपला होता. बंडूकाका आठवणीतून बाहेर आले अन् समोर बघतात तर काय सारी बालगोपाल मंडळी घरात उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगांची टरफलं पसरवून पसार झाली होती. शेजारचा गोटय़ा मात्र आकाशवाणीवर ‘माझं घर माझं वावर’ हा कार्यक्रम ऐकत बसला होता. बंडूकाकांनी संतापून गोटय़ाला फर्मावलं, चल गोटय़ा! उचल ती टरफलं आणि कर साफ ती खोली! पण, ऐकेल तो गोटय़ा कसला. ‘मी शेंगा खाल्ल्या नाही, त्यामुळे मी टरफलं उचलणार नाही’ असं बाणेदार उत्तर देऊन गोटय़ा पसार झाला. बंडूकाकांच्या मनावर मात्र या वयातही लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या बाणेदारपणाचा पुन्हा एकदा संस्कार झाला.
चारूदत्त कहू
९०९६०५०८५९