Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९

माणकेश्वर मंदिर समुद्र किनाऱ्यावरचे नवे तीर्थक्षेत्र
मधुकर ठाकूर

येथील पिरवाडी बीचबरोबरच केगाव माणकेश्वर परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीच्या दिवशी हौशी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. मौज-मस्तीबरोबरच माणकेश्वर मंदिर परिसरात मृतात्म्यांना चिरशांती व मुक्ती मिळावी यासाठी विविध प्रकारचे धार्मिक विधीही मोठय़ा प्रमाणात केले जाऊ लागले आहेत. हरिहरेश्वर, नाशिक, हरिद्वार, पाली आदी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मृतात्म्यांच्या मुक्तीसाठी धार्मिक विधी करण्याकडे मृतांच्या नातेवाईकांचा अधिक कल होता, मात्र ही बाब खर्चिक आणि वेळेचा अपव्यय करणारी ठरू लागल्याने मुंबई, ठाणे, रायगड आदी ठिकाणांहून नागरिक मोठय़ा संख्येने माणकेश्वर मंदिर व समुद्रकिनाऱ्यावरच मृतात्म्यांसाठी आवश्यक धार्मिक विधी करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. यामुळे माणकेश्वर मंदिर व समुद्रकिनारी आता नवे तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येऊ लागले आहे.

जे. जे. चे वार्षिक कला प्रदर्शन
उमद्या चित्रकारांचा चढता आलेख

प्रतिनिधी

जे जे उपयोजित कलामहाविद्यालयात नुकतेच वार्षिक प्रदर्शन भरविण्यात आले होते. पहिले वर्ष ते चौथ्या वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या. या प्रदर्शनात बीएफएच्या सुजाता सिधयेने सुवर्णपदक पटकाविले. तिने क्वीक हेलवर कॅम्पेन केले. ग्रीन कलरफुल बॅकग्राऊंडवर तिने उत्कृष्ट मांडणी केली. ओमकार फोंडेकरला रजतपदक मिळाले. त्याने ‘हिस्टरी’ चॅनलवर कॅम्पेन केले. गौतम बुद्ध, नरिमन पॉइंट, इंजिन, स्कूटर, घडय़ाळ यांचा इतिहास त्याने चित्रांद्वारे दाखविला आहे. प्रथमेश प्रभू याच्या सोन ब्रालिया या मॉडेलला कांस्यपदक मिळाले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पक कलाकृती या प्रदर्शनात मांडल्या. मीनल दुसानेने महिलांचे चित्रण केले. मिलिंद सावंत व वर्षां परुळेकरने कोकणातील लोककला दशावताराचे अनोखे दर्शन घडविले. तृप्ती पालकरने ‘लालबागच्या राजा’ची चित्रमालिका तयार केली. कांचन कुलकर्णीने इंडियन फूडची देखणी पुस्तिका तयार केली.

तीन पायांचे आश्चर्य!
प्राजक्ता कदम

इच्छाशक्तीच्या बळावर कोणतीही गोष्ट सहज साध्य होऊ शकते. अगदी मृत्यूच्या दाढेतून परतण्याचा चमत्कारही घडू शकतो. मलबार हिल परिसरातील एका भटक्या कुत्र्याच्या बाबतीत असा चमत्कार अलीकडेच घडला. गाडीने धडक दिल्याने मृत्यूच्या विळख्यात गेलेल्या तीन पायांच्या रॅक्सविषयी डॉक्टरांनीही आशा सोडली होती. पण त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या एका पारशी महिलेच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे रॅक्स मृत्यूच्या दाढेतून परतला. त्यामुळेच परळ येथील प्राणी रुग्णालयातील डॉक्टर्ससाठी रॅक्स हा सध्या ‘तीन पायांचे आश्चर्य’ बनला आहे. रॅक्सचा जन्म मलबार हिल परिसरात झाला. जन्मत:च तीन पाय असलेल्या रॅक्सला इतर कुत्र्यांप्रमाणे चपळाईने धावता किंवा अन्य क्रिया करता येत नव्हत्या. त्या परिस्थितीत जगण्यासाठी चाललेली त्याची धडपड मलबार हिल परिसरात राहणाऱ्या पारशी कुटुंबाला हेलावून गेली. या कुटुंबातील प्रत्येकालाच विशेषकरून अबामला त्याचा जास्तच लळा लागला होता. न चुकता ती रोज सकाळी-दुपारी, संध्याकाळी-रात्री रॅक्सला जेवण देत असे. परंतु दीड महिन्यापूर्वी रॅक्स अचानक गायब झाला. त्यावेळी अबामच्या काळजाचा ठोकाच चुकला. रॅक्स जन्मापासून अपंग, त्याचे बरेवाईट तर झाले नसेल ना या काळजीने तिला ग्रासले. त्याच काळजीतून तिने परिसरात इतर रहिवाशांकडे रॅक्सची चौकशी केली. त्यावेळी तिला कळले की रॅक्स गेले काही दिवस ठराविक ठिकाणी बसलेला असतो. ती तात्काळ तेथे पोहोचली. एका गाडीने धडक दिल्यामुळे रॅक्स जायबंदी झाला होता. आधीच अपंग आणि त्यातच अपघात झाल्यामुळे त्याला हालचाल करणेही शक्य होत नव्हते. हे लक्षात येताच अबामने त्याला परळ येथील बीएसपीए प्राणी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. रॅक्सचा एक्स-रे काढण्यात आला. त्यामध्ये त्याच्या मागच्या दोन्ही पायांची हाडे मोडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तो कोणत्याही क्षणी मृत्युमुखी पडेल, असे डॉक्टरांनी तिला सांगितले. मात्र रॅक्सला जगायचे आहे, काहीही झाले तरी तो हे जग सोडून जाणार नाही. रॅक्सबाबत नक्कीच चमत्कार होईल, असा विश्वास तिने डॉक्टरांकडे व्यक्त केला. रॅक्सबद्दल आपुलकी असल्यामुळे अबाम असे बोलत असून ती जे बोलत आहे ते प्रत्यक्षात घडणार नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. रुग्णालयात दाखल करून १५ दिवस उलटले तरी रॅक्सच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती. त्यामुळे तो फार काळ जगेल असे डॉक्टरांना वाटत नव्हते. पण त्याही परिस्थितीत अबामचा विश्वास मात्र कायम होता आणि काही दिवसांनी रॅक्स हालचाल करू लागला. रॅक्समधील सुधारणा पाहून डॉक्टरही चक्रावले. आता तर रॅक्स पूर्ण बरा झाला आहे. अबाम आणि तिच्या कुटुंबीयांच्या दृढ विश्वासामुळे रॅक्स मृत्यूच्या दाढेतून परतला, अशी कबुली रुग्णालयाचे प्रमुख कर्नल जे. सी.खन्ना यांनी दिली.