Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

सागरी वाऱ्यांच्या गती बदलामुळे कोकणात अवकाळी पावसाचा तडाखा
खास प्रतिनिधी, रत्नागिरी, १४ मार्च

अरबी समुद्रातील वाऱ्यांच्या नियमित गतीमध्ये बदल झाल्यामुळे गेले दोन दिवस रत्नागिरी

 

जिल्ह्यासह कोकणच्या बहुतांश भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.
हाताशी आलेल्या आंब्याच्या पिकावर या पावसामुळे बुरशीजन्य रोग पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे, तर समुद्रामध्ये जोरदार वारे वाहत असल्यामुळे बहुसंख्य मच्छिमार नौका किनाऱ्यावरच विसावल्या आहेत.
गेले काही दिवस कोकणात अनेक ठिकाणी अचानक दिवसाचा तापमानामध्ये लक्षणीय वाढ झाली होती. त्या तुलनेत रात्री आणि पहाटे मात्र सुखद गारवा होता. पण गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ हवामान निर्माण झाले. गेल्या गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख ते चिपळूण या पट्टय़ात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या अवकाळी पावसाची व्याप्ती शुक्रवारी आणखी वाढून मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यांच्या अंतर्भागात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटांसह जोरदार पावसाने हजेरी लावली, तर काही ठिकाणी तुरळक शिडकावा झाला. अनपेक्षितपणे झालेल्या या पावसामुळे घर-दुकानांचे पत्रे उडून जाण्याचे, झाड उन्मळून पडण्याचे, तसेच विद्युतप्रवाह खंडित होण्याचे प्रकार घडले. रत्नागिरी शहरातही रात्री उशीरा वीजांच्या चमचमाटासह पावसाच्या काही सरी पडल्या. आज दिवसभरही रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावसाच्या सरी पडल्या.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील वाऱ्यांची दिशा व गतीमध्ये बदल झाल्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हे पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. आणखी एक-दोन दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.