Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

पुण्याच्या वीजपुरवठय़ावर परिणामाची शक्यता
नागपूर,अमरावतीला अखंड वीजपुरवठय़ासाठी टाटा पॉवरची अतिरिक्त वीज
पावलस मुगुटमल, पुणे, १४ मार्च

पुणे, ठाणे व वाशी या शहरांप्रमाणेच नागपूर व अमरावती येथे अखंड वीजपुरवठय़ासाठी अतिरिक्त

 

वीज देण्यास टाटा पॉवर कंपनीने तयारी केली आहे. मात्र, टाटा पॉवरकडून मागील काही दिवसांमध्ये पुरेशी वीज उपलब्ध होऊ शकलेली नाही. अशा परिस्थितीत नागपूर व परभणीला वीज दिल्यास त्याचा परिणाम पुण्यासह ठाणे व वाशी येथील वीजपुरवठय़ावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधी या शहरांना पुरेशी वीज देण्याची हमी घेऊनच नागपूर व अमरावतीसाठी टाटा पॉवरची वीज घेण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
पुणे, ठाणे व वाशी या शहरांमध्ये सध्या टाटा पॉवरकडून अतिरिक्त वीज घेऊन वीजकपात कमी करण्यात येत आहे. त्यातील पुणे शहरासाठी पूर्वीच्या आकडेवारीनुसार सुमारे दीडशे मेगावॉट अतिरिक्त विजेची गरज होती. त्यामुळे टाटा पॉवर कंपनीकडून ही वीज घेण्याचा करार करण्यात आला होता. वर्षभरात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विजेचा वापर कमी असल्याने तो काळ करारामधून वगळण्यात आला होता. मात्र, नेमके याच काळामध्ये राज्यात विजेची टंचाई निर्माण झाली. कोठेही वीज नसल्याचे सांगून टाटाकडूनही या काळामध्ये अतिरिक्त वीज देण्यात आली नाही. अशा स्थितीत पुण्याची विजेची तूट १५० मेगावॉटवरून सुमारे ३०० मेगावॉटवर पोहोचली होती. पावसाळ्याचा काळ गेल्यानंतर करारानुसार किमान दीडशे मेगावॉट वीज टाटा पॉवरकडून मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यानुसार वीजपुरवठा झाला नसल्याने परिणामी पुणेकरांना दररोज पाच ते सहा तासांची वीजकपात सोसावी लागली.
मागील सहा महिन्यांमध्ये टाटा पॉवर कंपनीकडून रोजच्या रोज उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त विजेनुसारच पुणे व िपपरी-चिंचवड शहरामधील वीजकपात रोजच्या रोज कमी-जास्त करण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीत पुण्याला अखंड वीजपुरवठा करण्यासाठी सुमारे १७० ते १८० मेगावॉट विजेची गरज आहे. जानेवारी २००९ पर्यंत टाटा पॉवरकडून सरासरी केवळ ५० ते ७० मेगावॉट अतिरिक्त वीज देण्यात येत होती. त्यामुळे तीन ते चार तासांची वीजकपात करण्यात येत होती. गेल्या १५ दिवसांपासून बऱ्यापैकी वीज उपलब्ध होत आहे. मात्र, त्यातही सातत्य नाही. विजेच्या उपलब्धतेनुसारच अतिरिक्त वीज पुरविण्यात येत असल्याचे टाटा पॉवरकडून पूर्वीपासून सांगण्यात येत आहे.
याबाबत पुण्यातील सजग नागरी मंचचे अध्यक्ष व वीज क्षेत्रातील अभ्यासक विवेक वेलणकर म्हणाले, ‘‘पुणे, ठाणे व वाशीला मागणीनुसार टाटा पॉवरकडून १०० टक्के अतिरिक्त वीज मिळणे गरजेचे आहे. वीज कंपनी व शासनाने प्रथम टाटा पॉवरकडून याबाबतही हमी घेण्याची गरज आहे. तसे झाले तरच नागपूर व अमरावतीला वीज देण्याबाबतचा त्यांच्याशी करार करावा. अन्यथा कोणत्याही शहराला पुरेशी वीज मिळू शकणार नाही. सर्व शहरांना पुरेशी वीज देण्याची तयारी नसेल, तर टाटा पॉवरशी पुढील करार करू नये.’’