Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
राज्य

ठाणे मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व
ठाणे,१४ मार्च/प्रतिनिधी

दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सहकार पॅलनने ३० पैकी २५ जागा पटकावल्या असून शिवसेनेने दोन जागा जिंकून खाते उघडले आहे. मात्र अटीतटीच्या निवडणुकीत शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचा एका मताने आणि दोन विद्यमान संचालकांचा धक्कादायक पराभव राष्ट्रवादीला पाहावा लागला आहे.

‘शालेय खिचडी’तील तांदळाची उधळपट्टी
रोखण्यासाठी लवकरच जनहित याचिका
अभिजीत कुलकर्णी, नाशिक, १४ मार्च
शालेय पोषण आहार योजनेतील त्रुटींवर वारंवार बोट ठेवले जात असताना सामान्यत: प्राथमिक शाळेतील विद्यार्थी एकावेळी जेवढय़ा तांदळाची खिचडी खाऊ शकतील त्याच्या तब्बल चौपट तांदळाचा पुरवठा केला जात असून त्यामुळे ही योजना विद्यार्थ्यांपेक्षा खिचडी पुरविण्याची जबाबदारी असणाऱ्या मंडळींसाठीच अधिक पोषक ठरत असल्याचे पुढे येत आहे. याबाबतच्या आकडेवारीचे सप्रमाण दाखले ‘आयुर्वेद व्यासपीठ’चे वैद्य विजय कुलकर्णी यांनी प्रयोगांती संकलित केले असून त्या आधारे तांदळातील ही कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी थांबावी म्हणून न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारीही सुरू असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

कठोर भूमिका घेण्याची वेळ आल्यास महिलांनी मागे हटू नये - कांचन अधिकारी
नाशिक, १४ मार्च / प्रतिनिधी

महिलांनी आयुष्यात कुणावर अवलंबून न राहता स्वतच्या पायावर उभे राहावे. आपल्या हक्कांसाठी प्रसंगी कठोर भूमिका घेण्याची वेळ आली तरी मागे हटू नये असा सल्ला देतानाच आयुष्यात चांगल्या संधी फार कमी मिळतात, त्यामुळे त्या संधीचे सोने करा असे आवाहन चित्रपट निर्मात्या कांचन अधिकारी यांनी केले. राजपत्रित महिला अधिकारी महासंघ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या विद्यमाने येथे आयोजित महिला अधिकारी परिषदेचे उद्घाटन अधिकारी यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

शंभर कारखान्यांचे ऊसवृद्धी अभियान
राधानगरी, १४ मार्च / वार्ताहर

पूर्वी एकरी टनांच्या आसपास असणारे उस उत्पादन आता तीस टनांच्याखाली घसरले आहे. खते आणि पाण्याच्या अतिरिक्त वापराने जमिनीचा पोत बिघडला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. राज्यातील साखर कारखान्यांना तीव्र उस टंचाई जाणवत आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने शंभर साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊसवृध्दी अभियान सुरू केले आहे. राज्यातील ऊस उत्पादनात भरीव वाढ व्हावी या हेतूने राज्य शासनाच्या कृषी विभागाने साखर कारखान्यांच्या सहाय्याने ऊस विकास योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार राज्यातील शंभर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी एक हजार हेक्टर क्षेत्रावर ही योजना राबविली जाणार आहे.

उलवा गावात हत्येप्रकरणी सरपंचासह तिघांना अटक
पनवेल, १४ मार्च/प्रतिनिधी

उलवा गावात शुक्रवारी रात्री सुमारे अकरा वाजता दोन गटांत झालेल्या हाणामारीत राजेश मनोहर पाटील (३४) या तरुणाचा मृत्यू झाला. एन. आर. आय. पोलिसांनी याप्रकरणी महादेव मढवी, भालचंद्र मढवी आणि जगदीश मढवी या तिघांना अटक केली. यातील महादेव मढवी हे उलवा गावचे सरपंच असल्याचे समजते. पाटील आणि मढवी यांच्यात रेतीच्या कॉरीच्या व्यवसायावरून वाद होता. धुळवडीला रंग टाकण्यावरूनही किरकोळ वाद झाला होता; परंतु शुक्रवारी रात्री वादाचे पर्यावसन तुफान हाणामारीत झाले. आरोपींनी कोयते, तलवारी यांच्यासह केलेल्या हल्ल्यात राजेश पाटील यांचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर गावात कमालीचा तणाव असून, सुमारे ५० पोलिसांचा फौजफाटा तेथे तळ ठोकून आहे.