Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
क्रीडा

ऑस्ट्रेलियावर १६ धावांनी मात
अंजुम चोप्राच्या ७६ धावा

सिडनी, १४ मार्च / पीटीआय

मनोधैर्य उंचावलेल्या भारताने आज लौकिकाला साजेशी कामगिरी करत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा १६ धावांनी पराभव केला आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ‘सुपर सिक्स’ फेरीत पहिल्या विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील दुसरा पराभव ठरला. कर्णधार कॅरेन रॉल्टनचा नाणेफेकजिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या अंगलट आला. अनघा देशपांडे (३१) व अंजुम चोप्रा (७६) यांनी सलामीला नोंदवलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने ५० षटकात ५ बाद २३४ धावांची मजल मारली आणि प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा डाव ७ बाद २१९ धावसंख्येवर रोखला.

कायले मिल्सला सचिनची शिकवणी!
विनायक दळवी, मुंबई, १४ मार्च

भारताविरुद्ध ऑकलंड येथील सामना जिंकून न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेतील विजयांचा दुष्काळ संपविला. या विजयाला कायले मिल्सच्या गोलंदाजीचाही हातभार लागला. भारतीयांना त्याने मुक्त फटकेबाजी करू दिली नाही. हा फरक घडला कशामुळे? या प्रश्नाचे उत्तर ‘कदाचित सचिन तेंडुलकरच्या सल्ल्यामुळे’ हे असू शकेल. हॅमिल्टन येथे सचिन तेंडुलकरच्या पाठशाळेत कायले मिल्स सामील झाला होता. खरं तर सचिन कोणत्याही प्रतिस्पध्र्यावर एवढा मेहेरबान होतच नाही. गोलंदाज असेल तर नाहीच नाही. दोन दशके धावांचे डोंगर रचूनही सचिनची गोलंदाजी फोडून काढण्याची सवय गेली नाही.

न्यूझीलंडने राखली प्रतिष्ठा
भारताने मालिका ३-१ अशी जिंकली
जेसी रायडर सामन्यात सर्वोत्तम

ऑकलंड, १४ मार्च / पीटीआय

भारताचा चौखुर उधळलेला विजयी रथ अखेर आज ईडन पार्कवर रोखण्यात यजमान न्यूझीलंड संघ यशस्वी ठरला. मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाची नसलेली आजची पाचवी व शेवटची लढत ८ गडय़ांनी अगदीच लीलया जिंकून न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत प्रतिष्ठाही कायम राखली आणि पाहुण्या भारतीय संघाचे निर्भेळ यश संपादन करण्याचे मनसुबेही उधळले.

मधल्या फळीचे अपयश भोवले - धोनी
ऑकलंड, १४ मार्च/वृत्तसंस्था

‘गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी दिलेल्या चांगल्या सलामीचा फायदा उठविण्यात आमची मधली फळी अयशस्वी ठरली. आमच्या पराभवाचे हेच प्रमुख कारण आहे,’ अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सामना संपल्यानंतर व्यक्त केली. खेळपट्टी ओळखण्यात आपल्याकडून चूक झाल्याचेही तो म्हणाला.
सेहवाग-गंभीर जोडीने आम्हाला चांगली सुरुवात करून दिली. चांगल्या प्रारंभानंतर आम्ही मोठी धावसंख्या उभारणे अपेक्षित असते. मधल्या फळीतील फलंदाजांनी फटके मारण्याची घाई केल्याने आम्ही लवकर विकेट गमावल्या. त्याचा परिणाम आमचे तळाचे फलंदाज दबावाखाली आले, असे धोनीने सांगितले.

आत्मविश्वास वाढविणारा विजय - व्हेटोरी
ऑकलंड, १४ मार्च/वृत्तसंस्था
आजच्या सामन्यात विजय मिळविल्यामुळे कसोटी मालिकेपूर्वी आमच्या संघाचे मनोबल वाढण्यास मोठी मदत झाली आहे, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा कर्णधार डॅनिअल व्हेटोरी याने व्यक्त केली आहे.

आयपीएलला अडचण सुरक्षेची तर, राजकारण्यांना काळजी प्रसिद्धीची
उदय रंगनाथ, नागपूर, १४ मार्च

सुरक्षेच्या मुद्यापेक्षाही राजकारण्यांच्या मनात दडलेल्या असुरक्षिततेच्या भावनेचे सावट इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) दुसऱ्या पर्वावर दाटून आले आहे. लोकसभा निवडणुकांसोबतच या ट्वेन्टी-२० स्पर्धा येत असल्याने मतदानावर त्याचा विपरीत परिणाम होण्याच्या भीतीने राजकारण्यांना जबरदस्त ग्रासले आहे.

आयपीएल आयोजकांचा नव्या तारखांचा शोध सुरू
नवी दिल्ली, १४ मार्च / पीटीआय

सुरक्षिततेचा मुद्दा, निवडणुका या पाश्र्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले असताना आता ही स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत आयोजित करायचीच असा चंग आयोजकांनी बांधला आहे. त्यासाठी आता नव्या तारखांचा शोधही सुरू झाला आहे.

दक्षिण विभागाची झिम्बाब्वे अध्यक्ष इलेव्हनवर मात
कटक, १४ मार्च / पीटीआय

डळमळीत सुरुवातीनंतर अर्जुन यादव व रवीचंद्रन अश्विन यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दक्षिण विभागाने झिम्बाब्वे अध्यक्ष इलेव्हनचा तीन गडी राखून पराभव केला आणि देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत बोनस गुणांसह विजय मिळवला.

दुहेरीत भूपतीची आगेकूच; सानिया मात्र पराभूत
इंडियन वेल्स, १४ मार्च / पीटीआय

बीएनपी परिबास ओपन टेनिस स्पर्धेत आजचा दिवस भारतासाठी संमिश्र यश देणारा ठरला. महेश भूपतीने पुरुष दुहेरीत आगेकूच केली तर सानिया मिर्झाला महिला दुहेरीत पराभव स्वीकारावा लागला. महिला दुहेरीच्या सलामी लढतीत गिसेला डुल्को आणि शहर पीर यांनी भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा व तिची दुहेरीतील सहकारी तायपेईची चिया-झुंग चुंग यांची ६-१, ६-४ गुणांनी पराभव केला. एकेरीच्या दुसऱ्या फेरीत सानियाची १२व्या मानांकित इटलीच्या फ्लेव्हिया पॅनेट्टासोबत लढत होणार आहे. पुरुष दुहेरीत तिसऱ्या मानांकित भूपती आणि मार्क नोल्स यांनी रशियाच्या दिमित्री टुर्सोनोव्ह आणि इगोर कुनिस्टेन यांचा ७-५, ६-३ गुणांनी पराभव करत दुसरी फेरी गाठली.

कोनेरू हम्पीचा चौथा विजय; पाच गुणांसह दुसऱ्या स्थानावर
इस्तंबूल, १४ मार्च / पीटीआय

जॉर्जियाची माजी विश्वविजेती माईया चिबुरदानित्झ हिच्यावर संघर्षपूर्ण विजय मिळवून भारताची ग्रॅण्डमास्टर कोनेरू हम्पीने येथे सुरू असलेल्या महिला ग्रां प्रि बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थानाच्या दिशेने सुरू असलेली आगेकूच कायम ठेवली आहे. हम्पीने सहाव्या फेरीत मिळविलेला हा विजय स्पर्धेतील तिचा चौथा विजय आहे. या विजयासह हम्पीची गुणसंख्या पाचवर पोहोचली आहे. हम्पी आता संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या यिफान हाओने इक्वेडोरच्या मार्था बाकेरोला नमवून आपली गुणसंख्या ५.५वर नेली आहे. यिफान आता एकटीने आघाडीच्या स्थानावर आहे तर हम्पी व चीनची झाओ झ्यु या दोघी पाच गुणांसह दुसऱ्या स्थानावर संयुक्तपणे आहेत. अर्मेनियाची एलिना डॅनियेलियन हिने चार गुणांसह चौथे स्थान मिळविले आहे. स्पर्धेच्या अद्याप पाच फेऱ्या शिल्लक असून ही स्पर्धा म्हणजे आगामी विश्व बुद्धिबळ स्पर्धेची एकप्रकारे तयारी मानली जाते.

भारतीय कुस्ती संघात राहुल आवारेची निवड
पुणे , १४ मार्च/क्री. प्र.

कैरो(इजिप्त) येथे १६ व १७ मार्च रोजी होणाऱ्या अ‍ॅलेक्झांड्रिया चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात पुण्याचा राहुल आवारे याची निवड झाली आहे. आवारे याने राष्ट्रकुल युवा स्पर्धेतील ५५ किलो गटात सुवर्णपदकाची कमाई केली होती. तो पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीत रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. भारतीय संघ उद्या कैरोला जाणार आहे.