Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

ऑस्ट्रेलियावर १६ धावांनी मात
अंजुम चोप्राच्या ७६ धावा
सिडनी, १४ मार्च / पीटीआय

मनोधैर्य उंचावलेल्या भारताने आज लौकिकाला साजेशी कामगिरी करत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा १६ धावांनी पराभव केला आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ‘सुपर सिक्स’ फेरीत पहिल्या विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील दुसरा पराभव ठरला.
कर्णधार कॅरेन रॉल्टनचा नाणेफेकजिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या अंगलट आला. अनघा देशपांडे (३१) व अंजुम चोप्रा (७६) यांनी सलामीला नोंदवलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने ५० षटकात ५ बाद २३४ धावांची मजल मारली आणि प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा डाव ७ बाद २१९ धावसंख्येवर रोखला. भारताच्या विजयात अनघा देशपांडे व अंजूम चोप्रा यांच्यासह मिताली राज(४४)आणि अमिता शर्मा (३१ धावा २२ चेंडू, ३ चौकार) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज लिसा स्थळेकरने ५२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी मिळवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. १५ व्या षटकात

 

ऑस्ट्रेलियाची ३ बाद ५३ अशी नाजूक अवस्था झाली होती. शेली नित्शेकला झुलन गोस्वामीने माघारी परतवल्यानंतर कॅरन रॉल्टनचा अडसर सुलतानाने दूर केला. स्थळेकरला अमिता शर्माने बाद करत ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. त्यानंतर अ‍ॅलेक्स ब्लॅकवेलने(५४) अर्धशतक झळकावत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला पण, विजयासाठी तिचे प्रयत्न अपुरेच पडले. भारतातर्फे रीना मल्होत्रा आणि सुलताना यांनी अनुक्रमे ३२ व ३३ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी २ बळी मिळवले. गोस्वामी, रुमेली धर व शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्यांना योग्य साथ दिली.
धावफलक
भारत :- अनघा देशपांडे झे. इबसरी गो. स्थळेकर ४५, अंजुम चोप्रा झे. नित्शेक गो. फरेल ७६, थिरुश कामिनी झे. स्थळेकर गो. नित्शेक २, मिताली राज झे. फिल्डस् गो. स्थळेकर ४४, अमिता शर्मा नाबाद ३१, झुलन गोस्वामी झे. नित्शेक गो. स्थळेकर ५, हरमनप्रीत कौर नाबाद १९. अवांतर (वाईड १२) १२. एकूण ५० षटकांत ५ बाद २३४. बाद क्रम : १-६९, २-९९, ३-१५५, ४-१८१, ५-२०१. गोलंदाजी : सॅम्पसन ८-२-४६-०, फरेल १०-३-३०-१, पेरी ९-०-५६-०, किमिन्स ७-०-३१-०, स्थळेकर १०-०-५२-३, नित्शेक ६-१-१९-१.
ऑस्ट्रेलिया :- एस. नित्शेक त्रि. गो. गोस्वामी १७, ए. ब्लॅकवेल झे. राज गो. मल्होत्रा ५४, कॅरेन रॉल्टन यष्टिचित देशपांडे गो. सुलताना ८, लिसा स्थळेकर झे. देशपांडे गो. शर्मा ०, जे. फिल्डस् झे. कौर गो. मल्होत्रा ४३, जे. कॅमरून झे. रॉय गो. धर २५, इ.पेरी त्रि. गो. सुलताना ०, एल. इबसरी नाबाद ३९, आर. फरेल नाबाद २०. अवांतर (लेगबाईज ४, वाईड ८) १२. एकूण ५० षटकांत ७ बाद २१८. बाद क्रम : १-४१, २-५०, ३-५३, ४-१२१, ५-१३९, ६-१४०, ७-१७०.
गोलंदाजी : गोस्वामी १०-४-३४-१, धर १०-०-४१-१, सुलताना १०-२-३३-२, शर्मा १०-०-५७-१, रॉय ४-०-१७-०, मल्होत्रा ६-०-३२-२.