Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

कायले मिल्सला सचिनची शिकवणी!
विनायक दळवी, मुंबई, १४ मार्च

भारताविरुद्ध ऑकलंड येथील सामना जिंकून न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेतील विजयांचा

 

दुष्काळ संपविला. या विजयाला कायले मिल्सच्या गोलंदाजीचाही हातभार लागला. भारतीयांना त्याने मुक्त फटकेबाजी करू दिली नाही. हा फरक घडला कशामुळे? या प्रश्नाचे उत्तर ‘कदाचित सचिन तेंडुलकरच्या सल्ल्यामुळे’ हे असू शकेल.
हॅमिल्टन येथे सचिन तेंडुलकरच्या पाठशाळेत कायले मिल्स सामील झाला होता. खरं तर सचिन कोणत्याही प्रतिस्पध्र्यावर एवढा मेहेरबान होतच नाही. गोलंदाज असेल तर नाहीच नाही. दोन दशके धावांचे डोंगर रचूनही सचिनची गोलंदाजी फोडून काढण्याची सवय गेली नाही.
असे असूनही सचिन, कायले मिल्सवर एवढा फिदा का झाला?
मुंबई इंडियन्सच्या वतीने यंदा दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू शॉन पोलॉक खेळू शकणार नाही. त्याच्या तोडीचा अष्टपैलू खेळाडूच्या शोधात मुंबई इंडियन्स संघ असल्याचे कळते. सचिनने आपल्या संघात सामील होण्याची शक्यता असलेल्या कायले मिल्सला आतापासूनच गोलंदाजीचे धडे द्यायला सुरुवात केली नाही ना!
मात्र सचिनने मिल्सला भारताने एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतरच शहाणे केले आहे. भारताने ३-० अशी आघाडी घेतल्यानंतर सचिनने मिल्सला गोलंदाजीच्या काही ‘टिप्स’ दिल्या. मिल्सचा पाहुणचार सचिनने उगाचंच झोडला नाही. पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएल साखळी स्पर्धेच्या पूर्वतयारीची ती सुरुवात होती.
सचिनने मिल्सला सांगितले, भारतात तू ‘लेंथ’ बॉल टाकून यशस्वी होणार नाहीस. एकाच टप्प्यावर, एकाच लेंथवर चेंडू टाकलेस तर भारतातील कोणताही फलंदाज आडव्या बॅटनेही गोलंदाजी फोडायला कमी करणार नाही. त्यासाठी ‘लेंथ’मध्ये सतत बदल करावा लागेल. चेंडूचा टप्पा पुढेमागे करावा लागेल. टप्पा पुढे मागे झाला तरच भारतात फलंदाज फसू शकेल. कारण अन्यत्र मिळणारी चेंडूची ‘साइडवेज’ मूव्हमेण्ट भारतात फारशी मिळणार नाही. फलंदाजांना ‘लेंथ’चा अंदाज आला तर तो सतत बदलत राहा. तसेच तुझ्या इनस्विंगमध्ये मधूनच ऑफ कटर्स टाकायचा सराव कर.
कायले मिल्स यशस्वी व्हावा यासाठी सचिन प्रयत्नशील आहे. कारण यंदाच्या नव्या खेळाडूंच्या भर्तीतला तो एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहे. आयपीएल क्रिकेट साखळीतला सर्वात महागडा संघ मुंबई इंडियन्सचा आहे. आयपीएलच्या पहिल्या आवृत्तीत चक्क पाचव्या क्रमांकावर हा संघ आल्यामुळे या संघाचे मालकही नाखूश झाले होते. या वर्षी कोणत्याही परिस्थितीत संघाला विजेतेपदापर्यंत नेण्यासाठी प्रत्येक जण धडपडत आहे. संघाच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात येत आहेत. सचिनची शिकवणी हा त्यातलाच एक भाग.