Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

न्यूझीलंडने राखली प्रतिष्ठा
भारताने मालिका ३-१ अशी जिंकली
जेसी रायडर सामन्यात सर्वोत्तम
ऑकलंड, १४ मार्च / पीटीआय

भारताचा चौखुर उधळलेला विजयी रथ अखेर आज ईडन पार्कवर रोखण्यात यजमान न्यूझीलंड

 

संघ यशस्वी ठरला. मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाची नसलेली आजची पाचवी व शेवटची लढत ८ गडय़ांनी अगदीच लीलया जिंकून न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत प्रतिष्ठाही कायम राखली आणि पाहुण्या भारतीय संघाचे निर्भेळ यश संपादन करण्याचे मनसुबेही उधळले.
जबरदस्त फॉर्मात असलेले भारतीय फलंदाज आज अचानक एकत्रितपणे अपयशी ठरले. मजबूत फलंदाजीची फळी कोसळली आणि भारताचा डाव ३६.३ षटकात अवघ्या १४९ धावांवर संपुष्टात आला. ही धावसंख्या भारतीय संघाला शोभणारी नसली तरी वीरेंद्र सेहवाग (४०) आणि रोहित शर्माने यातही उपयुक्त योगदान दिले. भारताने विजयासाठी दिलेले १५० धावांचे माफक आव्हान यजमान न्यूझीलंडने अवघ्या २३.२ षटकात २ फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. जेसी रायडरने चमकदार अष्टपैलू कामगिरी केली. भारताच्या डावात २९ धावांमध्ये तीन फलंदाज माघारी परतवणाऱ्या रायडरने तडाखेबंद ६३ धावांची खेळी केली. ब्रेंडन मॅक्क्युलम झटपट बाद झाल्यानंतर रायडरसोबत दुसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी करणारा मार्टिन गुप्तील (नाबाद ५७) शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने रॉस टेलरसोबत न्यूझीलंडला एकतर्फी विजय साजरा करून दिला. रायडरसाठी ही लढत संस्मरणीय ठरली. चमकदार अष्टपैलू कामगिरी करणारा रायडर सामनावीर ठरला. मात्र, या लढतीपूर्वीच पाहुण्या भारतीय संघाने मालिका विजयाची मोहोर उमटवली होती. न्यूझीलंडने आजच्या विजयासह मालिकेतील पिछाडी भरून काढली पण, भारताने ही मालिका ३-१ नेजिंकली. आता उभय संघात येत्या १८ मार्चपासून तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे.
न्यूझीलंडच्या या विजयाला जेस रायडर आणि इशांत शर्मा यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीचे गालबोट लागले. रायडरने इशांत शर्माच्या एका चेंडूला स्टॅन्डमध्ये भिरकावल्यामुळे प्रतिष्ठेला धक्का लागल्या प्रमाणे इशांत रायडरच्या दिशेने विचित्र हावभाव करत चालत गेला. त्यानंतर इशांतच्या दुसऱ्याच चेंडूवर रायडरने मिड-विकेटवरून षटकार मारला. त्यामुळे दिल्लीचा हा युवा गोलंदाज अधिकच भडकला. दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक झडली. मात्र, त्यावेळी पंच रुडी कत्र्झन यांनी इशांतला त्याच्या मैदानावरील असभ्य वागणुकीसाठी तंबी दिली आणि हे प्रकरण तेथेच मिटले. रायडरने इशांतलाच पूलचा एक जोरदार चौकार मारत अर्धशतक साजरे केले. इशांतनेच त्याला माघारी परतवले पण, त्याला ७.२ षटकात ६३ धावांचे मोल द्यावे लागले. न्यूझीलंडच्या कसोटी संघात पाचारण केल्याचा आनंद मार्टिन गुप्तीलने आजच साजरा केला. त्याने ५० चेंडूंवर नाबाद ५७ धावा फटकावल्या आणि टेलर (नाबाद २८) सोबत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारताचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने नाणेफेक जिंकून यजमान संघाला गोलंदाजीस आमंत्रित केले आणि त्यांच्या माऱ्यापुढे धोनीची टीम इंडिया पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. येथील थंड वातावणाराचा आणि बोचऱ्या हवेचा पुरेपूर फायदा न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी घेतला. कायले मिल्स आणि इयन ओब्रेयन यांचे चेंडू अप्रतिमपणे ‘सीम’ झाले आणि भारतीय फलंदाज थोडय़ा थोडय़ा अंतराने बाद झाले. काही फलंदाजांनी मात्र नाहक फटकेबाजीचा मोह स्वीकारून त्यांचे बळी दिले. गंभीर, रैना हे नाहक फटके खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाले. सेहवागने २७ चेंडूंवर ३ चौकार व ३ षटकारांसह ४० धावा फटकावल्या पण, तोही काहीसा तशाच पद्धतीनेच बाद झाला. युवराज सिंग (११), महेंद्र सिंग धोनी (९) आणि युसूफ पठाण (०) अगदी थोडय़ा थोडय़ा अंतराने बाद झाल्याने भारताची ६ बाद १११ अशी अवस्था झाली होती. या तिघांनाही रायडरने माघारी परतवले. ओब्रेयनच्या गोलंदाजीवर टेलरने इशांत शर्माचा झेल टिपला आणि भारताचा डाव संपुष्टात आला.
धावफलक
भारत :- गौतम गंभीर झे. मॅक् ग्लॅशन गो. माइल्स ०५, वीरेंद्र सेहवाग झे. मॅक् क्युलम गो. ओराम ४०, सुरेश रैना यष्टिचित स्टायरीस गो. ओराम ८, रोहित शर्मा नाबाद ४३, युवराज सिंग झे. मॅक् ग्लॅशन गो. रायडर ११, महेंद्र सिंग धोनी त्रि. गो. रायडर ९, युसूफ पठाण त्रि. गो. रायडर ०, हरभजन सिंग धावबाद १, झहीर खान धावबाद ५, प्रवीण कुमार झे. मॅक् ग्लॅशन गो. ओब्रेयन ६, इशांत शर्मा झे. टेलर गो. ओब्रेयन ३. अवांतर (लेगबाईज ९, वाईड ९) १८. एकूण ३६.३ षटकात सर्वबाद १४९. बाद क्रम : १-३०, २-६५, ३-६९, ४-८८, ५-११०, ६-१११, ७-११६, ८-१३१, ९-१४३. गोलंदाजी : माइल्स ७-०-२७-१, ओब्रेयन ७.३-०-४३-२, ओराम ९-०-२२-२, रायडर ९-०-२९-३, व्हेटोरी ४-०-१९-०.
न्यूझीलंड :- जेस रायडर त्रि. गो. इशांत ६३, ब्रेंडन मॅक् क्युलम त्रि. गो. प्रवीण २, मार्टिन गुप्तील नाबाद ५७, रॉस टेलर नाबाद २८. अवांतर (वाईड १) १. एकूण २३.२ षटकात २ बाद १५१. बाद क्रम : १-९, २-९३. गोलंदाजी : प्रवीण कुमार ४-०-२२-१, झहीर खान ८-१-५१-०, इशांत शर्मा ७.२-१-६३-१, हरभजन सिंग ४-०-१५-०.