Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

मधल्या फळीचे अपयश भोवले - धोनी
ऑकलंड, १४ मार्च/वृत्तसंस्था

‘गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी दिलेल्या चांगल्या सलामीचा फायदा उठविण्यात आमची

 

मधली फळी अयशस्वी ठरली. आमच्या पराभवाचे हेच प्रमुख कारण आहे,’ अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सामना संपल्यानंतर व्यक्त केली. खेळपट्टी ओळखण्यात आपल्याकडून चूक झाल्याचेही तो म्हणाला.
सेहवाग-गंभीर जोडीने आम्हाला चांगली सुरुवात करून दिली. चांगल्या प्रारंभानंतर आम्ही मोठी धावसंख्या उभारणे अपेक्षित असते. मधल्या फळीतील फलंदाजांनी फटके मारण्याची घाई केल्याने आम्ही लवकर विकेट गमावल्या. त्याचा परिणाम आमचे तळाचे फलंदाज दबावाखाली आले, असे धोनीने सांगितले.
भारताने मालिका आधीच जिंकली होती. त्यामुळे आजच्या लढतीला औपचारिकतेखेरीज महत्त्व नव्हते. तरीही तुम्ही आज राखीव खेळाडूंनासंधी का दिली नाही, असे विचारले असता धोनी म्हणाला की, आमच्या काही गोलंदाजांना कसोटी मालिकेपूर्वी सरावाची संधी देण्याचा आमचा हेतू होता.
सुरेश रैना याला तिसऱ्या क्रमांकावर पाठविण्याच्या धोनीच्या निर्णयाबद्दलही आश्चर्य व्यक्त केले गेले होते. त्याविषयी विचारल्यावर धोनीने रैना याला तिसऱ्या क्रमांकावर पाठविण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. रैनासारख्या फलंदाजाला नेहमी पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस यावे लागते. संघाची गरज बघून वेगाने फलंदाजी करावी लागते. म्हणून त्याला हेतूपूर्वक वरच्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली, असे धोनीने सांगितले.
आजच्या सामन्यात आमचे क्षेत्ररक्षण गचाळ झाले, अशी कबुलीही त्याने दिली. आमचे झेल सोडण्याचे प्रमाण चिंता करण्यासारखे आहे, असे तो म्हणाला.
त्याने सांगितले की, एकदिवसीय मालिका जिंकल्याबद्दल आम्ही निश्चितच समाधानी आहोत. मात्र या विजयावर समाधान न मानता आम्हाला कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करायचे आहे, असेही त्याने स्पष्ट केले.