Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

आत्मविश्वास वाढविणारा विजय - व्हेटोरी
ऑकलंड, १४ मार्च/वृत्तसंस्था

आजच्या सामन्यात विजय मिळविल्यामुळे कसोटी मालिकेपूर्वी आमच्या संघाचे मनोबल वाढण्यास

 

मोठी मदत झाली आहे, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा कर्णधार डॅनिअल व्हेटोरी याने व्यक्त केली आहे.
सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्हेटोरी म्हणाला की, आम्ही ही मालिका आधीच गमावली होती. मात्र आमचा ४-० असा पराभव झाला असता तर आमच्या संघाचे मनोधैर्य चांगलेच खच्ची झाले असते. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी आमच्या खेळाडूंना आवश्यक असलेला आत्मविश्वास आजच्या विजयाने मिळवून दिला आहे.
मायभूमीत ४-० असा पराभव पत्करावा लागला असता तर आमच्या दृष्टीने ते लाजीरवाणे ठरले असते. या मालिकेत आम्ही अपेक्षेप्रमाणे खेळ केलेला नव्हता. भारतीय संघाच्या खेळामुळे आमच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. आजच्या विजयाने ही परिस्थिती निश्चितच बदलेल, असेही त्याने सांगितले.
व्हेटोरी म्हणाला की, येथील खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्यावर धोनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मला आश्चर्य वाटले. काहीशा ओलसर खेळपट्टीवर धोनी आम्हाला फलंदाजीसाठी पाचारण करेल असे वाटले होते. मी नाणेफेक जिंकली असती तर प्रथम गोलंदाजी करणेच पसंत केले असते. आजच्या सामन्यातील आपल्या गोलंदाजांच्या कामगिरीवर व्हेटोरी याने समाधान प्रकट केले.