Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

आयपीएलला अडचण सुरक्षेची तर, राजकारण्यांना काळजी प्रसिद्धीची
उदय रंगनाथ, नागपूर, १४ मार्च

सुरक्षेच्या मुद्यापेक्षाही राजकारण्यांच्या मनात दडलेल्या असुरक्षिततेच्या भावनेचे सावट इंडियन

 

प्रिमियर लीगच्या (आयपीएल) दुसऱ्या पर्वावर दाटून आले आहे. लोकसभा निवडणुकांसोबतच या ट्वेन्टी-२० स्पर्धा येत असल्याने मतदानावर त्याचा विपरीत परिणाम होण्याच्या भीतीने राजकारण्यांना जबरदस्त ग्रासले आहे.
या स्पर्धामुळे त्यांच्या लोकप्रियतेवर परिणाम होईल, अशी भीती त्यांना वाटत असल्यामुळेच निवडणुकांच्या तारखांच्या दिवशी या स्पर्धेतील सामने होऊ नयेत, यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे आयपीएलच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या सामन्यांच्या प्रक्षेपणादरम्यान राजकीय जाहिराती दाखवण्यात येणार नाही, असा पवित्रा आयपीएल आयोजकांनी घेतल्यामुळे देशातील राजकीय पक्ष चांगलेच चिडले आहेत.
देशातील विविध पक्षांनी आयपीएलचे व्यासपीठ वापरून त्यांच्या पक्षांच्या जाहिराती करण्याचे ठरवले होते पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यकारी समितीने त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले. ही बाब अनेक राजकीय पक्षांच्या पचनी पडली नाही, असेही आयपीएलच्या एका वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
आयपीएलच्या पहिल्या पर्वाने लोकप्रियतेचे एव्हरेस्ट गाठल्याचे सर्वज्ञात आहे. पहिल्या पर्वातील आयपीएलचा टीआरपी रेट अठराहून अधिक होता. क्रिकेटच्या कुठल्याही स्पर्धापेक्षा तो किती तरी अधिक होता. हे बघून बॉलिवूडनेही त्या दरम्यान चित्रपट प्रदर्शित करण्याचे टाळले होते. आयपीएलच्या तारखा निश्चित झाल्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि तेव्हापासूनच अनेक राजकीय पक्षांनी या स्पर्धेच्या सामन्यांच्या प्रक्षेपणामार्फत पक्षांच्या जाहिरात करण्याचे मनसुबे रचले होते. मात्र, बीसीसीआय आणि आयपीएल आयोजकांनी कुठल्याही राजकीय पक्षाला हे व्यासपीठ वापरू न देण्याचे ठरवले. त्यामुळेच हा नाहक त्रास आयोजकांना सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुरक्षेचे कारण पुढे करून गृह मंत्रालयाने बदललेल्या कार्यक्रमात पुन्हा बदल करण्यास कालच आयोजकांना सांगितले. यात सुरक्षेचा मुद्दा ऐरणीचा आहेच पण, या स्पर्धेतील सामन्यांदरम्यान निवडणुका झाल्या तर लोकप्रियतेवर परिणाम होईल, निवडणूक सभांना गर्दी होणार नाही, अशी भीती अनेक राजकीय पक्षांनी याआधीच व्यक्त केली आहे. गृह मंत्रालयाने काल दिलेल्या सूचनेनुसार पुन्हा नव्याने बदल केलेला स्पर्धा कार्यक्रम आम्ही लवकरच मंजुरीसाठी पाठवणार आहोत पण, निर्धारित वेळेत सामने आयोजित करण्यात आम्हाला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, अनेक राज्य सरकारांनी निवडणुकीच्या काळात येणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवता न येण्याचा मुद्दा पुढे केल्यानंतर नागपूर, राजकोट आणि इंदोर या स्थळांची नावे स्पर्धेचे सामने आयोजित करण्यासाठी पहिल्या क्रमांकात आली आहेत. नागपूरच्या जामठा स्टेडियमवर तर येत्या २६ एप्रिल ते ६ मे या कालावधीत तीन सामने होण्याची शक्यता व्यक्त करतानाच रायपूरनेही आयपीएलचे सामने आयोजित करण्याची तयारी दर्शवली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आयपीएलच्या दुसऱ्या पर्वाचे भवितव्य अद्यापही राजकणाऱ्यांच्या मर्जीवरच अवलंबून आहे.