Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

आयपीएल आयोजकांचा नव्या तारखांचा शोध सुरू
नवी दिल्ली, १४ मार्च / पीटीआय

सुरक्षिततेचा मुद्दा, निवडणुका या पाश्र्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उभे

 

राहिलेले असताना आता ही स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत आयोजित करायचीच असा चंग आयोजकांनी बांधला आहे. त्यासाठी आता नव्या तारखांचा शोधही सुरू झाला आहे.
सुरक्षेच्या कारणामुळे ही स्पर्धा सध्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार होऊ शकत नाहीत, असा निष्कर्ष गृहमंत्रालयाने काढल्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गृहमंत्रालयाने स्पर्धेच्या कार्यक्रमात बदल करण्याची सूचनाही आयपीएलच्या आयोजकांनी केली आहे. त्यामुळे आयपीएलचे प्रमुख ललित मोदी व मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रामन यांनी आज दिवसभर मुंबईत चर्चा करून नव्या तारखांचा शोध घेतला.
आयपीएल स्पर्धेचे संचालक धीरज मल्होत्रा यांनी यासंदर्भात सांगितले की, आम्ही नव्या कार्यक्रमाची आखणी करणार आहोत. आम्हाला आशा आहे की, सर्व अडचणी दूर होतील.
एकीकडे गृहमंत्रालयाने आयपीएल आयोजकांची कोंडी केलेली असताना बंगलोरमध्येही आयपीएलच्या आयोजनाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तेथील पोलिसांनी ३ मेपर्यंत आयपीएलसाठी सुरक्षा पुरविण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे ४ मेनंतरच सामने आयोजित करावेत, अशी सूचना बंगलोर पोलिसांनी केली आहे.
आयपीएलच्या सूत्रांनी सांगितले की, ज्या राज्यांत स्पर्धेचे आयोजन होणार आहे, तेथून आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आम्ही स्पर्धेच्या कार्यक्रमात बदल करण्याचा प्रयत्न करीत आहोत. गरज भासली तर आम्ही काही नव्या ठिकाणांचा विचार करू.