Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९

आपलेपणाचा सोहळा
सदाशिव बाक्रे

पं. जितेंद्र अभिषेकी स्मृतिवंदना-२००९ हा संगीत सोहळा नुकताच शनिवार, ७ मार्च रोजी ठाण्याच्या सहयोग मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. उत्कर्ष मंडळ (ठाणे) व रघुनाथ फडके यांनी हा सोहळा प्रतिवर्षांनुसार आयोजित केला होता. आपल्या गुरूंचे ऋण स्मरून रघुनाथ फडके हा जो सोहळा आयोजित करतात, त्याला आता कलाकार व रसिकांकडून आपलेपणाची साथ लाभू लागली आहे व हा सोहळा उत्तम कार्यक्रम व उदंड प्रतिसादाची दाद यामुळे यशस्वी होऊ लागला आहे.

हद्दीची लक्ष्मणरेषा अन् सुविधांचा कांचनमृग!
संजय बापट

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा जसा राजकीय अनास्थेचा परिपाक मानला जातो, तद्वतच ठाणे-मुलुंडमधील रिक्षांचा सीमावादही दीर्घकाळ प्रलंबित आहे. सरकारदरबारी हा सीमावाद निकाली निघाला असला तरी रिक्षावाल्यांची आडमुठी भूमिका, त्याला मिळणारे राजकीय पाठबळ आणि अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणांची हतबलता तसेच प्रवाशांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांची वानवा यामुळे ठाणे-मुलुंडमधील प्रवाशांची डोकेदुखी अद्याप संपलेली नाही.

इडियट बॉक्स नसलेलं एक शहाणं घर!
प्रशांत असलेकर

सिंदबादच्या म्हाताऱ्यासारखा टीव्ही आता आपल्या मानगुटीवर बसला आहे. संध्याकाळी कामावरून दमून आलेल्या बापाला कुणी भांडंभर पाणी देत नाही. मुलं पोगो किंवा कार्टून चॅनेल बघण्यात गुंग असतात किंवा बायको विविध नातेसंबंधांतील गुंता सोडविणाऱ्या महामालिका बघण्यात हरवून गेलेली असते. तिला नवरा घरात आल्याची जाणीवच नसते, त्यामुळे बिचाऱ्या बापाची अवस्था स्वत:च्याच घरात या केविलवाण्या घरात असल्यासारखी होते.

माऊली वृद्धाश्रम, नव्हे माहेर!
भाऊ नानिवडेकर

नुकतेच आनंदवन स्नेही मंडळाच्या कार्यकर्त्यांना शरद भाटे यांनी बोरवाडीच्या माऊली वृद्धाश्रमाची सहल घडवून आणली. तेथे आम्ही जे जे काही पाहिले नि अनुभवले, ते समाजापर्यंत पोहोचावे असे वाटले, म्हणून हा लेखणीप्रपंच. हा आश्रम नाहीच, हा आहे एक ज्येष्ठ नागरिकांचा आनंददायी सहनिवास. आम्ही तेथे पोहोचण्यापूर्वीच संयोजकांनी आम्हाला सांगितले की, आश्रमवासीयांची जेवणाची वेळ सांभाळता यावी, म्हणून आपण तेथे पोहोचल्यावर लगेचच एक स्नेहमिलनाचा कार्यक्रम होईल. मंदिराच्या सभागृहात बसण्याची सर्व जय्यत तयारी झालेली होती.

चेकनाका!
आत्माराम नाटेकर

वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून ओळखला जातो. संपादक हा यातील केंद्रबिंदू. त्याच्याच नेतृत्वाखाली सहसंपादक, मुख्य उपसंपादक, उपसंपादक, वार्ताहर काम करत असतात. विविध पुरवण्यांची जबाबदारी त्या त्या संपादकावर सोपविलेली असते. मुद्रितशोधक हा वर्तमानपत्रातला तितकाच महत्त्वाचा घटक. संपादकांचा ऑपरेट झालेला मजकूर वाचण्यासाठी मुद्रितशोधकाकडे पाठवला जातो. त्यातील चुका काढून तो मजकूर पुन्हा करेक्शनसाठी संगणक विभागात जातो. केवळ ऱ्हस्व-दीर्घ एवढेच करेक्शन न पाहता मजकुराची वाक्यरचना, संदर्भ तपासून त्याच्यावर आवश्यक ते संस्कार केले जातात.

दूरसंचार सेवेची गुणवत्ता ग्राहक संघटनांची उदासीनता
डॉ. प्र. ज. जोगळेकर

मोबाइल फोन सेवेची गुणवत्ता समाधानकारक नाही हे सर्वांना जाणवत असूनही या सेवेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन झालेल्या ट्राय (टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया) च्या कामामध्ये आपल्या ग्राहक संघटना आणि औद्योगिक संघटना (इंडस्ट्रिज असोसिएशनस्, चेंबर ऑफ कॉमर्स इत्यादी) फारसा सहभाग दाखवत नाहीत. त्यामुळे ग्राहकांचे हित जपले जात नाही, असे ट्रायच्या गेल्या १० वर्षांच्या कारकीर्दीवरून स्पष्ट होते.

रेल्वेचा पांढरा हत्ती
अनिरुद्ध भातखंडे

सुनील आणि दिलीप हे दोघे मित्र ठाण्याचे रहिवासी. सुनील नोकरीनिमित्त दररोज वाशी येथे जातो तर दिलीपलाही कामानिमित्त सीबीडी-बेलापूरला व काही वेळा पनवेलला जावे लागते. तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत या दोघांना आपापल्या कामाच्या ठिकाणी जाणे नकोसे वाटायचे. कारण अर्थातच बसचा प्रवास.

रंगाचा बेरंग
दिलीप शिंदे

सवंगडय़ांसोबत रंगाची उधळण करीत आबालवृद्धांनी धुळवडीच्या आनंदाची लयलूट केली. पाण्यानी भरलेले फुगे मारून आणि नाना तऱ्हेच्या पिचकाऱ्यांनी एकमेकांची मने भिजवली. त्यानंतर मस्त मेजवानीवर ताव मारण्यात आला. अशा आनंदाला काही ठिकाणी ग्रहण लागले. रंगातून विषबाधा होऊन रुग्णालयात दाखल व्हावे लागले, तर काही जणांवर डोळे गमाविण्याचा बाका प्रसंग ओढवला. फुग्यांच्या माराने अनेकांना जखमी व्हावे लागले. म्हणून काहींना कारागृहात बसून शिमगा करावा लागला. शिमगोत्सवात उधळल्या जाणाऱ्या रंगामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास आणि डोळ्यात चुरचुरण्याच्या घटना नित्याच्याच आहेत. मात्र रंगामुळे अंबरनाथमधील एकावेळी ८५ मुलांना विषबाधा होण्याची घटना विरळाच. या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण होतात. विषारी रंगाने बुधवारी अंबरनाथमधील भास्करनगर, नवीन भेंडीपाडा, बालाजी नगरातील मुलांना विषबाधा झाली. त्यातील १२ जणांची प्रकृती चिंताजनक होती. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयापासून सायन रुग्णालयापर्यंत त्यांना उपचारासाठी हलवावे लागले. सुदैवाने साऱ्यांची प्रकृती चांगली आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाला आणि विषारी रंगाची विक्री करणाऱ्या सहा जणांना अटक झाली. पोलीस कोठडीनंतर ते जामिनावर सुटतील आणि न्यायालयात सुनावणी सुरू होईल. आरोप सिद्ध झाले तर न्यायालयाकडून दोन ते पाच वर्षांची शिक्षा लागू शकेल. पुन्हा धुळवड येईल आणि कुठून तरी विचित्र घटना कानावर पडेल. अंबरनाथमधील या घटनेमध्ये धुळवडीचा रंग म्हणून कपडय़ावर प्रक्रिया करण्यासाठी वापरल्या रासायनिक जाणाऱ्या रंगाची विक्री करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या रंगात रसायन असते. अंबरनाथ एम.आय.डी.सी.मध्ये अनेक रासायनिक कंपन्या सुरू असून तेथे मोठय़ा प्रमाणात रसायने उघडय़ावर टाकलेली आढळतात. अशा प्रकारे उघडय़ावर टाकणाऱ्या डाय रंगावर कोणाचे नियंत्रण नसल्याने कचऱ्यात पडलेल्या पिवळ्या रसायनाची रंग म्हणून सर्रास विक्री करण्यात आली. एवढेच नाही, तर तेथील सीताराम फॅक्टरी या रंग बनविणाऱ्या कंपनीतील रसायनयुक्त रंग एका सुरक्षारक्षकाने चक्क दुकानदाराला विकला. सुरक्षारक्षक आणि दुकानदारांचा आर्थिक फायदा मात्र मुलांच्या जिवावर बेतला होता. या घटनेला जबाबदार कोण? दुकानदार, एमआयडीसीचे अधिकारी की सुस्तावलेले प्रदूषण नियंत्रण मंडळ? या विषारी रंगप्रकरणी दुकानदारांवर भा.दं.वि. अन्वये सार्वजनिक आरोग्यास अपाय, निष्काळजीपणा, गंभीर दुखापतीचे कृत्य असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कलमांतर्गत दोषी व्यक्तींना जास्तीत जास्त पाच वर्षांची शिक्षा लागू शकते. कारण त्यांचा खून अथवा मनुष्य वधाचा हेतू नव्हता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. हे खरे असले तरी अशा विषारी रंगाची विक्री करणाऱ्या आणि त्यांची विक्री करण्यास पोषक वातावरण निर्माण करणाऱ्यांना कडक शिक्षा होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आणखीन शिक्षेची तरतूद व्हावी की नाही हा सार्वजनिक हिताच्या चर्चेचा विषय बनणे गरजेचे आहे. केवळ रंगच नाही, तर फुगे लागून अनेकांना कायमचे अंधत्वही येते. अशांनाही कठोर शिक्षेची गरज आहे.अंबरनाथमधील घटनेला ज्याप्रमाणे रंग विक्रेता जबाबदार आहे, तसे ते रंग उ़घडय़ावर टाकणारी कंपनी व त्यातील कर्मचारीही तितकेच जबाबदार धरायला हवेत. रासायनिक कंपन्या माहीत असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून उघडय़ावर रंग टाकणाऱ्यांवर कारवाई का केली नाही? अशी हलगर्जी करणारे अधिकारी तितकेच जबाबदार नाहीत का? त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासन विभाग काय करीत आहे, असा प्रश्न निर्माण होतो. हा भाग एमआयडीसीत असून अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे. तशी तपासणी होताना दिसत नाही. रंगपंचमीपूर्वी संबंधित विभागाने एक पथक स्थापून रंगाची तपासणी करायला हवी. त्यासाठी पोलिसांची मदत घेऊन भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळता येऊ शकते.