Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
विविध

चाँद मोहंमद यांचा फिजाला तलाक
चंडीगड, १४ मार्च/पीटीआय

अत्यंत नाटय़पूर्ण घटनेत हरयाणाचे माजी उपमुख्यमंत्री चाँद मोहंमद यांनी पत्नी फिजा हिला एसएमएस व दूरध्वनीच्या माध्यमातून तलाक दिला. फिजा यांनी मात्र ज्या पद्धतीने चाँद मोहंमद यांनी घटस्फोट दिला , त्यावर आक्षेप घेतला आहे.तिने आपल्यावर खोटे आरोप केले असे चाँद मोहंमद यांनी म्हटले आहे. चाँद यांनी पीटीआय कार्यालयाला घटस्फोटाच्या निवेदनाची प्रत फॅक्सने पाठवली आहे. इंग्लंडमधील इसेक्स येथील इलफोर्ड शहरातून त्यांनी फिजा बेगम यांनाही घटस्फोटाचे हे निवेदन पाठवले आहे. नोटरी पब्लिक ऑफिसमधून केलेल्या दूरध्वनी संभाषणाच्या आधारे हा घटस्फोट दिल्याचे ते म्हणतात.

‘ख्रिश्चन’ चार्ली चॅप्लीनच्या पुतळय़ास कर्नाटकातील हिंदुत्ववाद्यांचा विरोध!
उडुपी, १४ मार्च/पीटीआय

पबमध्ये जाणाऱ्या मुली आणि बागेत हिंडणाऱ्या प्रेमिकांना ‘हिसका’ दाखवल्यानंतर कर्नाटकमधील ‘संस्कृतिरक्षकांनी’ आता गेल्या शतकातील महान कलावंत चार्ली चॅप्लीन याला आपले लक्ष्य बनविले आहे. येथून जवळ असलेल्या कुंदापूर तालुक्यात चॅप्लीनचा भव्य पुतळा उभारण्यास एका हिंदुत्ववादी संघटनेने आक्षेप घेतला आहे. याचे कारण चॅप्लीन हा ख्रिश्चन होता.कुंदापूरजवळ ओट्टिनेने बीचवर चॅप्लीनचा ६७ फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रकल्प ‘हाऊसफुल्ल’ या कन्नड चित्रपटाचे दिग्दर्शक हेमनाथ हेगडे यांनी सुरू केला आहे.

गांधीजींच्या वस्तू ओटीस यांनी परत मागितल्या
न्यूयॉर्क १४ मार्च/पीटीआय

महात्मा गांधी यांच्या व्यक्तीगत वस्तूंचा लिलाव झाला असला, तरी आता त्या वस्तू परत द्याव्यात अशी मागणी त्या वस्तूंचे अमेरिकी मालक जेम्स ओटीस यांनी लिलावकर्त्यां कंपनीकडे केली आहे. या वस्तू विकत देण्याघेण्यावरून उद्योगपती विजय मल्ल्या व भारत सरकार यांच्यात जो वाद झाला आहे त्यामुळे त्या वस्तू आता परत द्याव्यात असे त्यांनी म्हटले आहे. या वस्तू मल्ल्या यांनी सुमारे १० कोटी रुपयांना विकत घेतल्या होत्या. ज्या व्यक्तीने या वस्तू विकत घेतल्या ती व्यक्ती सरकारला विरोध करीत आहे, त्यामुळे या वस्तूंचे आता काय होणार असा प्रश्न आपल्याला पडला आहे असे ओटीस यांनी म्हटले आहे.

दिल्लीत ‘मराठी भाषादिन’
(सुरेंद्र कुलकर्णी)

‘सार्वजनिक उत्सव समिती’, ‘जागतिक मराठी अकादमी’ आणि ‘आनंदवन सांस्कृतिक समिती, नवी दिल्ली’ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मराठी भाषिक घरकुलात ‘मराठी भाषादिन’ साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे श्याम मनोहर यांच्याशी, त्यांच्या जीवन व लेखन साहित्याविषयी यावेळी अनौपचारिक संवाद साधण्यात आला. तसेच त्यांच्या ‘उत्सुकतेने मी झोपलो’ या कादंबरीतील काही भागांचे वाचनही नीलेश कुलकर्णी आणि राजेंद्र जहागिरदार यांनी केले.