Leading International Marathi News Daily

सोमवार , १६ मार्च २००९

अग्रलेख

परिवारात पांगापांग

परिवाराच्या न वाजलेल्या शंखाचे ध्वनी हवेत विरायच्या आतच परिवारात पांगापांग सुरू झाली आहे. हे स्वाभाविकच म्हणावयास हवे. कारण शंखध्वनी समुदायांना एकत्र आणून त्यांना संघर्षांसाठी सिद्ध करावे म्हणून केला जातो. मात्र पहिल्याच प्रचार सभेत अडवाणींचा शंख वाजलाच नसल्यामुळे असेल कदाचित, पण आता संघ विरुद्ध भाजप, भाजप विरुद्ध विहिंप, आणि विहिंप विरुद्ध बजरंग दल असे भगव्या रंगाचे विविध आविष्कार प्रगट होऊ लागले आहेत. त्यातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील शिवसेनेच्या भगव्या रंगाने आपला वेगळाच जरीपटका, शरद पवारांच्या मदतीने फडकवायचे घाटत असल्यामुळे, तसेच रालोआमधील नवीन पटनाईक

 

यांनी ओरिसात भाजपला टांग मारल्यामुळे आता एकूणच गोंधळात भर पडली आहे. पटनाईक यांच्या बिजू जनता दलाने एकदम १८० अंशांनी उडी मारून थेट तिसऱ्या आघाडीशीच, आणि त्यातही लाल बावटय़ाच्या मार्क्‍सवाद्यांशी, संपर्क जोडल्यामुळे हतबल झालेल्या भाजपला ‘घरभेद्यां’ना कसे आवरावे हाच प्रश्न भेडसावू लागला आहे. मायावतींनी पत्रिका छापून व्हायच्या आतच तिसऱ्या आघाडीशी काडीमोड घेतला हे काही भाजपवाल्यांना सुचिन्ह वाटत असून त्यांनी आपले बहनजींबरोबरचे रक्षाबंधनाचे संबंध पुन्हा स्थापित करावे, असे पक्षात सुचविले आहे. देशामधील तमाम भांडवलदार वर्गाने नरेंद्र मोदी यांच्या शिरावर वरदहस्त ठेवल्यामुळे लालकृष्ण अडवाणी अस्वस्थ व्हावेत हे समजण्यासारखे होतेच. परंतु मोदींना भले मोठे प्रशस्तिपत्र देण्याऱ्या अडवाणींनी मोदी आपले खरे वारस नाहीत असे जाहीर करावे, हे मात्र त्या पांगापांगीचे अधिकच विनोदी व विदारक रूप आहे. उद्या समजा (म्हणजे तशी खात्रीच समजा) पक्षाचा सर्वच स्तरावर पाडाव झाला, तर मोदींसमवेत सत्तेची गादी निदान गुजरातेत तरी कायम ठेवता येईल, या हेतूने त्यांनी ‘खरा’ हा शब्दप्रयोग वापरला. मोदींना अडवाणींनी झिडकारले तरी मोदींनी अजून अडवाणींना नाकारलेले नाही. ती वेळ निवडणुकीनंतर येऊ शकते. गुजरातमधल्या गांधीनगरातून अडवाणींना पुन्हा लढायचे आहे, हा अडवाणींना दिसणारा धोका आहे. शाखेत तयार झालेल्या आणि स्वत:ला शिस्तबद्ध मानणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये अशी बेबंदशाही माजावी हा त्या दशग्रंथी, शैवपंथी रावणाचा शाप मानायचा की बाबरी मशीद पाडून सतरा वर्षे झाली तरी आपले मंदिर बांधले गेले नाही म्हणून रागावलेल्या रामाचा कोप समजायचा, हे नागपूरला ठरेलच. भाजपचा वचननामा प्रसिद्ध करायच्या कार्यक्रमातच त्यांचे प्रवक्ते अरुण जेटली वार्ताहरांच्या गर्दीत मागे कुठे तरी होते. जेटलींना आणा, जेटली कुठे आहेत, असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी उपस्थित केला, तेव्हा जेटलींना पत्रकारांच्या मागच्या रांगेतून पुढे आणावे लागले. जेटली व्यासपीठावर आले, तरी त्यांचा चेहरा पश्चिमेकडे होता. अडवाणी उत्तरेकडे पाहात होते आणि पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांचे कुठेच लक्ष नव्हते. वृत्तपत्रकारांच्या नजरेतून हे सुटू शकलेले नाही. कार्यक्रम आटोपताच एरवी नको ती आणि नको तेवढी माहिती पुरवणारे जेटली पत्रकारांना न भेटताच निघून गेले. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह, नरेंद्र मोदी ही मंडळी पंतप्रधान होण्यास उत्सुक आहेत. अडवाणींनी मिनतवाऱ्या करून त्यांना शांत केले आणि स्वत:च्या उमेदवारीला पाठिंबा मिळवला. अरुण जेटली यांनी आतापर्यंत शांत राहणे पसंत केले होते, परंतु भाजपचे सहप्रभारी म्हणून सुधांशू मित्तल यांची झालेली नियुक्ती जेटलींच्या रुसव्याला कारणीभूत ठरली आहे. प्रमोद महाजन आणि अरुण जेटली यांच्यात कधीच सख्य नव्हते. मित्तल हे महाजनांचे आर्थिक सूत्रधार होते, असे म्हटले जाते. महाजन यांनी भाजपच्या चारित्र्यसंपन्न प्रतिमेला धक्का लावला, असा प्रचार जेटली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छावणीतली नेतेमंडळी फार पूर्वीपासून करीत आली आहेत. मित्तल आणि जेटली हे तेव्हापासून एका पक्षात परंतु दोन गटात आहेत. त्यामुळे अडवाणी, राजनाथसिंह यांनी आपल्याला विश्वासात न घेता मित्तल यांची नियुक्ती करावी, हे जेटलींच्या पचनी पडलेले नाही. अडवाणींनी जेटलींची बाजूही घेतली नाही आणि त्यांना विरोधही केला नाही. जेटलींना त्यांचे हे काठावरले वागणे अर्थातच बरोबर वाटले नाही. बंडाचा हा झेंडा पक्षात फक्त जेटलींनीच मिरवावा, असे थोडेच आहे? राजनाथसिंहांचे अडवाणींविरुद्ध बंड मधूनच उफाळून येते आणि थंडही होते. गोपीनाथ मुंडे हे नितीन गडकरींवर संतापतात आणि राजीनामा द्यायची भाषा उच्चारतात. गडकरींना तर मुंडे यांचे ओझे वाटू लागते. गडकरींच्या पसंतीचे कार्यकर्ते उमेदवारीच्या रिंगणात दिसणार नाहीत हे मुंडे पाहतात आणि मुंडय़ांचे पतंग गडकरींकडून दिल्लीच्या चांदणी चौकातल्या मांजाने परस्पर कापायचा उद्योग केला जातो. जावडेकरांचे प्रकाश नेमके कोणत्या कलाचे आहेत याचा पत्ता लागत नाही. पण त्यांना आव मात्र प्रमोद महाजनांचा आणायचा असतो. पक्षाचे एक उपाध्यक्ष कल्याणसिंह यांनी पक्ष सोडल्याने उत्तर प्रदेशात आपली डाळ शिजणार की नाही, याची चिंता वाहण्यापेक्षा राजनाथसिंहांना अडवाणींवर मात करायची इच्छा होते. त्यांना अधूनमधून डॉ. मुरलीमनोहर जोशी मदत करतात. जसवंतसिंह हे राजस्थानचे, पण वसुंधराराजे यांचे मुख्यमंत्रिपद निवडणुकीच्या मार्गानेच दूर झाले म्हणून त्यांचा रथ अजून जमिनीवर उतरलेलाच नाही. वसुंधराराजे यांचे नावही सध्या चर्चेत येत नाही. ही परिवाराची मारामारी चालूच राहावी, असा नागपूरच्या केंद्राचा हेतू दिसतो. नागपूरपासून त्यांच्या निवडणुकीच्या बैठकांना प्रारंभ झाला असला तरी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, अशी या परिवारातल्या पक्षाची अवस्था झाली आहे. सुशासन, विकास आणि सुरक्षा हे भाजपचे प्रचाराचे या खेपेचे तीन स्तंभ होत. पण प्रत्येक मुद्दय़ाची त्यांनीच पुरती वासलात लावून टाकली आहे. शनिवारी दिल्लीत अडवाणी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेल्या वचननाम्यात ‘राम मंदिर’ अंतर्धान पावले आहे आणि संगणकाचा ‘रॅम’ त्यात प्रगटला आहे. म्हणजे एकेकाळी राजीव गांधींच्या कॉम्प्युटर क्रांतीवर टीका करणारे आता ‘रामा’ऐवजी ‘रॅम’ला शरण जात आहेत. आर्थिक मंदीच्या भेडसावणाऱ्या सावटापासून जनतेला अभय देणे दूरच, जनतेच्या दैनंदिन जगण्यातील अडचणींवर लक्ष केंद्रित करणे दूरच, भाजप आता आपल्या माथ्यावर दाटू पाहणाऱ्या पराभवाच्या सावटाला दूर करण्यासाठी जे उपाय योजत आहे ते त्याच्या भांबावलेपणाचेच दर्शन घडवीत आहे. मोफत तांदूळ, मोफत टी.व्ही. संच अशा प्रकारची वैयक्तिक पातळीवरील प्रलोभने ही दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांची मक्तेदारी होती. त्यातही ‘राष्ट्रीय विचार’ जिथे थोडा बाजूला पडतो, अशा विधानसभांच्या निवडणुकांमध्ये या क्लृप्त्यांचा वापर प्रामुख्याने झालेला आहे. ‘भाजप’च्या वचननाम्याने मात्र लोकसभेच्या राष्ट्रीय राजकारणाला स्थानिक पातळीवर आणले आहे. जनतेच्या दैनंदिन गरजांचा विचार मांडण्याऐवजी तिला भावनिक भूल देण्याची परंपरा भाजपने जशी राष्ट्रीय पातळीवर कायम ठेवली आहे, तशीच ती प्रादेशिक पातळीवरही आहे. याचा प्रत्यय भाजपच्या कर्नाटकमधील कार्यकर्त्यांनीही दिला आहे. एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चार्ली चॅप्लिनचा तात्पुरता पुतळा उभा करण्यास या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. चित्रीकरण परिसरात महादेवाचे मंदिर आहे आणि मंदिराच्या जवळ चॅप्लिनचा पुतळा उभारू नये, कारण तो ख्रिश्चन धर्मीय होता, अशी या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. चॅप्लिनकडे आजवर ख्रिश्चन म्हणून कोणी पाहिले नव्हते. राजकीय स्वरूपाचे अनेक आरोप त्याच्यावर झाले, तरीही त्याला कोणी धार्मिक ठरविले नव्हते. भाजप आणि त्यांच्या महाराष्ट्रातील सहकाऱ्यांचे ‘हिटलर प्रेम’ प्रसिद्ध आहे. चॅप्लिनने ‘द डिक्टेटर’मध्ये हिटलरची आणि हुकूमशहांची लक्तरे टांगली होती. हिटलरचे विरोधक ते आपले विरोधक अशी भूमिका घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपली पक्षीय विचारधारा कायम राखली, असे मात्र म्हणता येईल. वचननाम्याचा हा पहिला हप्ता असून, उर्वरित वचननामा टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहे, असे प्रसिद्ध झाले आहे. बहुमताची जुळवाजुळव करण्यात आणि त्यासाठीचे डावपेच आखण्यातच आपल्या पक्षांची शक्ती मुख्यत: खर्च होत आहे. देशाचा, मतदारांचा, त्यांच्या खऱ्या गरजांचा अभ्यास करण्यात ना कोणाला रस आहे, ना त्यांना त्यासाठी वेळ आहे. उदंड झाली भांडणे, अशी भाजपची निवडणुकीच्या तोंडावरची अवस्था झाली आहे.