Leading International Marathi News Daily

सोमवार , १६ मार्च २००९

राजू श्रीवास्तवही कॉँग्रेसतर्फे निवडणुकीच्या रिंगणात?
मुंबई, १५ मार्च / प्रतिनिधी

नेत्यांची खिल्ली उडवून प्रेक्षकांना हसविणारा राजू श्रीवास्तव आता स्वत: नेता होण्याचे स्वप्न पाहू लागला आहे. उत्तरप्रदेशातील ज्या फुलपूरच्या जागेवरून जवाहरलाला नेहरू निवडून आले होते त्याच जागेवरून कॉँग्रेस पक्षातर्फे राजू श्रीवास्तव लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहील, अशी चर्चा आहे. जवाहरलाल नेहरूंप्रमाणेच भारताचे अजून एक माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग हेसुद्धा १९७१ साली इंडियन नॅशनल कॉँग्रेस पक्षातर्फे याच जागेवरून निवडून आले होते.

अमरसिंग म्हणतात..
कमल हो या हाथी,
भाई बहन का हैं साथी

लखनौ, १५ मार्च/पीटीआय

भाजप नेते लालकृष्ण अडवाणी निवडणुकीनंतर पंतप्रधान झालेच तर बसपा प्रमुख मायावती उपपंतप्रधान होतील. कारण दोन्ही पक्षांचे नाते भावाबहिणीचे आहे, अशी खोचक टीका समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंग यांनी आज केली. पक्ष कार्यकर्त्यांपुढे बोलताना ते म्हणाले की, मायावती यांनी उत्तर प्रदेशात भाजपच्या पाठिंब्याने तीनदा सरकार स्थापन केले. भाजपचे लखनौतील उमेदवार लालजी टंडन यांना त्यांनी अगोदरच राखी बांधली आहे. त्यामुळे त्यांचे नाते भावाबहिणीचे आहे. त्यामुळेच अडवाणी पंतप्रधान झाले तर मायावती उपपंतप्रधान होतील याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही.

‘एकटा जीव सदाशिव’
मला भीती वाटत होती तसंच झालं. माझं तिकीट शेवटी साहेबांनी कापलं. परवा माझा सत्कार समारंभ झाला. त्या वेळी साहेबांनी माझं तिकीट कापलं जाणार याची ‘हिंट’ दिली होती. साहेब त्या वेळी म्हणाले होते, ‘सदाशिवरावांनी आता थांबलं पाहिजे. तरुणांना संधी दिली पाहिजे.’ ‘त’वरून ताकभात न ओळखण्याएवढा मी अडाणी नाहीये. तरीही एक मन म्हणत होतं, साहेबांबरोबर इतकी वर्षे आहेस, साहेब या वेळी तुला नक्की चान्स देतील. पण दुसरं मन म्हणत होतं, साहेब तुझा यंदा ‘मोरया’ करणार. दुसरं मन खरं ठरलं. आता तुम्ही म्हणाल, तुला साहेबांनी खासदारकी दिली. राज्यात मंत्रिपद दिलं. मग अजून किती आशा ठेवतोस. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. पण राजकारणात राहून असंच होतं. सत्ता आपल्याच घरात रहावी, असं वाटतं. आम्ही काय कॉम्रेड, समाजवाद्यांसारखी संत माणसं नाहीत. त्यांना कसं काय जमतं कुणास ठाऊक!

खरं सांगा,
उमेदवारी कोणाला?

जनता दलाच्या एका नेत्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील एका इच्छुकाचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले. लगोलग त्या उमेदवाराने पत्रकार परिषद घेतली आणि आपण निवडणूक का आणि कशी लढविणार आहोत, याची माहितीही दिली. त्यानंतर त्याने मेळावा घेण्याची तयारीही सुरू केली, ..पण, अचानक कुठेतरी माशी िशकली. या पक्षाच्या दुसऱ्याच एका नेत्याने जाहीर केले, ‘‘आमच्या पक्षाने आतापर्यंत कुणालाही उमेदवारी दिलेली नाही,’’ या घोषणेने हवेत तरंगणारा हा उमेदवार एकदम जमिनीवर आला, त्या पक्षाचे कार्यकर्तेही संभ्रमित झाले. एक नेता उमेदवारी घोषित करतो आणि दुसरा ती रद्द करतो, अशा या प्रकारामुळे पक्षांतर्गत गटबाजीचीच चर्चा सुरू झाली आहे.

‘टीम अडवाणी’कडे सत्ता सोपवा- मोदी
पुणे, १५ मार्च / खास प्रतिनिधी

मुंबईतील हल्ल्यानंतर पाकिस्तानची तक्रार करण्यासाठी कटोरा घेऊन अमेरिकेकडे जाणारे आणि ‘व्होटबँक’चे राजकारण करणारे केंद्रातील काँग्रेस आघाडीचे सरकार देशाला काय सुरक्षा पुरवणार, असा सवाल करीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी, विकास व सुरक्षा हवी असल्यास भाजप आघाडीच्या ‘टीम अडवाणी’कडे केंद्रातील सत्ता सोपवा, असे आवाहन केले. आणि पुण्यातील पहिल्याच जाहीर सभेत भाजपच्या प्रचाराचा आज नारळ फोडला. ‘महाराष्ट्रातील महिलेला राष्ट्रपती बनवून काँग्रेसने शरद पवार यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्याची खेळी केली आहे. आता पवारांमध्ये दम असेल तर त्यांनी भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान तरी महाराष्ट्राचा करून दाखवावा,’ असे आव्हान देऊन मोदी यांनी पवारांनाही अंगावर घेतले.

ठाण्यात शिवसेनेने दुसऱ्यांदा केला
भाजपचा मतदारसंघ ‘हायजॅक’!
संतोष प्रधान, मुंबई, १५ मार्च
१९९६ मध्ये रामभाऊ कापसे हे खासदार असतानाही शिवसेनेने आपली ताकद वाढल्याचा दावा करून ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपकडून अक्षरक्ष: हिसकावून घेतला होता..१३ वर्षांंनंतर त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे.. कल्याण हा नवा लोकसभा मतदारसंघ भाजपला अनुकूल असताना जागावाटपात शिवसेनेच्या वाटय़ाला गेला आणि कल्याणच्या तुलनेत काहीसा कठीण असलेल्या शेजारील भिवंडी मतदारसंघाची जबाबदारी भाजपवर येऊन पडली आहे.

‘व्हॉट अ‍ॅन आयडिया सर जी’!
सुहास सरदेशमुख, उस्मानाबाद, १५ मार्च

लोकसभेच्या मतदारसंघाचे कार्यक्षेत्र मोठे. प्रत्येक गावात पोहोचायचे म्हटले तरी दोन महिने लागतील. उस्मानाबाद मतदारसंघात एक हजार १४४ गावे. मतदारसंघांची संख्या लाखांत. निवडणूक आयोगाने मतदानादिवशीसुद्धा फक्त तीनच वाहने वापरण्यास परवानगी दिली आहे. त्या दिवशी ‘नेटवर्क’ मजबूत हवेच.. या सर्व परिस्थितीचा विचार करून शिवसेनेचे इच्छुक उमेदवार प्राध्यापक रवी गायकवाड यांनी ‘आयडिया’ केली. शिवसेनेची विस्कटलेली घडी नव्याने बसविण्यासाठी मोबाईलचे ग्रूप कार्ड शिवसैनिकांना दिले. त्यामुळे शिवसैनिक ‘जय महाराष्ट्र’ घालत म्हणत आहेत ‘व्हॉट अ‍ॅन आयडिया ‘सर’जी!’ लोकसभेच्या उस्मानाबाद मतदारसंघात १६ लाख ८ हजार ९५६ मतदार आहेत. उस्मानाबाद, परंडा, बार्शी, उमरगा, औसा तालुक्यांत विस्तारलेल्या या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत असणे उमेदवारासाठी कधीही फायद्याचेच. कार्यकर्त्यांना एकसंध ठेवण्यासाठी आणि तातडीने निरोप देण्याची व्यवस्था करणे अपरिहार्य असते. निवडणूक आयोगाने वाहनांच्या वापराला बऱ्याच अंशी पायबंद घातला आहे.

मध्य प्रदेश: भाजप-काँग्रेसचे पत्ते खुले
भोपाळ, १५ मार्च / पी.टी.आय.

मध्य प्रदेशातील २९ लोकसभा मतदारसंघातील राजकीय हालचालींना आता चांगलाच वेग आला असून काँग्रेस आणि भाजपने काही मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसने १२ तर भाजपने २० उमेदवारांच्या नावाचे पत्ते खुले करून प्रचाराच्या लगीनघाईला तोंड फोडले. भाजपच्या यादीच प्रचाराची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा स्वराज यांना विदिशा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

विदर्भालाही राजकारणातील घराणेशाहीची परंपरा
मनोज जोशी, नागपूर, १५ मार्च

भारताने लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला असला तरी राजकारणात घराणेशाही मात्र संपली नाही. नेहरू आणि गांधी घराण्याने राजकीय वारसा त्यांच्याच कुटुंबात सुरू ठेवल्याबद्दल ते नेहमीच टीकेचा विषय बनले. मात्र सर्वच राजकीय पक्षांमध्ये काही ना काही प्रमाणात ही परंपरा कायम राखली गेल्याची उदाहरणे दिसतात. देशभरात दिसणाऱ्या या चित्राला महाराष्ट्रही अपवाद नाही आणि विदर्भातील लोकसभा निवडणुकींचा विचार केला तर हेच चित्र दिसून येते. काहीजणांनी प्रत्यक्ष निवडणुका लढल्या आहेत, तर काही नेत्यांनी आपल्या वारसांना राजकारणात आणून राजकीय वारसा पुढे सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. मुकुल वासनिक, भावना गवळी, कमल गवई, चित्रलेखा भोसले, सुधाकरराव नाईक यांचा पहिल्या प्रकारात समावेश असून दत्ता मेघे, विलास मुत्तेमवार, रणजित देशमुख इ. नेते दुसऱ्या प्रकारात मोडतात.

गोव्यात मगोपभोवती भाजपचा पिंगा
पणजी, १५ मार्च / पी.टी.आय.

लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपने जुना मित्रपक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी मैत्रीचा हात पुन्हा पुढे केला आहे. मगोप हा गोव्यातील सर्वात जुना राजकीय पक्ष असल्याने मैत्रीचा हात पुढे करून लोकसभेच्या दोन्ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजप नेते कामाला लागले आहेत.