Leading International Marathi News Daily

सोमवार , १६ मार्च २००९

रंग रेन डान्स- सातारा येथे पहिल्यांदाच रंगपंटमीला रंगला रेन डान्स. जय भवानी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या रेन डान्सचा आनंद तरुण-तरुणींनी रविवारी मनमुराद लुटला.

कोणाच्या मेहेरबानीची वाट पाहणार नाही- उदयनराजे
माळशिरस, १५ मार्च/वार्ताहर

लोकसभा निवडणूक लढण्याबाबत आपण ठाम असून त्यासाठी कोणाच्या तिकिटाच्या मेहेरबानीची वाट पाहणार नाही असे स्पष्ट केले. माजी मंत्री उदयनराजे भोसले यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा निर्णय होईपर्यंत आपण आपला पत्ता उघड करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. धवलनगर येथील प्रतापगड या आमदार प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी उदयनराजे भोसले आल्याचे समजताच पत्रकारांनी त्यांना गाठले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की सर्व पक्षांना आमची विनंती राहील की, त्यांनी आम्हाला वाट दाखवावी पण वाट लावू नये.

रंग बरसे...
सांगली, १५ मार्च / प्रतिनिधी

रंगाने भरलेल्या रहाडीत झेप घेण्यासाठी झालेली गर्दी.. अंगाअंगावर रंग भिरकविणाऱ्या तरूण- तरूणींची दुचाकीवरून उडालेली धूम.. डीजे सिस्टीमच्या तालावर बेधूंदपणे नाचत थिरकणारी तरूणाईची पावले.. अशा जल्लोष व उत्साहपूर्ण वातावरणात रविवारी उधळणारे रंगपंचमीचे विविध रंग सांगली शहरात पाहावयास मिळाले.

अक्कलकोट संस्थानातील दिवाणांच्या स्वामिनिष्ठ सेवाकार्यावर नवा प्रकाश!
एजाजहुसेन मुजावर,सोलापूर, १५ मार्च

ऐतिहासिक दस्तऐवज सापडला
थोरले नानासाहेब पेशवे आणि नाना फडणवीस यांच्याशी रक्ताचे नाते असूनही त्याचे अवडंबर न माजविता केवळ प्रामाणिक व निष्ठापूर्वक सेवा आणि कर्तृत्वाच्या जोरावर आपले महत्त्व वाढविणारे अक्कलकोट संस्थानातील दिवाण आप्पाजी राम गाडगीळ व त्यांचे पुत्र काशिराम आप्पाजी गाडगीळ यांच्या सेवाकार्यावर नव्याने प्रकाश टाकणारे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनात अक्कलकोट संस्थानाच्या कारभारातील बारकावेही सापडले आहेत.

उमेदवारीपूर्वीच कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीच्या तिघांचा प्रचार सुरू
कोल्हापूर, १५ मार्च / राजेंद्र जोशी

पक्षांतर्गत बंडखोरीचे मोठे आव्हान उभे राहण्याच्या शक्यतेने हादरून गेलेल्या पक्षश्रेष्ठींनी उमेदवारीविषयी कमालीचे मौन पाळले असताना स्पर्धेत असलेल्या राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांनी थेट प्रचारच सुरू केल्याने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात बंडखोरी अधिक ठळक झाली आहे. तिकीट देण्यापूर्वीच उमेदवार आपली उमेदवारी निश्चित असल्याच्या आविर्भावात गाठीभेटी आणि मेळावे घेऊ लागल्याने पक्षाध्यक्ष शरद पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कोणाला ‘कामाला लागा’ असा गुप्त संदेश दिला ? याबद्दल तर्कवितर्काना उधाण आले आहे.

महालक्ष्मीच्या मूर्तीची यावर्षी चांदीच्या रथातून नगरप्रदक्षिणा
कोल्हापूर, १५ मार्च / विशेष प्रतिनिधी

कोटय़वधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर परिसरात सुधारणांचा एक नवा अध्याय सुरू केल्यानंतर आता यंदा प्रथमच देवीची मूर्ती चांदीच्या रथातून नगरप्रदक्षिणेला निघणार आहे. यासाठी देवीच्या रथाला चांदीने मढविण्याचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू असून १० एप्रिल रोजी होणाऱ्या रथोत्सवाचे हे वेगळे आकर्षण असणार आहे.

सराफाच्या घराचे कुलूप तोडून आठ लाखांचा ऐवज पळविला
फलटण, १५ मार्च/वार्ताहर

शहरातील स्वामी विवेकानंदनगरमधील एका सराफाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटय़ांनी सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य असा अंदाजे ७ ते ८ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. उमेश मारुती चव्हाण हे सोन्याचांदीचे व्यापारी असून त्यांचा शहरातील स्वामी विवेकानंदनगर भागात दूरध्वनी केंद्रासमोर बंगला आहे. ते कामानिमित्त सतत फिरतीवर असतात. दोन दिवसांपूर्वी ते बंगळूर येथील घरी गेले होते. येथील बंगल्यात काल कोणी नसल्याने चोरटय़ांनी बंगल्याच्या मुख्य दाराचे कुलूप तोडले व आत प्रवेश करून कपाटातील २० तोळे सोन्याचे दागिने, ९ किलो चांदीचा दागिने, ३ लाख ८२ हजार रुपयांची रोकड, एक दूरदर्शन संच व इतर साहित्य मिळून अंदाजे ७ ते ८ लाखांचा ऐवज चोरून नेले आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल कदम करीत आहेत.

नाटय़ स्पर्धा अंतिम फेरीत ‘रुपक’ला चार बक्षिसे
सोलापूर, १५ मार्च/प्रतिनिधी

मुंबई येथे झालेल्या ४८ व्या राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत कन्नड (औरंगाबाद) येथील ‘द फिअर फॅक्टर’ हे नाटक प्रथम आले असून, सोलापूरच्या ‘रूपक’ नाटकास चार बक्षिसे मिळाली. सोलापूरच्या रंगकर्मी प्रतिष्ठानने सादर केलेले ‘रूपक’ हे नाटक पाचवे आले.राज्यातील विविध केंद्रांतून सादर झालेल्या २५७ नाटकांपैकी १८ नाटके मुंबईत अंतिम फेरीत सादर करण्यात आली. यात सोलापूरच्या ‘रूपक’ या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी प्रदीप कुलकर्णी व शोभा बोल्ली यांना पाचवे, तर याच दोघांना पुरुष आणि स्त्री अभिनयासाठी रौप्यपदक, पाश्र्वसंगीतासाठी साहीर नदाफ यांना तृतीय पारितोषिक मिळाले. रूपक या नाटकाचे लेखन रजनीश जोशी, नेपथ्य गुरू वठारे आणि प्रकाशयोजना उमेश बटाणे यांची होती. या नाटकास पोरे ब्रदर्स यांचे विशेष सहकार्य लाभले.

सोलापूर ग्राहक तक्रार मंचमध्ये सात हजार तक्रारी निकाली
सोलापूर, १५ मार्च/प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचमध्ये आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण ७२२३ तक्रारींपैकी ६९२८ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. गेल्या वर्षभरात ८७ लाख ४५ हजार ४९१ रुपयांपैकी ८५ लाख ६७ हजार ६८४ रुपयांएवढी नुकसान भरपाई अदा करण्यात आली.
जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचच्या कामकाजाचा आढावा मंचच्या अध्यक्ष संगीता धायगुडे यांनी घेतला. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचकडे सध्या २९५ तक्रारी प्रलंबित आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक १८९९ तक्रारी बँकांविरुध्दच्या असून त्यात १७९१ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर त्या खालोखाल विमा कंपन्यांविरुध्द १३०२ तक्रारी दाखल होत्या. त्यापैकी १२४२ तक्रारींची सुनावणी होऊन त्यांचा निपटारा करण्यात आला. याशिवाय वीज वितरण कंपनी-७८८, खासगी बांधकाम व्यावसायिक-४२८, वैद्यकीय सेवा त्रुटी-३४, दूरसंचार विभाग-३० याप्रमाणे दाखल तक्रारी आहेत. अन्य दाखल तक्रारींची संख्या २६८९ एवढी असल्याचे धायगुडे यांनी सांगितले.

पंढरपुरात पावसाने पिकांचे नुकसान
पंढरपूर, १५ मार्च/वार्ताहर

पंढरपूर शहर व परिसरात शनिवारी मध्यरात्री जोराचे वादळी वारे व विजांचा कडकडाट यासह हलक्या सरी कोसळल्या. हा अवकाळी पाऊस एक तास होता. यामुळे रब्बी पिकाबरोबर द्राक्ष, बेदाणे, शेड यांच्यासह आंबा बागांना झळ बसली आहे. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास जोरात वादळी वारे यायला सुरुवात झाली. अन् लगेच जोरात विजांच्या कडकडाटास सुरुवात होऊन पाऊसही आला, परंतु विजांचा आवाज इतका असायचा की अंगाचा थरकाप उडायचा. वीज इतकी लववत असे की घराला वा घराचे छताचे पत्रा अगर झाडाला चाटून जाते की काय असे वाटायचे. त्यामुळे नागरिकांची घाबरगुंडी होत होती. सध्या हरभरा, ज्वारी, करडई अशा रब्बी पिकांच्या राशी शेतात पडल्या आहेत. त्यामुळे या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी द्राक्ष बागांना रोगाने घेरले होते. त्यात शेतकरी आर्थिक अडचणीत आला होता. अनेक भागात मोठय़ा प्रमाणात बेदाना शेडमध्ये मनुका तयार करण्यासाठी द्राक्ष पसरली होती. अशातच ढगाळ वातावरण याचाही फटका बेदाणा उत्पादक यांना बसला आहे.गेल्या वर्षी अवकाळी पावसाने जोरात झोडपल्याने द्राक्ष, बेदाणा तयार करणारे शेतकरी यांना जबर आर्थिक झळ बसली त्यातून तो अद्याप सावरला जात नाही. नुकसानभरपाई मिळत नाही, तोच पुन्हा या अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकरी हादरून गेला आहे.

वडील रागावण्याच्या भीतीने मुलाची आत्महत्या
सोलापूर, १३ मार्च/प्रतिनिधी

रंगपंचमीनिमित्त घराजवळ रंग खेळताना गल्लीतील मुलांबरोबर तक्रार झाल्याने व त्याबाबत घरात आई-वडील रागवतील या भीतीने एका १२ वर्षांच्या मुलाने स्वतला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे घडली.अभिजित रवींद्र नागटिळक असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. रंगपंचमाच्या दिवशी रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. अभिजित हा दुपारी रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी गल्लीतील मुलांबरोबर रंग खेळत होता. परंतु रंग टाकण्याच्या कारणावरुन मुलांमध्ये भांडण झाले. त्यावेळी अभिजितविरुध्द इतर मुलांनी त्याच्या आई-वडिलांकडे तक्रार केली. त्यावेळी घरात वडील नव्हते. ते घरात आल्यानंतर तक्रार त्यांच्या कानावर जाईल व ते आपणास शिक्षा करतील या भीतीने अभिजित याने घरात कोणी नसताना स्वतला रॉकेलने पेटवून घेतले.

पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपसाठी धनश्री महाडिक हिची निवड
कराड, १५मार्च/वार्ताहर

उदयपूर (राजस्थान) येथे येत्या १ ते ६ मे या सहा दिवसांत पार पडणाऱ्या ज्युनियर आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये धनश्री महाडिक हिची निवड झाली आहे.धनश्री येथील बलभीम व्यायामशाळेची खेळाडू आहे.

मुलीच्या अपहरण प्रकरणातून तरुणाची निर्दोष मुक्तता
सोलापूर, १५ मार्च/प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील सातोली येथून एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन पंढरपूर व पुण्यात तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याच्या आरोपावरुन कैलास नवनाथ गाडे (वय १९, रा. सातोली) याची अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी.बिराजदार यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

अंनिस च्या मोहिमेला इचलकरंजीतून चांगला प्रतिसाद
इचलकरंजी, १५ मार्च / वार्ताहर

महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला जादूटोणा विरोधी कायदा प्रत्यक्षात आणावा या मागणीसाठी इचलकरंजी अंनिस शाखेतर्फे शहरात कायद्याची लढाई आता स्वरक्ताने या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. शहर अंनिस कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला के.डी.खुर्द यांनी पुष्पहार घालून अभिवादन केल्यांनतर स्वरक्ताची स््वाक्षरी मोहीम सुरू झाली. स्वरक्ताने सर्वानी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नांवे छोटे निवेदन लिहून राज्यातील संत व समाज सुधारकांचा वारसा स्मरावा आणि जादुटोणा विरोधी कायदा संवेदनशिलतेने त्वरीत करावा अशी विनंती करण्यात आली आहे. राज्यात २ मार्च रोजी महात्मा फुले यांच्या पुणे येथील वाडय़ातून सुरू झालेली ही राज्यव्यापी मोहीम १७ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रे सादर करून संपणार आहे.इचलकरंजीच्या या उपक्रमात शहर अध्यक्ष युसूफ तासगावे कार्याध्यक्ष विनायक चव्हाण, रघूनंदन फणसळकर तसेच टी.आर.शिंदे, किरण कटके, बजरंग लोणारी, सौ.मंगल सुर्वे, सौ.आशा बेलेकर, डॉ.कमल कराळे, वृषाली शिंदे, राजश्री शिंदे, डॉ.किरण कोठारी, संजय कोरे, डॉ.जितेंद्र शहा, प्रसाद कुलकर्णी आदी कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला.

‘परित्यक्तांच्या व्यथा समोर येणे आवश्यक’
कोल्हापूर, १५ मार्च / प्रतिनिधी

परित्यक्ता स्त्रिया आजही कटू वास्तव असून, त्यांच्या व्यथा लोकांसमोर आणणे आवश्यक असल्याचे मत प्रा. डॉ. अनिल सपकाळ यांनी येथे व्यक्त केले. ‘हिंदूोळा वास्तव परित्यक्तांचे’ या माहितीपटाच्या प्रदर्शनप्रसंगी ते बोलत होते. वंचित, उपेक्षित घटकांच्या प्रश्नाकडे समाजाचे लक्ष वेधणे हाच या माहितीपट निर्मितीमागील हेतू असल्याचे स्पष्ट करून प्रा. डॉ. सपकाळ यांनी कुटुंबाबाहेर फेकले गेल्याचे शल्य, अपमान उराशी घेऊन एकटेपणाने जीवनाचा लढा लढणाऱ्या या स्त्रिया सर्व समाजाच्या स्तरात आहेत. परंतु त्यांचे प्रश्न आजही दुर्लक्षित असल्याचे सांगितले.स्त्रीला आपल्या कुटुंबव्यवस्थेत अतिशय दुय्यम स्थान दिले जात असल्याबद्दल डॉ. भारती पाटील यांनी या वेळी खंत व्यक्त केली. माहितीपटाच्या प्रदर्शनानंतर उपस्थित महिलांनी खुलेपणाने प्रश्नांची चर्चा केली. अनेकजणींनी आपल्या व्यथा मांडल्या. डॉ. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे, उमा पानसरे, शोभना कांबळे, शीला सुळगावे, रंजना पवार, विद्या कांबळे, छाया पाटील आदी उपस्थित होते.

आसू व खटकेवस्तीमध्ये दुरंगी लढत होणार
फलटण, १५ मार्च/वार्ताहर

फलटण तालुक्यातील आसू व खटकेवस्ती या ग्रामपंचायतींच्या आज अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी ४३ अर्ज शिल्लक राहिल्याने दुरंगी लढत होत आहे. आसू ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी २६, खटकेवस्ती ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी १७ अर्ज राहिले आहेत.पाडेगाव व हणमंतवाडी ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रत्येकी २ अर्ज राहिले आहेत.

स्पर्धा परीक्षेमध्ये रोहित बागडे प्रथम
फलटण, १५ मार्च/वार्ताहर

शिवाजी विद्यापीठ संख्याशास्त्र शिक्षक संघातर्फे आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षेत येथील मुधोजी महाविद्यालयातील बी.एस्सी. प्रथम वर्षांतील रोहित रवींद्र बागडे या विद्यार्थ्यांने सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या चार जिल्हय़ांतून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच बीसीएस प्रथम वर्षांतील मधुरा क्षीरसागर हिने सातारा जिल्हय़ातून प्रथम क्रमांक मिळविला. या यशाबद्दल दोघांचेही अभिनंदन होत आहे.

‘संझगिरींच्या निधनाने डाव्या चळवळीला धक्का’
सोलापूर, १५ मार्च/प्रतिनिधी

राज्यात डावी चळवळ मजबूत करण्यासाठी कॉ. प्रभाकर संझगिरी यांनी सातत्याने केलेला संघर्ष डाव्या विचारांना भक्कम आधार देणारा होता. त्यांच्या निधनाने डावी चळवळीला धक्का बसल्याची प्रतिक्रिया माकपचे आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केली. माकपचे माजी केंद्रीय समिती सदस्य, प्रदेश सचिव तथा सिटूचे अध्यक्ष कॉ. प्रभाकर संझगिरी यांच्या निधनाबद्दल येथील माकप कार्यालयात आयोजित शोकसभेत ते बोलत होते. यावेळी दिवंगत कॉम्रेडना ‘लाल सलाम’ करून भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. संझगिरी हे मार्क्‍सवादी शिक्षक व तत्ववेत्ते होते. १९७८ साली विभानसभेत आपणास कॉ. संझगिरी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांना सामान्य गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, महिला, दीन-दलितांबद्दल विशेष कणव होती. त्यांच्या निधनामुळे आपण एका सच्च्या कृतिशील डाव्या नेत्याच्या मार्गदर्शनाला मुकलो, अशा शब्दात आमदार आडम यांनी भावना व्यक्त केल्या.

कराड अर्बनकडून फ्रॅँकिंग सुविधा
कराड, १५ मार्च/वार्ताहर

कराड अर्बन बँकेने फ्रॅकिंग मशिनद्वारे मुद्रांक विक्री सुरू करून ग्राहक सेवेचे पुढचे पाऊल उचलले आहे. कराड अर्बनने सातत्याने आधुनिकीकरणाचा स्वीकार करून दिलेली ग्राहक सेवा उज्ज्वल भवितव्याची नांदी असल्याचे गौरवोद्गार तहसीलदार धनाजी तोरस्कर यांनी काढले.
कराड अर्बन बँकेच्या येथील तळभाग शाखेमध्ये फ्रॅकिंग मशिनद्वारे मुद्रांक विक्री सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सी. ए. दिलीप गुरव, दुय्यम निबंधक पंकज पाटील यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

लोकसभा निवडणुकीत शर्थ करण्याचा भाजपचा निर्धार
कोल्हापूर, १५ मार्च / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत युतीच्या वतीने दोन्ही मतदारसंघात जे उमेदवार दिले जातील त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आला. बाळासाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. बाळासाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राजाराम शिपुगडे व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सुरेश हाळवणकर यांची प्रचारप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. दोन्ही मतदारसंघातील प्रचारयंत्रणा प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे.

जमिनीच्या वादातून भावजयीचे घर पेटविले
फलटण, १५ मार्च/वार्ताहर

जमिनीच्या वादाच्या कारणावरून सोमंथळी (ता. फलटण) येथील स्वत:च्या भावजयीचे घर पेटवून टाकल्याप्रकरणी रामदास अहिवळे या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदास अहिवळे हा दि. ११ रोजी दु. ३.३०च्या सुमारास सोमंथळी (ता. फलटण) येथील खलाटेवस्तीवर राहणाऱ्या रंजना मुकुंद अहिवळे यांच्या घरी आला. रंजना या रामदास याच्या भावजय असून, वडिलोपार्जित जमीन वारसा हक्काने रंजनाच्या नावावर कशी झाली, यावरून त्यांच्यात वादावादी झाली. या वेळी संतप्त रामदास यांनी हातात कुऱ्हाड घेऊन घरातील दारांवर व खिडक्यांवर मारण्यास सुरुवात केल्यानंतर श्रीमती रंजना या पळून गेल्या. नंतर रामदास याने घरातील दारे, खिडक्या, कपडय़ांवर रॉकेल ओतून घर पेटवून दिले. घरातील सर्व साहित्य जळून गेले असून, या घटनेबाबत श्रीमती रंजना अहिवळे यांनी फिर्याद दिली आहे.

‘आभाळाची भाषा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
कोल्हापूर, १५ मार्च / प्रतिनिधी

दु:खाला आपलेसे करणारी आणि त्यामधून हितगुज साधत माफक सुख शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारी मनोहर इनामदार यांची कविता आहे. संत परंपरेशी ती जवळीक साधणारी आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी येथे केले. कवी इनामदार यांच्या आभाळाची भाषा या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. आभाळाची भाषा या काव्यसंग्रह पुस्तकाच्या विक्रीतून जमा होणारी रक्कम सामाजिक संस्थेला दिली जाणार असल्याचे श्री.हणमंत इनामदार यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ.राजेखान शानेदिवाण, अशोक भोईटे, निलांबरी कुलकर्णी आदींची भाषणे झाली. प्रकाश कुलकर्णी यांनी आभार मानले.

परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विभुते
सोलापूर, १५ मार्च/प्रतिनिधी

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी एन. के. विभूते तर सचिवपदी एस. एस. कादरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच खजिनदारपदी हरिभाऊ नरखेडकर यांची निवड झाली. संघटनेची बैठक उत्तर कसब्यात नुकतीच झाली.