Leading International Marathi News Daily

सोमवार , १६ मार्च २००९

वाट चुकून जंगलाबाहेर पडलेल्या एका बिबटय़ाच्या मागे गुवाहाटीजवळच्या ज्योतीकुच्ची गावातील गावकरी लागले. आणि त्याला पकडण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी त्याच्यावर (भुलीच्या इंजेक्शनची) बंदूक रोखली!

पाकिस्तान यादवीच्या उंबरठय़ावर!
नवाझ शरीफ यांच्या ‘लाँग मार्च’चे इस्लामाबादकडे कूच

इस्लामाबाद, १५ मार्च/वृत्तसंस्था

झरदारी सरकार उखडून टाका; शरीफ यांचे आवाहन
अनेक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी ‘लाँग मार्च’मध्ये सामील
पाकिस्तानच्या राजधानीला लष्करी छावणीचे स्वरूप
पाकिस्तानात गेले काही दिवस असलेल्या वादळी आणि अनिश्चिततेच्या वातावरणाने आज एक निर्णायक वळण घेतले. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांच्यावर बजावण्यात आलेला बंदीहुकूम मोडून लाहोरहून इस्लामाबादकडे कूच केले. सरकारला दिलेल्या या उघड आव्हानात त्यांना अक्षरश: हजारो समर्थकांनी सक्रिय साथ दिली. त्याच वेळी पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या पोलीस प्रमुखांसह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनीही आपापल्या पदांचे राजीनामे देऊन शरीफ यांच्या ‘लाँग मार्च’मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानातील राजकीय वातावरण यादवीसदृश्य स्थितीत जाऊन पोहोचले आहे. या पाश्र्वभूमीवर उद्या, सोमवारी पार्लमेंटसमोर धरणे धरण्याचा शरीफ यांचा निर्धार यशस्वी होतो अथवा त्याला हिंसक वळण लागून त्याचे पडसाद देशभर उमटतात किंवा अन्य काही अनुचित वळण लागते याकडे भारत व अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत झरदारी पदत्याग करणार नाही. तसेच विद्यमान परिस्थितीचा फायदा घेत लष्कर सत्ता काबीज करण्याचीही शक्यता नाही, असे झरदारी यांच्या गोटातून सांगण्यात आले.

नजरकैद मोडून शरीफ रस्त्यावर
पाकिस्तानमध्ये निदर्शक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री

लाहोर, १५ मार्च/वृत्तसंस्था

पाकिस्तानचे विरोधी पक्ष नेते नवाझ शरीफ आणि त्यांचे धाकटे बंधू व पंजाब प्रांताचे माजी मुख्यमंत्री शहाबाज शरीफ यांनी त्यांच्यावर घातलेले बंदी आदेश झुगारून पाकिस्तान शासनाविरोधात होणाऱ्या निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडले. पाकिस्तानच्या पार्लमेंटबाहेर होणाऱ्या या निदर्शनांमध्ये पाकिस्तानी जनता आणि पीएमएल-एन या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करीत शरीफ बंधूंनी त्यांच्यावर घालण्यात आलेले बंदी आदेश अवैध असल्याची पाकिस्तान शासनावर टीका केली. दरम्यान, शरीफ यांच्या पक्षाचे हिरवे झेंडे घेतलेले समर्थक, वकील मंडळी आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक झडली असून पाकिस्तानातील अस्थिर राजकीय वातावरण आता अधिकच स्फोटक बनले आहे. या निदर्शकांनी पोलिसी बळाचा निषेध करीत पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांचे लष्करी गणवेशातील छायाचित्र या निदर्शनांच्या वेळी दाखविले.

मायावती तिसऱ्या आघाडीबरोबरच; मात्र निवडणूक स्वबळावर लढणार
नवी दिल्ली, १५ मार्च/खास प्रतिनिधी

उत्तर प्रदेशात आपण स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक लढविणार आहोत. मात्र आपण तिसऱ्या आघाडीबरोबरच असून निवडणुकीनंतर काँग्रेसेतर व भाजपेतर सरकार स्थापन करण्यासाठी व्यूहरचना करीत आहोत, अशी घोषणा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली. तर त्याच दरम्यान तिसऱ्या आघाडीचे प्रवर्तक असलेल्या माकपाचे सीताराम येचुरी यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अध्यक्ष असलेल्या शरद यादव यांचीच भेट घेऊन किमानपक्षी निवडणुकीनंतर ते तिसऱ्या आघाडीशी संधान बांधू शकतील का याची चाचपणी केली. या घडामोडींमुळे निवडणूक ज्वरात एकदम वाढ झाली.गेल्या आठवडय़ात कर्नाटकमधील तुमकूर येथे तिसऱ्या आघाडीचे रणशिंग फुंकले गेले होते. मात्र त्या मेळाव्यास अद्रमुकच्या जयललिता यांच्याप्रमाणेच मायावतीही हजर राहिल्या नव्हत्या.

चहापानावर बहिष्काराची विरोधकांची परंपरा कायम !
मुंबई, १५ मार्च/ खास प्रतिनिधी

शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावून सावरकारांची बाजू घेणारे, ऐन परिक्षेच्यावेळी लक्षावधी विद्यार्थ्यांना अंधारात अभ्यास करायला लावणारे आणि लोकप्रतिनिधींना जनतेच्या कामासाठी वेळ न देणाऱ्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत असल्याचे विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी आज जाहीर केले. शेतकऱ्यांना छळणाऱ्या काँग्रेसचे आमदार दिलीप सानंदा यांच्या वडिलांवर पोलिसांनी कारवाई करू नये म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दबाव आणल्याप्रकरणी न्यायालयाने ताशेरे ओढले असून २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अशा सरकारचा चहा आम्ही घेऊ शकत नाही, असे रामदास कदम यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले.

आनंद यादव यांची तुकारामचरणी माफी
राजीनाम्याच्या मागणीवर वारकरी संप्रदाय ठाम
देहूगाव, १५ मार्च / वार्ताहर
‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह लेखन केल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक व महाबळेश्वर येथील नियोजित संमेलनाचे अध्यक्ष डॉ.आनंद यादव यांनी आज सकाळी देहू येथे तुकोबांच्या चरणी माथा टेकून झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. मात्र वारकरी संप्रदाय त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहे. महाबळेश्वर येथे २१, २२ आणि २३ मार्चला होणाऱ्या साहित्य संमेलनात ‘गाथा पारायण’ करण्याचा इशारा संत तुकाराम महाराज देवस्थान व वारकरी संप्रदायाने दिला आहे. संमेलन व्यवस्थित पार पडावे, कुठलाही वाद होऊ नये या भूमिकेतून यादव यांनी आज देहूची वारी केली.

मनसेचा शिवसेनेला ‘दे धक्का’ कठीणच
संदीप आचार्य, मुंबई, १५ मार्च

मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागा लढण्याचे जाहीर करतानाच राज्यात मोजक्या जागा लढवून जिंकण्यासाठी सर्वशक्ती पणाला लवण्याची भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर मराठी मतांचे विभाजन होऊन त्याचा फटका शिवसेना-भाजपला बसेल असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत असले तरी मुंबईसह राज्यात मनसे सेना-भाजप युतीला किंचितही धक्का लावू शकणार नाही, असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेसच्या जागा कमी करण्यासाठी पवारांचा नवा डाव
मुंबई, १५ मार्च / खास प्रतिनिधी

शिवसेना-भाजप युतीचे जागावाटप पूर्ण झाले असले तरी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जागावाटपाची गाडी अद्यापी रुळावर येऊ शकलेली नाही. दोन्ही पक्ष ताठर भूमिका सोडण्यास फारसे तयार नाहीत. राष्ट्रवादीने त्यांच्यासाठी अनुकूल असलेल्या सर्व जागा सोडवून घेतल्यानंतर काँग्रेसच्या ताब्यातील जागा मित्र पक्षांसाठी सोडाव्यात असा डाव टाकून शरद पवार यांनी काँग्रेसच्या जागा कमी करण्याची खेळी केली आहे. जागावाटपात काँग्रेसच्या कोटय़ातील शिर्डी, मुंबई उत्तर-पश्चिम, अकोला, रामटेक व जालना मतदारसंघांवरून वाद सुरू आहे. रामदास आठवले यांच्यासाठी शिर्डीची जागा काँग्रेसने सोडावी, अशी सूचना पवारांनी केली आहे. शिर्डीच्या बदल्यात दुसरी आमच्या पसंतीची जागा मिळावी, अशी अपेक्षा काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आज तातडीची बैठक
मुंबई, १५ मार्च / प्रतिनिधी

राष्ट्रवादीबरोबर सुरू असलेल्या जागावाटपाचा तिढा कायम असल्याने काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी काँग्रेसने उद्या सोमवारी टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची तातडीची बैठक बोलविली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये जागावाटपाबाबत अद्यापही एकमत होऊ शकलेले नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकूणच काँग्रेसविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थतेचे वातावरण आहे. या पाश्र्वभूमीवर वेगळा विचार करावा, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये जोर धरीत आहे. त्याबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी उद्या तातडीची बैठक बोलविली असल्याचे समजते. ची बैठक बोलविली असल्याचे समजते.

सांताक्रूझ येथे समुद्रात अज्ञात विदेशी व्यक्तीचा मृतदेह सापडला
मुंबई, १५ मार्च / प्रतिनिधी
सांताक्रूझ येथे आज समुद्रात एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असून, तो एका विदेशी नागरिकाचा असल्याचे बोलले जाते. मात्र पोलिसांकडून त्याला दुजोरा मिळू शकला नाही. सांताक्रूझ येथील संतूर हॉटेलमागील समुद्रात हा मृतदेह सापडला असून, मृत व्यक्तीच्या गळ्यात दगड बांधून त्याला समुद्रात फेकण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले.

 


प्रत्येक शुक्रवारी