Leading International Marathi News Daily

सोमवार , १६ मार्च २००९

मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या क्षेत्रात अतिक्रमण करून कायम असलेले बलसा गाव रविवारी मोठय़ा बंदोबस्तात हटविण्यात आले.ही कारवाई झाली तर आपण आत्महत्या करू, असा इशारा एका गावकऱ्याने मनोऱ्यावर चढून दिला. पोलिसांच्या उपस्थितीत गावकऱ्यांनी आपला संसार गुंडाळला.

बलशावर नांगर फिरला!
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमित गाव उठविल

परभणी, १५ मार्च/वार्ताहर

मराठवाडा कृषी विद्यापीठाकरिता घरे व गावाची जमीन संपादित केल्यानंतरही गेल्या २५ वर्षांपासून विद्यापीठाच्याच जमिनीवर राहिलेल्या बलसा गावावर आज जिल्हा प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात कारवाईचा नांगर फिरविला. हे गाव कोणत्याही परिस्थितीत दि. २६ मार्चपर्यंत हटवून संबंधित जमीन विद्यापीठाच्या ताब्यात देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता.

हे जरासे वेगळे
कार्यालय उघडण्याच्या वेळी पोहोचलो एकदा. दूरध्वनी कार्यालयाची मुख्य इमारत असते इतर सरकारी इमारतीपेक्षा वेगळी. उंचच्या उंच, दाराशी सुरक्षा कर्मचारी. यांची नेहमीच भीती वाटते. दिसायला भारदस्त. शिस्त, पोषाख यामुळे प्रवेशद्वाराजवळ गेल्याबरोबर त्यांच्या चौकशीला सामोरं जावं लागतं.आत गेलं की, इथून तिथून मोकळ्या पॅसेजमधून जावं लागतं. वेगवेगळ्या पदासकट दारावर पाटय़ा लावलेल्या असतात. दारं असतात बंद. बिनपाटीचं एखादं दार ढकलून पाहिलं, तर आत उभ्या रॅकवर नुसती रंगीत वायरांची शिस्तबद्ध बांधणी केलेली दिसते. छोटे छोटे, लाल, हिरवे दिवे.

रमेश आडसकर यांचेच नाव आज जाहीर होण्याची शक्यता
बीड, १५ मार्च/वार्ताहर

दोन्ही काँग्रेस आघाडीतील समझोता आणि खासदार जयसिंगराव गायकवाड यांच्या बंडाच्या इशाऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावाची अडलेली घोषणा उद्या (सोमवारी) सायंकाळी होण्याची शक्यता आहे. आधी जाहीर केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश आडसकर यांचेच नाव जाहीर होईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेकडून संजय जाधव? आघाडीचा गुंता वाढला!
परभणी, १५ मार्च/वार्ताहर
डॉक्टर, तुम्हीसुद्धा!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वरपूडकर-भांबळे असा संघर्ष चालू असताना पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी व सरस्वती-धन्वंतरी दंत वैद्यकीय महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पाटील यांचीही निवडणूक लढविण्याची मनीषा आहे. प्राप्त परिस्थितीत पक्षाने आपल्या कार्याचा विचार करून आपल्याला उमेदवारी द्यावी, असे सादरीकरण त्यांनी पक्षाच्या नेत्यांकडे केलेले आहे.

‘सॉ मिल’ला आग लागून साठ लाखांचे नुकसान
नांदेड, १५ मार्च/वार्ताहर

शहरालगत असलेल्या वाजेगाव परिसरातील ‘हनुमान सॉ मिल’ला आग लागून ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले. तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आज सकाळी आग विझविण्यात यश आले. वाजेगाव परिसरात सुरेश पटेल यांच्या मालकीची ‘हनुमान सॉ मिल’ आहे. त्यातील लाकडांनी रात्री अचानक पेट घेतला. पोलिसांना लगेच माहिती देण्यात आली. रात्री ११ वाजता आग लागली, त्या वेळी शहरात वादळवाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. पावसाने आग शमेल असे वाटत होते; परंतु वाऱ्याने आग आणखीनच भडकली. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचा एक बंब तातडीने घटनास्थळी पोहोचला. चालकाअभावी अन्य गाडय़ांना उशीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी विमानतळावर असलेल्या अत्याधुनिक अग्निशामक दलाच्या पथकाला पाचारण केले. नांदेड मनपा व विमानतळ अग्निशामक दलाच्या पथकाने तब्बल सात तास अथक परिश्रम घेऊन ही आग विझविण्यात यश मिळविले. सकाळी ७ वा. ही मोहीम पूर्ण झाली. या सॉ मिलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लाकडे होती. या आगीत ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेचे वृत्त समजल्यानंतर पोलीस उपअधीक्षक बोपेरॉय, तहसीलदार महेश वडतकर यांनी घटनास्थळी भेट दिली. आग कशामुळे लागली हे मात्र अद्यापि स्पष्ट झाले नाही.

पारा उतरला!
औरंगाबाद, १५ मार्च/प्रतिनिधी

शहर आणि परिसरात पावसाने शुक्रवारी रात्री आणि त्यापाठोपाठ शनिवारी सायंकाळीही हजेरी लावली आणि गेल्या काही दिवसांपासून चाळीसचा आकडा ओलांडू पाहणारा पारा आज पुन्हा ३४ अंशावर आला. वातावरणातील उष्मा कमी झाल्याने औरंगाबादकरांना थोडासा दिलासा मिळाला. आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. यंदा हिवाळ्यात थंडी जाणवलीच नाही. त्यामुळे उन्हाळा कडक जाणार असे अंदाज बांधले जात होते आणि झालेही तसेच. फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उन्हाळा जाणवू लागला होता. होळीबरोबरच थंडी जळते असे बोलले जाते. मात्र यंदा होळीआधीच कडक उन्हाळा होता. शुक्रवारपासून वातावरणात बदल झाला. सायंकाळपासून ढग दिसू लागले. पावसाच्या तुरळक सरी कोसळल्यामुळे तापमान ६ अंशांनी खाली आले. आगामी काही दिवस तापमान असेच ३५ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज आहे.

संदर्भानुसार समीक्षेचे मापदंड बदला - डॉ. कोत्तापल्ले
औरंगाबाद, १५ मार्च/प्रतिनिधी

साहित्य आणि समीक्षा मानवकेंद्रित असायला हवी. त्याचबरोबर बदलत्या संदर्भानुसार समीक्षेचे मापदंडही बदलायला हवेत, असे मत कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हिंदी विभागाच्या वतीने शुक्रवारी ‘आलोचना का बदलता परिप्रेक्ष्य’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या वेळी डॉ. चंद्रदेव कवडे अध्यक्षस्थानी होते. डॉ. कोत्तापल्ले म्हणाले की, भारतीय भाषेचे समीक्षाशास्त्र निर्माण व्हायला हवे. तसेच साहित्य, समीक्षा यात समाजजीवनाचे वेगवेगळ्या पातळीवरील आकलन होणे गरजेचे आहे. या वेळी डॉ. सत्यदेव त्रिपाठी यांनी आपल्या बीजभाषणात बहुलतावादाने समीक्षेसमोर मोठे संकट निर्माण केल्याचे मत व्यक्त केले. या वेळी माजी कुलगुरू डॉ. भगतसिंह राजूरकर, डॉ. चंद्रदेव कवडे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी प्रास्ताविक संयोजक डॉ. हणमंतराव पाटील यांनी केले. विभागप्रमुख डॉ. माधव सोनटक्के यांनी स्वागतपर भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधाकर शेंडगे यांनी केले, तर आभार डॉ. गणेशराज सोनाळे यांनी मानले.

दुचाकीला भरधाव मालमोटारीची धडक; चार जखमी
औरंगाबाद, १५ मार्च/प्रतिनिधी

दुचाकीला भरधाव मालमोटारीने धडक दिल्याने दुचाकीवरील चार तरुण जखमी झाले. हा अपघात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बीड मार्गावर तापी तांडय़ाजवळ पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. जखमींवर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संदीप रामचंद्र राठोड (२०), नितीन हरिभाऊ राठोड (१८) आणि काकासाहेब जनार्दन राठोड (१७) अशी या तरुणांची नावे आहेत. अपघातातील सर्व जखमी एकमेकांचे नातेवाईक आहेत. हे सर्व जण दुचाकीवरून औरंगाबादकडे येत होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालमोटारीने त्यांना जोराची धडक दिली. धडक बसल्यावर यात तिघेही दुरवर फेकले गेले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठय़ा संख्येने जमा झाले होते. तिघांनाही तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मालमोटार पेटवून देण्याची भाषा जमावात सुरू होती. मात्र वेळीच पोलीस पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.

‘वाल्मी’तील गवताला आग
औरंगाबाद, १५ मार्च/प्रतिनिधी

जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) परिसरातील गवताला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात मोठय़ा प्रमाणावर गवत आणि काही प्रमाणात झाडेही जळून खाक झाली. जोराचे वारे असल्यामुळे आग वाऱ्याच्या वेगाने फैलावत होती. अग्रिशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. दुपारी वारे काहीसे कमी झाल्यानंतर आग शांत झाल्याचे सांगण्यात आले.
आग लागण्याचे कारण समजू शकले नाही. डोंगराच्या बाजुने आग लागली होती आणि नंतर ती वाऱ्याच्या वेगाने पसरत गेली. यात जीवित आणि आर्थिक नुकसान झालेले नाही. मात्र मोठय़ा प्रमाणावर झाडे आणि रोपटय़ांना या आगीच्या झळा बसल्या आहेत.

अनाथालयात मनसेची शिवजयंती
औरंगाबाद, १५ मार्च/खास प्रतिनिधी

शिवाजीनगर व आनंदनगर या भागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवजयंती अनाथालयात जाऊन साजरी केली. सिडको एन-२ मधील भारतीय समाजसेवा केंद्रातील या अनाथालयातील मुलामुलींबरोबर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवजयंती साजरी केली.
या वेळी मनसेतर्फे या बालकांना उन्हाळी कपडे, फळे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. मनसेचे विभाग अध्यक्ष हरिभाऊ पवार, गणेश निकम, कल्याण चव्हाण, केंद्राच्या संचालिका सुनीता तगारे आदी या वेळी उपस्थित होते.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू
नांदेड, १५ मार्च/वार्ताहर

माहूर येथील शासकीय आश्रमशाळेतील सहावीत शिकणाऱ्या नितिन पांडुरंग जुगनाके (वय १३) याचा आज सकाळी संशयास्पद मृत्यू झाला. माहूर तालुक्यातील भीमपूर गौंड येथील नितिन जुगनाके आश्रमशाळेत होता. काल सायंकाळी जेवण केल्यानंतर त्याला अचानक डोकेदुखी आणि उलटय़ांचा त्रास सुरू झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला. माहूर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, नितिनचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगण्यात आले.

साप्ताहिक विवेकच्या कार्यालयाचे उद्घाटन
औरंगाबाद, १५ मार्च/खास प्रतिनिधी

साप्ताहिक विवेकला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हिरक महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. येथील प्रांत कार्यालयाचे उद्घाटन आचार्य किशोर व्यास, आमदार गोपीनाथ मुंडे आणि माजी खासदार एकनाथ ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी मराठवाडा, खान्देश विकासाच्या वाटेवर या विशेषांकाचे विमोचनही करण्यात आले. या वेळी विवेकचे संपादक रमेश पतंगे, प्रबंधक संपादक दिलीप करंबेळकर, स्वागताध्यक्ष पुखराज पगारिया, हिरक महोत्सव समितीचे अध्यक्ष अप्पा लातुरे, कार्याध्यक्ष अनिल भालेराव, सुरेश हावरे, अशोक कुकडे आदी उपस्थित होते.

निर्मलग्राम स्पर्धेत जळकोट तालुक्यातून १५ गावे
जळकोट, १५ मार्च/वार्ताहर

‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ हा मंत्र जपत जपत जळकोट तालुक्यात संपूर्ण स्वच्छता अभियान निरंतर सुरू ठेवण्याचे प्रयत्न केले जात असून निर्मलग्राम स्पर्धेत तालुक्यातून यंदा पंधरा गावांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती जळकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष राजूरकर, विस्तार अधिकारी (पं.) बी. आर. दापके व गटसमन्वयक धनंजय गुडसूरकर यांनी दिली.
बेळसांगवी, बोरगाव (खुर्द), चिंचोली, धामणगाव, हाळदवाढवणा, करंजी, कोळनूर, कोनाळी (डोंगर), कुनकी, लाळी (खुर्द), तिरुका, विराळ, वडगाव, गव्हाण ही पंधरा गावे यंदा निर्मलग्राम होण्यासाठी या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. या गावातील स्वच्छतेविषयीची संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली असून ही गावे निर्मलग्राम होण्यासाठी जी पूर्तता आवश्यक आहे, ती करण्यासाठी तालुका प्रशासन कामाला लागले आहे. या सर्व गावांमध्ये दोन हजार ९१७ कुटुंबे असून ११३९ कुटुंबांकडे शौचालये आहेत. उर्वरित १७७८ कुटुंबांनी शौचालये बांधून घेऊन त्यांचा वापर करावा यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. स्वच्छतेची ही मोहीम थंडावू नये यासाठी गटविकास अधिकारी यांनी प्रत्येक गावाकरिता संपर्क अधिकारी नेमले आहेत. डी. जे. गुडसूरकर, बी. आर. दापके, डॉ. पाटील, एस. जी. खंदारे, बी. के. नामवाड, डी. बी. नकुरे, एल. व्ही. याचावाड, डॉ. यू. जी. गायकवाड, डॉ. पी. एस. कापसे, बी. के. जाधव, डॉ. डी. एन. उटगे, डॉ. आर. एल. गुट्टे इत्यादी अधिकारी-कर्मचारी संपर्क अधिकारी म्हणून कामगिरी बजावत आहेत.

वाघोलीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात
धारूर, १५ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. संमेलनाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. वाघोळी शाळेचे सांस्कृतिक प्रमुख शेख असाहबोद्दीन लिखित ‘सावकाराचा फास’ या नाटकातून उद्बोधन केले, तर हा ‘हा गाव माझा याचे भान जरासे राहू द्या रे’ या गीतातून स्वच्छता अभियानाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाची सुरुवात ‘करावया रसिक जनांची सेवा’ या गीताने झाली. ‘रेल मे छनन् छनन् होयरे’ या गीतात प्रवासात अनेक धर्माचे लोक एकत्र आल्यास कसा संवाद साधतात याचे बोलके उदाहरण सादर केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, धनगर गीत, कोळी गीत, बाल कलाकारांकडून राजकारण्यांची फिरकी असे विविध प्रकार सादर केले. या कार्यक्रमात मीनाक्षी फुके, शिवराज गव्हाणे, धनराज फुके, सारिका गव्हाणे, रूपाली गव्हाणे, भाग्यश्री गव्हाणे, पूजा गव्हाणे, अजयकुमार सुरवसे, प्रीती थोरात, भागवत कोठुळे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

पणनच्या ४०० रोजंदारी कामगारांना पगार नाही; उपोषणाचा इशारा
परळी वैजनाथ, १५ मार्च/वार्ताहर

दि महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघातील रोजंदारी कामगारांना नोव्हेंबरपासून वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे पणन महासंघाच्या क्लार्क व सुरक्षा रक्षक असे साडेचारशे आणि जिनिंगमध्ये कामाला असलेल्या ८८० कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रश्नी १८ मार्चपासून पणन महासंघाच्या येथील विभागीय कार्यालयासमोर ऑल इंडिया कामगार संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे. परळी पणन महासंघाच्या विभागीय कार्यालयांतर्गत ५२ कापूस खरेदी केंद्रावर २००८-०९ या कापूस खरेदी हंगामात कामावर असलेल्या १५० लिपीक, ३०० चौकीदार व ८८० महिला कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून मजुरी वाटप करण्यात आलेले नाही. पगारच मिळालेले नसल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या कामगारांच्या कुटुंबीयांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहेत, असे ऑल इंडिया कामगार संघटनेचे उमेश खाडे यांनी सांगितले. त्यामुळे आपल्या वेतनासंबंधीच्या तसेच अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पणन महासंघातील सर्व कामगारांनी १८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता विभागीय कार्यालयासमोर उपोषणास उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

अवकाळी पावसाने ज्वारी उत्पादक धास्तावले
उस्मानाबाद, १५ मार्च/वार्ताहर

गेले दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने ज्वारी उत्पादक धास्तावले आहेत. पावणेतीन लाख हेक्टरवरील ज्वारीची काढणी सुरू झाली असतानाच जिल्ह्य़ात हलक्या सरी पडल्याने पीक वाचविण्यासाठी शेतकरी मळणीयंत्रांची शोधाशोध करत आहेत. काही जणांनी ज्वारी शेतात काढून ठेवल्याने त्यावर झाकण्यासाठी ताडपत्री विकत अथवा भाडय़ाने घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. या हंगामात ज्वारीचे पीक जोमात होते. निसर्गाच्या अवकृपेने हा हातीतोंडी आलेला घास काढून घेतला जाऊ नये, यासाठी शेतकरी पीक वाचविण्यासाठी धावपळ करत आहेत. या वर्षांत सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला होता. ऐन दिवाळीत मिळालेल्या तुटपुंज्या अनुदानाच्या रकमेतून कसाबसा संसाराचा गाडा ओढणाऱ्या शेतकऱ्यांनी किमान पोटापुरती ज्वारी असेल, अशी अपेक्षा ठेवली होती. पण गेल्या दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे ते पुरते धास्तावून गेले आहेत. या वर्षी जिल्ह्य़ात ज्वारी व गहू पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. पण ज्वारीच्या काढणीला गेल्या १५ दिवसांपूर्वीच सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांना आता मजुरांचीही कमतरता भासत आहे.

अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतीचे प्रचंड नुकसान
जालना, १५ मार्च/वार्ताहर

जालना व अंबड येथे काल झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट व वादळ यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी या अस्मानी संकटाने त्रस्त झाला आहे. परतूर तालुक्यातही शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काल सायंकाळी साडेपाच वाजता अचानक आभाळ भरून आले. पावसासोबतच मोठय़ा प्रमाणात गारपीटही झाली. हा पाऊस तब्बल दोन तास होता. रस्त्यावर, घरासमोर व गच्चीवर बच्चे कंपनीने गारांचा आनंद लुटला. गारपीट इतकी जोरदार होती की थोडय़ाच वेळात मैदाने व रस्त्यांवर पांढऱ्या गारांचे आच्छादन झाले होते. या गारपिटीच्या तडाख्यात काढणीसाठी उभी असलेली रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच द्राक्ष बागांचेही नुकसान झाले. आंब्याला आलेला मोहरही या गारपीटीमुळे गळून पडला असल्याने आंबा उत्पादक चिंतेत पडला आहे.

सिल्लोडमध्ये गारपिटीमुळे मेंढपाळांचे मोठे नुकसान
सिल्लोड, १५ मार्च/वार्ताहर

सिल्लोड तालुक्यात शनिवारी रात्री उशिरा गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे सारोळा (ता. सिल्लोड) शिवारात चोवीस मेंढय़ा मरण पावल्या, तर तीस मेंढय़ा गंभीर जखमी झाल्याने मेंढपाळांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती नायब तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली.
शुक्रवार व शनिवारी तालुक्यात जोरदार पाऊस होऊन शेतीमालाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी रात्री उशिरा १२ ते १ च्या सुमारास जोरदार गारा पडल्याने गारांच्या मारामुळे २४ मेंढय़ा मरण पावल्या, तर ३० मेंढय़ा जखमी झाल्या. नाशिक जिल्ह्य़ातील पाच व वैजापूर तालुक्यातील दोन मेंढपाळांनी दरवर्षीप्रमाणे सारोळा, ता. सिल्लोड येथील शेतकरी तुकाराम संपत दौड यांच्या शेतात मांगू पंढरीनाथ खरात (रा. खिर्डी), पांडुरंग काळे (रा. कासारी), गुलाब कर्नर (रा. कासारी), बळीराम कोळपे, त्र्यंबक कोळपे (रा. कुसुमतेल), नामदेव एनार, शांताराम एनार यांनी मेंढय़ा चारण्यास आणल्या होत्या. प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आला असून आर्थिक नुकसान झाल्याने भरपाईसाठी प्रकरण नाशिक विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार थोरात यांनी दिली.

मुंडे यांच्या प्रचारासाठी मोटरसायकल फेरी
परळी वैजनाथ, १५ मार्च/वार्ताहर

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी माजलगाव तालुक्यातील भा. ज. प.चे नेते अरुण इंगळे यांच्या नेतृत्वाखाली राजेगाव ते परळी वैजनाथ मोटरसायकल फेरी काढण्यात आली. सुमारे ५०० मोटारसायकलींचा समावेश असलेली ही फेरी किट्टी आडगाव, सावरगाव, माजलगाव, पाथ्रुड, नित्रुड, तेलगाव, दिंद्रुड, सिरसाळा मार्ग आजे दुपारी परळीत आली. ज्येष्ठ नेते पंडितराव मुंडे यांच्या निवासस्थानी आमदार गोपीनाथ मुंडे, पंडितराव मुंडे यांनी या फेरीचे स्वागत केले.

उद्योगपती सोनी यांना दंड व शिक्षा
जालना, १५ मार्च/वार्ताहर

जालना येथील उद्योगपती राजेश सोनी यांना धनादेश न वटल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यास्मीन देशमुख यांनी १ वर्ष कारावास व १० लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणात संतोष पन्नालाल करवा यांना मालमत्तेच्या दलालीपोटी येणे असलेल्या पैशाचा धनादेश राजेश सोनी यांनी दिला होता. संतोष करवा यांच्या मध्यस्थीने राजेश सोनी यांनी बरीच मालमत्ता विकत घेतली होती. श्री. सोनी यांनी २९ सप्टेंबर २००४ रोजी १० लाख रुपयांचा जालना पीपल्स बँकेचा धनादेश दिला होता, पण तो वटला नाही. सतीश करवा यांनी यासंदर्भात ४ ऑक्टोबरला नोटीस पाठवून चलनक्षम वस्तू कायदा कलम १३८ अन्वये फौजदारी खटला दाखल केला होता.

ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याचा अनुभव
सोनपेठ, १५ मार्च/वार्ताहर

शुक्रवारी सायंकाळपासून ढगाळलेल्या वातावरणामुळे सोनपेठकरांनी ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याचा अनुभव घेतला. दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर शुक्रवारी संध्याकाळी जोरदार वारे सुरू झाले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी तुरळक प्रमाणामध्ये पावसाच्या सरीही पडल्या. दिवसभर राहिलेल्या ढगाळ वातावरणामुळे ऐन उन्हाळ्यामध्येही सोनपेठकरांना पावसाळी वातावरणाचा अनुभव येत होता. मात्र यामुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये तापमानामध्ये घट झाली असली तरी पुढील दोन दिवसांमध्ये उन्हाचा चटका बसण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

धोंडराईत फऱ्या रोगाने पाच जनावरे दगावली
गेवराई, १५ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील धोंडराई येथे फऱ्या रोगाची लागण होऊन पाच जनावरे दगावली. आजारी जनावरांवर कोणी उपचार करावेत, यावरून दोन पशुवैद्यकीय डॉक्टरांमध्ये मारहाण झाल्याचेही उघडकीस आले. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडल्याचे वृत्त आहे. धोंडराई येथील गावकऱ्यांनी जनावरांच्या उपचारासाठी उमापूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बडे यांना बोलावले. दरम्यान धोंडराई येथील डॉक्टर बांगर जनावरांवर उपचार करीत होते. आपल्या कार्यक्षेत्रात शिरकाव केलेल्या डॉ. बडे यांना पाहताच दोघांमध्ये मारमारी झाल्याची चर्चा आहे.