Leading International Marathi News Daily
सोमवार , १६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

नजरकैद मोडून शरीफ रस्त्यावर
पाकिस्तानमध्ये निदर्शक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री
लाहोर, १५ मार्च/वृत्तसंस्था

पाकिस्तानचे विरोधी पक्ष नेते नवाझ शरीफ आणि त्यांचे धाकटे बंधू व पंजाब प्रांताचे माजी

 

मुख्यमंत्री शहाबाज शरीफ यांनी त्यांच्यावर घातलेले बंदी आदेश झुगारून पाकिस्तान शासनाविरोधात होणाऱ्या निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडले. पाकिस्तानच्या पार्लमेंटबाहेर होणाऱ्या या निदर्शनांमध्ये पाकिस्तानी जनता आणि पीएमएल-एन या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करीत शरीफ बंधूंनी त्यांच्यावर घालण्यात आलेले बंदी आदेश अवैध असल्याची पाकिस्तान शासनावर टीका केली. दरम्यान, शरीफ यांच्या पक्षाचे हिरवे झेंडे घेतलेले समर्थक, वकील मंडळी आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक झडली असून पाकिस्तानातील अस्थिर राजकीय वातावरण आता अधिकच स्फोटक बनले आहे. या निदर्शकांनी पोलिसी बळाचा निषेध करीत पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांचे लष्करी गणवेशातील छायाचित्र या निदर्शनांच्या वेळी दाखविले.
रविवारी पहाटेलाच हजारो पोलिसांनी नवाझ शरीफ यांच्या येथील मॉडेल टाऊन भागात असलेल्या घराला वेढा घातला आणि तीन दिवसांसाठी त्यांना नजरकैदेत ठेवण्याची कारवाई केली. मात्र हे बंदी आदेश झुगारून शरीफ आपल्या समर्थकांसह मोटारीत बसले व निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले. शरीफ यांचे समर्थक एवढे बेभान झाले होते की त्यांच्या बंगल्यापासून सुरू झालेल्या रस्त्यावर पार्क केलेल्या बसेसच्या काचाही त्यांनी फोडल्या. कारमध्ये बसण्यापूर्वी टीव्ही पत्रकारांशी बोलताना शरीफ यांनी ‘आता हे क्षण निर्णायक आहेत. पाकिस्तान देश वाचविण्यासाठी आता प्रत्येक पाकी तरुणाने घराबाहेर पडून देशासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे’, असे आवाहन केले. या सर्व निर्नायकी अवस्थेबद्दल अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली असून एका वर्षांपूर्वी सत्तेवर आलेले झरदारी यांचे सरकार या घडामोडींमुळे अधिकच अस्थिर होईल, अशी टीका केली आहे. आता पाकिस्तान हा आपल्या दहशतवादी विरोधी लढाईमध्ये विश्वासू साथीदार राहील अथवा नाही, याविषयीही अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
शनिवारी रात्री उशीरा अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी झरदारी आणि शरीफ यांच्याशी दूरध्वनीवरून स्वतंत्ररीत्या संपर्क साधून त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयाने दोन्ही शरीफ बंधूंना निवडणूक लढविण्यापासून अपात्र ठरविणाऱ्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील करण्याचा निर्णय झरदारी यांनी घेतला. मात्र वकीलांच्या आंदोलनात शरीफ यांनी सहभागी होण्याचा इरादा कायम केल्यानंतर त्यांच्यावर आता नजरकैदेची कारवाई करण्यात आली आहे. मात्र शरीफ यांनी हा बंदी आदेश झुगारला आहे.
तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख व माजी क्रिकेटपटू इम्रानखान आणि जमात-ए-इस्लामीचे प्रमुख काझी हुसेन अहमद यांनाही स्थानबध्द करण्याचे आदेश पाकिस्तान सरकारने जारी केले आहेत. पंजाब प्रांताचे माजी मुख्यमंत्री शहाबाज शरीफ हे लाँग मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी रावळपिंडीला पोहोचले, मात्र पोलिसांनी त्यांच्या मोटारींचा ताफा थांबविला व त्यांना ताब्यात घेतले आहे. २००७ मध्ये तत्कालिन अध्यक्ष मुशर्रफ यांनी हकालपट्टी केलेल्या न्यायाधीशांची पुनर्नियुक्ती केली जावी या मागणीसाठी वकील मंडळी आणि पीएमएल-नवाझ गटाचे कार्यकर्ते पाकिस्तानच्या पार्लमेंटबाहेर धरणे देणार आहेत. पाकिस्तानमधील राजकीय वातावरण पुन्हा कमालीचे अस्थिर झाले असून देश अराजकाच्या गर्तेत सापडण्याचा पुन्हा धोका निर्माण झाला आहे.
पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी उद्या पार्लमेंटबाहेर सुरक्षिततेच्या कारणास्तव धरणे होऊ न देण्याचा निर्धार केला आहे. या धरण्यावर बॉम्बहल्ला किंवा फिदायीन हल्ला होण्याचा धोकाही त्यांनी व्यक्त केला आहे. लाहोर येथून पोलिसांनी आज सकाळी पीएमएल-एन पक्षाच्या २० कार्यकर्त्यांना अटक केली. पक्षाचे अन्य महत्त्वाचे नेते इशाक दार, सईद रफीक आणि झुल्फिकार खोसा यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. रावळपिंडीमध्ये पोलिसांनी न्यायालयाच्या आवारात धाडी घालून शंभरहून अधिक वकीलांना ताब्यात घेतले आहे.