Leading International Marathi News Daily
सोमवार , १६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मायावती तिसऱ्या आघाडीबरोबरच; मात्र निवडणूक स्वबळावर लढणार
नवी दिल्ली, १५ मार्च/खास प्रतिनिधी

उत्तर प्रदेशात आपण स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक लढविणार आहोत. मात्र आपण तिसऱ्या

 

आघाडीबरोबरच असून निवडणुकीनंतर काँग्रेसेतर व भाजपेतर सरकार स्थापन करण्यासाठी व्यूहरचना करीत आहोत, अशी घोषणा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली. तर त्याच दरम्यान तिसऱ्या आघाडीचे प्रवर्तक असलेल्या माकपाचे सीताराम येचुरी यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अध्यक्ष असलेल्या शरद यादव यांचीच भेट घेऊन किमानपक्षी निवडणुकीनंतर ते तिसऱ्या आघाडीशी संधान बांधू शकतील का याची चाचपणी केली. या घडामोडींमुळे निवडणूक ज्वरात एकदम वाढ झाली.
गेल्या आठवडय़ात कर्नाटकमधील तुमकूर येथे तिसऱ्या आघाडीचे रणशिंग फुंकले गेले होते. मात्र त्या मेळाव्यास अद्रमुकच्या जयललिता यांच्याप्रमाणेच मायावतीही हजर राहिल्या नव्हत्या. या पाश्र्वभूमीवर येथील ताज मानसिंग या पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. उत्तर प्रदेशात आपण स्वबळावर आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असून येत्या १५ दिवसांत सर्व उमेदवार घोषित केली जातील, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीनंतर काँग्रेसेतर व भाजपेतर सरकार स्थापन करण्यासाठी तिसऱ्या आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या मदतीने आपण व्यूहनीती आखत असल्याचेही त्यांनी सांगितले. याच अनुषंगाने रात्री गुरुद्वारा रकाबगंज मार्गावरील नवीन बंगल्यात तिसऱ्या आघाडीच्या घटक पक्षांची एक भोजन बैठक झाली. जवळपास सर्व प्रमुख नेते अथवा पक्षांचे प्रतिनिधी त्यात सहभागी झाले होते.
दरम्यान, माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी आज भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अध्यक्ष शरद यादव यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. बिहारमध्ये शरद यादव यांच्याच पक्षाचे नितीशकुमार मुख्यमंत्री असून तेथे भाजपही त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी आहेत. मात्र निवडणुकीनंतर काय स्थिती असेल ते पाहून त्यांनी तिसऱ्या आघाडीला सहकार्य करावे, अशी गळ येचुरी यांनी त्यांना घातल्याचे समजते. या घडामोडींमुळे राजधानीतील निवडणुकीचा पारा आज एकदम वर गेला.