Leading International Marathi News Daily
सोमवार , १६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मनसेचा शिवसेनेला ‘दे धक्का’ कठीणच
संदीप आचार्य, मुंबई, १५ मार्च

मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागा लढण्याचे जाहीर करतानाच राज्यात मोजक्या जागा लढवून

 

जिंकण्यासाठी सर्वशक्ती पणाला लवण्याची भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर मराठी मतांचे विभाजन होऊन त्याचा फटका शिवसेना-भाजपला बसेल असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत असले तरी मुंबईसह राज्यात मनसे सेना-भाजप युतीला किंचितही धक्का लावू शकणार नाही, असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या वेळी दक्षिण मुंबईत शिवसेनेचे मोहन रावले वगळता मुंबईत युतीचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नव्हता. मात्र आता परिस्थिती बदलली असून मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी किमान चार जागी सेना-भजपचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा करिष्मा तसेच त्यांनी उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनामुळे मराठी मते मोठय़ा प्रमाणात त्यांना मिळण्याची कोणतीही शक्यता नसून शिवसेनाप्रमुख आणि मराठी माणूस हे अतुट नाते असून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलेल्या बांधणीमुळे कदाचित मुंबईतील पाच जागी युतीचा विजय होईल असा विश्वास या नेत्याने व्यक्त केला. सेनेतून नारायण राणे व राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर गेल्या तीन वर्षांमध्ये जवळपास ३१ निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळला आहे. मुंबई महापालिका, ठाणे महापालिका तसेच ठाणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी सेनेला विजय मिळाला आहे. याशिवाय ग्रामपंचायतींपासून विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये सेनेने विजय खेचून आणले आहेत. मराठीच्या मुद्दय़ापासून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला असून मराठी माणूस आक्रस्तळे नेतृत्व स्वीकारण्याऐवजी संयमी नेतृत्व पसंत करेल असा विश्वास विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला मते मिळाली म्हणून लोकसभा निवडणुकीतही तशीच मते मिळतील असे मानणे चुकीचे असल्याचे सांगून रामदास कदम म्हणाले की, पालिका निवडणुका या स्थानिक विषयांवर होत असून लोकसभा निवडणुकीत पक्ष आणि उमेदवार विजयी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मतदान होत असते. लोकसभा मतदारसंघनिहाय मनसेला मुंबईत ६० हजार ते एक लाख मते मिळाली असली तरी युतीला या प्रत्येक ठिकाणी दुप्पट मते मिळाली आहेत. मनसे हा राष्ट्रवादीची मते मोठय़ा प्रमाणात खाईल, शिवसेनेचे एक मतही त्यांना मिळू शकणार नाही, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला आहे. मुंबईसह राज्यात सपा आणि बसपा हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मते काही प्रमाणात घेतील. या पाश्र्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक येथे मराठी मतांचे मनसे व युतीत विभाजन होईल अशी अटकळ बांधणे चुकीचे असून युतीची एकही जागा मनसे पाडू शकणार नाही, हे निवडणुकीत दिसून येईल, असेही कदम म्हणाले. मुंबई महापालिका निवडणुकीच्यावेळी सेलिब्रेटीजना तिकीट देण्याची भूमिका घेणारे राज ठाकरे आता लोकसभेच्यावेळी सेलिब्रेटीज अथवा बाहेरचा उमेदवार देणार नाही, अशी घोषणा करतात. राज यांची ही घोषणा म्हणजे ‘कोल्ह्याला द्राक्षे अंबट’ या उक्तीची आठवण करून देणारी आहे, असे मतही सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले.