Leading International Marathi News Daily
सोमवार , १६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आनंद यादव यांची तुकारामचरणी माफी
राजीनाम्याच्या मागणीवर वारकरी संप्रदाय ठाम
देहूगाव, १५ मार्च / वार्ताहर

‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह लेखन केल्याबद्दल ज्येष्ठ

 

साहित्यिक व महाबळेश्वर येथील नियोजित संमेलनाचे अध्यक्ष डॉ.आनंद यादव यांनी आज सकाळी देहू येथे तुकोबांच्या चरणी माथा टेकून झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. मात्र वारकरी संप्रदाय त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहे. महाबळेश्वर येथे २१, २२ आणि २३ मार्चला होणाऱ्या साहित्य संमेलनात ‘गाथा पारायण’ करण्याचा इशारा संत तुकाराम महाराज देवस्थान व वारकरी संप्रदायाने दिला आहे. संमेलन व्यवस्थित पार पडावे, कुठलाही वाद होऊ नये या भूमिकेतून यादव यांनी आज देहूची वारी केली.मात्र वारकरी मंडळींचे त्याने समाधान झाले नाही,संमेलन अध्यक्षपदाचा राजीनाम्याचा त्यांचा आग्रह कायम आहे. यादव यांनी राजीनामा दिला नाही तर संमेलन होऊ देणार नाही, असा इशाराही वारकऱ्यांनी दिला आहे. आज सकाळी यादव आपली पत्नी, कन्या, नातेवाईक , साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीचे उपाध्यक्ष आमदार मदन भोसले, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी.एम. बावळेकर यांच्यासह देहूत दाखल झाले.यावेळी संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष बापूमहाराज मोरे- देहूकर, व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष बंडातात्या कराडकर, वारकरी फडकरी संघटनेचे अध्यक्ष दादामहाराज शिरवळकर, महादेव महाराज शिवणीकर, देवस्थानचे विश्वस्थ नितीन मोरे, विश्वजीत मोरे, माजी विश्वस्त माणिक महाराज मोरे, संभाजीमहाराज मोरे यांच्यासह अनेक वारकरी उपस्थित होते. सुमारे दोन तास आपल्या मोटारीत बसून परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर यादव दोनच्या सुमारास आमदार भोसले यांच्या मध्यस्थीने आपला माफीनामा महाराजांच्या चरणी ठेवण्यासाठी उतरले. त्यांनी गोपाळपुरा येथील वैकुंठगमन मंदिरात महाराजांच्या चरणाचे दर्शन घेऊन झाल्या चुकीबद्दल माफी मागितली. त्यानंतर उपस्थितांशी चर्चा करण्यासाठी ते गेले. मात्र, वारकरी संप्रदायाने त्यांच्याशी कोणत्याही मुद्दय़ावर चर्चा करणार नसून त्यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे, असे ठणकावून सांगितले. या चर्चेच्या वेळी त्यांची माजी विश्वस्त माणिक महाराज मोरे व उपस्थितांशी शाब्दिक चकमक उडाली.