Leading International Marathi News Daily
सोमवार , १६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

काँग्रेसच्या जागा कमी करण्यासाठी पवारांचा नवा डाव
मुंबई, १५ मार्च / खास प्रतिनिधी

शिवसेना-भाजप युतीचे जागावाटप पूर्ण झाले असले तरी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जागावाटपाची

 

गाडी अद्यापी रुळावर येऊ शकलेली नाही. दोन्ही पक्ष ताठर भूमिका सोडण्यास फारसे तयार नाहीत. राष्ट्रवादीने त्यांच्यासाठी अनुकूल असलेल्या सर्व जागा सोडवून घेतल्यानंतर काँग्रेसच्या ताब्यातील जागा मित्र पक्षांसाठी सोडाव्यात असा डाव टाकून शरद पवार यांनी काँग्रेसच्या जागा कमी करण्याची खेळी केली आहे.
जागावाटपात काँग्रेसच्या कोटय़ातील शिर्डी, मुंबई उत्तर-पश्चिम, अकोला, रामटेक व जालना मतदारसंघांवरून वाद सुरू आहे. रामदास आठवले यांच्यासाठी शिर्डीची जागा काँग्रेसने सोडावी, अशी सूचना पवारांनी केली आहे. शिर्डीच्या बदल्यात दुसरी आमच्या पसंतीची जागा मिळावी, अशी अपेक्षा काँग्रेसने केली आहे. त्याला राष्ट्रवादीची तयारी नाही. शिर्डीबद्दलचा निर्णय काँग्रेसनेच घ्यावा, असे सांगून आठवले यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची करणार नाही, असेच सूचित केले. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्याकरिता आठवले, प्रकाश आंबेडकर, समाजवादी पक्ष व सुलेखा कुंभारे यांच्यासाठी जागा सोडव्यात, असे मत पवारांनी आज नगरमध्ये बोलताना व्यक्त केले. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी अकोल्याची जागा सोडण्याची काँग्रेसची तयारी आहे. मात्र उत्तर-पश्चिम मुंबईची जागा समाजवादी पक्षाला सोडण्याची पवारांची मागणी काँग्रेसला मान्य नाही. रामटेकमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक यांना उभे करण्याचे काँग्रेसमध्ये घाटत आहे. नेमकी ही जागा सुलेखा कुंभारे यांच्यासाठी सोडावी, अशी पवारांची सूचना आहे. एकूणच राष्ट्रवादीने त्यांच्यासाठी अनुकूल असलेल्या जागा चर्चेतून सोडवून घेतल्या आहेत. काँग्रेसच्या हक्काच्या जागांवर मित्र पक्षांना पुढे करून काँग्रेसच्या जागा कमी करण्याचा डाव पवारांनी टाकला आहे. जालन्यावर राष्ट्रवादीने दावा केला असला तरी त्याबदल्यात उस्मानाबादची जागा मिळावी ही काँगेसची मागणी मान्य करण्यास राष्ट्रवादीची तयारी नाही.
काँग्रेसचे नेतृत्व २६ व २२ जागांचे सूत्र मान्य करण्यास तयार आहे. तसे होणार असल्यास काँग्रेसच्या कोटय़ातील तीन जागा मित्र पक्षांना सोडायला लावून काँग्रेसच्या जागा कमी करण्याचा डाव पवारांनी टाकला आहे. जागावाटपाची चर्चा अजून सुरू असून येत्या तीन-चार दिवसांमध्ये जागावाटपाला मुर्त स्वरूप मिळेल, अशी शक्यता आहे.
पंतप्रधानपदसाठी उत्सुक असल्याचे दिलेले संकेत, डाव्या आघाडीला महत्त्व देणे तसेच शिवसेनेबरोबर सुरू असलेल्या गुफ्तगूमुळे काँग्रेसमध्ये पवारांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया आहे. राष्ट्रवादीच्या या अशा भूमिकेमुळे त्यांच्याबरोबर जाण्यापेक्षा स्वबळावर लढावे, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये वाढीस लागला आहे. गेल्या आठवडयात नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील नेत्यांनी ही बाब काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कानावर घातली. म्हणूनच पवारांनी नगरमध्ये बोलताना अशी मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा उल्लेख शक्तिशाली नेते असल्याचा केला. त्यांचा रोख अर्थातच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर होता.
काँग्रेसच्या नवी दिल्लीतील नेतृत्वाने यंदा राष्ट्रवादीला मुक्तवाव दिलेला नाही. प्रत्येक वेळी राष्ट्रवादीच्या मागण्यांपुढे झुकणाऱ्या काँग्रेसने पहिल्यांदाच पवारांच्या विरोधात काहीशी आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळेच जागावाटपाचे घोडे गेले महिनाभर अडले आहे. २००४च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अवघ्या दोन आठवडय़ांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली होती, याकडे काँग्रेसचे नेते लक्ष वेधीत आहेत.