Leading International Marathi News Daily
सोमवार , १६ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पाकिस्तान यादवीच्या उंबरठय़ावर!
नवाझ शरीफ यांच्या ‘लाँग मार्च’चे इस्लामाबादकडे कूच
इस्लामाबाद, १५ मार्च/वृत्तसंस्था
झरदारी सरकार उखडून टाका; शरीफ यांचे आवाहन
अनेक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी ‘लाँग मार्च’मध्ये सामील
पाकिस्तानच्या राजधानीला लष्करी छावणीचे स्वरूप
पाकिस्तानात गेले काही दिवस असलेल्या वादळी आणि अनिश्चिततेच्या वातावरणाने आज एक

 

निर्णायक वळण घेतले. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांच्यावर बजावण्यात आलेला बंदीहुकूम मोडून लाहोरहून इस्लामाबादकडे कूच केले. सरकारला दिलेल्या या उघड आव्हानात त्यांना अक्षरश: हजारो समर्थकांनी सक्रिय साथ दिली. त्याच वेळी पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या पोलीस प्रमुखांसह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनीही आपापल्या पदांचे राजीनामे देऊन शरीफ यांच्या ‘लाँग मार्च’मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानातील राजकीय वातावरण यादवीसदृश्य स्थितीत जाऊन पोहोचले आहे. या पाश्र्वभूमीवर उद्या, सोमवारी पार्लमेंटसमोर धरणे धरण्याचा शरीफ यांचा निर्धार यशस्वी होतो अथवा त्याला हिंसक वळण लागून त्याचे पडसाद देशभर उमटतात किंवा अन्य काही अनुचित वळण लागते याकडे भारत व अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत झरदारी पदत्याग करणार नाही. तसेच विद्यमान परिस्थितीचा फायदा घेत लष्कर सत्ता काबीज करण्याचीही शक्यता नाही, असे झरदारी यांच्या गोटातून सांगण्यात आले.
उद्या, सोमवार १६ मार्च रोजी इस्लामाबादमध्ये पार्लमेंटसमोर धरणे धरण्याचा आणि त्यासाठी लाहोरहून ‘लाँग मार्च’ काढण्याचा निर्धार नवाझ शरीफ यांनी घोषित केला आहे. तर हा लाँग मार्च मोडून काढण्याचा आणि त्यासाठी वेळ पडल्यास शरीफ यांना अटक करण्याचा पण सरकारने केला होता. त्यानुसार शरीफ यांना लाहोरमध्ये त्यांच्या घरीच अटकेतही ठेवण्यात आले होते. परंतु शरीफ यांनी एकप्रकारे सरकारच्या अधिकारांनाच आव्हान देत मॉडेल टाऊनमधील आपल्या घराबाहेर रस्त्यावर पाऊल ठेवले. त्यांच्या या ‘सविनय कायदेभंगा’ने त्यांच्या हजारो अनुयायांना आणि ‘पाकिस्तान मुस्लिम लीग - नवाझ’ या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जणू मोठे बळ मिळाले आणि त्यांनीही या लाँग मार्चमध्ये सक्रिय सहभाग घेतला. परिणामी पंजाब प्रांतात अनेक ठिकाणी सरकारचे पोलीस अथवा सैनिक आणि निदर्शक यांच्यात दिवसभर चकमकी झडत होत्या.
नवाझ शरीफ यांना वकील आणि सामान्य जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असताना दुसरीकडे सरकार, सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टी व विशेषत: अध्यक्ष आसिफ अली झरदारी मात्र अधिकाधिक एकटे पडत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यातच अनेक पोलीस व मुलकी अधिकारीही आपापल्या पदांचे राजीनामे देऊन शरीफ यांना जाऊन मिळत असल्याच्या बातम्या येत असल्याने झरदारी आणि सरकारच्याही भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सरकारने आपल्याला केलेली अटक ही बेकायदा असल्याचे घोषित करीत नवाझ शरीफ यांनी आपल्या समर्थकांच्या हृदयाला हात घालणारे भावुक भाषण करीत वातावरण पेटविले. ही घडी निर्णायक आहे. १९४७ नंतर पाकिस्तानात प्रथमच अशी परिस्थिती अवतरली असून देशाला आज तुमची गरज आहे, असे आवाहन त्यांनी झेंडे फडकाविणाऱ्या आणि घोषणा देणाऱ्या हजारो अनुयायांना केले. झरदारी यांना हुसकावून लावा, असा आदेशही त्यांनी अनुयायांना दिला. पाकिस्तान लष्कर अथवा मुलकी हुकुमशहाच्या हातात ओलीस म्हणून राहू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी झरदारी यांना दिला.