Leading International Marathi News Daily

सोमवार , १६ मार्च २००९

प्रादेशिक

सरकारी नोकऱ्यांमध्ये अपंगांची १६५५ राखीव पदे रिकामीच!
मुंबई, १५ मार्च / प्रतिनिधी

राज्य सरकारचे २७ विभाग, शासकीय उपक्रम, महामंडळे आणि अनुदानित संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षणानुसार अपंगांसाठी राखीव असलेल्या एकूण ९,२७ जागांपैकी ९,१०४ जागा आत्तापर्यंत भरल्या गेल्या आहेत व अद्यापही १,६५५ जागा भरायच्या शिल्लक आहेत, अशी माहिती सरकारतर्फे शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयास दिली गेली. समाजाच्या मुख्य प्रवाहात अपंगांना बरोबरीच्या न्यायाने सहभागी होता यावे यासाठी केंद्र सरकारने १९९६ मध्ये केलेल्या कायद्यातील इतर अनेक कल्याणकारी तरतुंदींपैकी तीन टक्के आरक्षण ही एक प्रमुख तरतूद आहे. एक दशक उलटले तरी राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नाही, अशी तक्रार करणाऱ्या अनेक अपंगमित्र संघटना व व्यक्तींनी केलेल्या जनहित याचिका प्रलंबित आहेत.

अपंग संस्था महासंघाचे धरणे
मुंबई, १५ मार्च/प्रतिनिधी

आपल्या विविध मागण्यांची पूर्तता करून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य अपंग संस्था महासंघा’तर्फे कालपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अपंग विकास आणि पुनर्वसनाच्या क्षेत्रात राज्याच्या कानाकोपऱ्यात काम करणाऱ्या सुमारे ७०० स्वयंसेवी संस्थांना महाराष्र्ट् शासन अनुदान देत असते. मात्र त्यासाठी या संस्थांना करावी लागणारी धडपड आणि अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींची शासनाकडे तड लावण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य अपंग संस्था महासंघा’ची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व संस्थांपुढील महत्त्वाची समस्या म्हणजे अपंगांसाठीच्या विशेष शाळांमधील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या.

‘असंभव’मध्ये प्रभावळकर'
मुंबई, १५ मार्च / प्रतिनिधी

झी मराठीवरील ‘असंभव’ या मालिकेत आता लवकरच अभिनेते दिलीप प्रभावळकर एका भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर येत आहेत. काही वर्षांपूर्वी झी मराठीवर प्रसारित झालेल्या ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेतील दिलीप प्रभावळकर यांची ‘टिपरे आजोबा’ ही भूमिका खूप गाजली होती. आता दीर्घ कालावधीनंतर प्रभावळकर हे पुन्हा छोटय़ा पडद्यावर परतत आहेत.‘असंभव’ मालिकेत प्रभावळकर एका नव्या भूमिकेत दिसणार असून त्यांची ही भूमिका मालिकेतील अनेक असंभव गोष्टी संभव करून दाखवणार आहेत. ‘असंभव’मालिकेने सहाशे भागांचा टप्पा पार केला असून मालिकेचे कथानक एका गूढ वळणावर येऊन थांबले आहे. ‘असंभव’ मालिकेत लवकरच प्रभावळकर हे या भूमिकेद्वारे दाखल होत आहेत. ते जे पात्र रंगवत आहेत, त्याची पूर्वसूचना मालिकेतील सुलेखाला मिळते. त्यामुळे ती अस्वस्थ झालेली आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार त्याचा उलगडा लवकरच मालिकेत होणार आहे.

न्हावाशेवा-शिवडी सेतूलाही आर्थिक मंदीचा फटका
एमएमआरडीए केंद्राकडे आर्थिक सहकार्य मागणार!
मुंबई, १५ मार्च / प्रतिनिधी

सध्या सुरू असलेल्या जागतिक मंदीच्या लाटेचा फटका मुंबईतील अनेक प्रकल्पांना बसत असून न्हावाशेवा-शिवडी या सागरी सेतूमार्गासाठी तसेच वरळी-हाजीअली मार्गासाठी कोणतीही कंपनी पुढे येत नाही. यामुळे केंद्र सरकारकडे निधीची मागणी करण्यात यावी अशी मागणी एमएमआरडीए व राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत करण्यात आली.

नटश्रेष्ठ भालजी पेंढारकर यांना जीवनगौरव प्रदान
मुंबई, १५ मार्च/नाटय़-प्रतिनिधी
‘नटश्रेष्ठ’ प्रभाकर पणशीकर यांच्या नावे देण्यात येणारा महाराष्ट्र शासनाचा ‘रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ संगीत रंगभूमीवरील नटश्रेष्ठ भालचंद्र पेंढारकर यांना आज प्रदान करण्यात येत आहे, हा एक मणिकांचनयोगच आहे. गेल्या तीन वर्षांत अण्णांना चतुरंग प्रतिष्ठानच्या पुरस्कारासह हा तिसरा जीवनगौरव पुरस्कार मिळत आहे. त्यामुळे त्यांनी या पुरस्कारांची हॅटट्रिक साधली आहे. ‘ललित कलादर्शसारख्या भारतीय रंगभूमीवरील शतायुषी नाटय़संस्थेची ६७ वर्षे धुरा वाहणारे अण्णा हे संगीत रंगभूमीचे व्रत निष्ठेने जोपासणारे कर्मठ कर्मयोगी आहेत,’ असे उदगार नाटय़संमेलनाध्यक्ष रामदास कामत यांनी काढले.

बनावट नोटांप्रकरणी दोन महिलांना अटक
कल्याण, १५ मार्च/वार्ताहर
एक हजाराच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या बंगालच्या मन्सुराबीबी लालबाबु शेख (३८), नाजीमा दाऊद शेख (१९) या दोन महिलांना महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गजाआड केली आहे. शिवाजी चौकात मुकेश साळवी हा फुटपाथवर कॉस्मेटिक सामान विकण्याचा व्यवसाय करतो. मन्सुराबीबी व नाजीमा या दुकानात आल्या व त्यांनी ८० रुपयांच्या सहा जोड बांगडय़ा खरेदी करून एक हजार रुपयांची नोट दिली. तेव्हा सुट्टे पैसे नसल्याने मुकेशने जितेंद्र भोईर यांच्याकडून पैसे घेतले. सदर नोट भोईर यांनी निरखून पाहिली असता या नोटेवरील गांधीजींच्या फोटोमध्ये तफावत आढळल्याने त्यांनी ती नोट साळवी यांना परत दिली. नंतर या दोघांनी सदर महिलांना पोलिसांच्या हवाली केले.

रेल्वेतून उडी मारण्यास भाग पाडणाऱ्याचा शोध
मुंबई, १५ मार्च / प्रतिनिधी
धारदार शस्त्राचा धाक दाखवून एका १७ वर्षीय तरुणीला चालत्या रेल्वेतून उडी मारण्यास भाग पाडणाऱ्या तरुणाचा रेल्वे पोलीस शोध घेत आहेत. या तरुणीला सीसीटीव्ही फूटेज पाहून सदर तरुणाला ओळखण्यास सांगितले आहे. तो दादर स्थानकात डब्यात चढल्याचे तिचे म्हणणे असून, आमच्याकडे दादर आणि मुंबई सेंट्रल स्थानकातील सीसीटीव्ही चित्रण आहे. त्यावरुन त्याची ओळख पटण्यास मदत होईल. मात्र ही तरुणी अद्याप त्यासाठी राजी नसल्याचे मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. राणे यांनी सांगितले. ही तरुणी वापी येथे एक धार्मिक समारंभ आटोपून शुक्रवारी सौराष्ट्र एक्स्प्रेसने घरी परतत असताना हा प्रकार घडला. दादर येथे अज्ञात तरुणाला महिला डब्यातून उतरण्यास सांगितले असता, त्याने धारदार शस्त्राचा धाक दाखवून धमकावले. त्यामुळे घाबरुन आपण गाडीतून उडी मारल्याचे या तरुणीचे म्हणणे आहे. त्यावेळी किरकोळ जखमी झालेल्या या तरुणीवर एका खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर शनिवारी तिला घरी पाठविण्यात आले होते.

डंपरच्या धडकेने तरुणीचा मृत्यू
मुंबई, १५ मार्च / प्रतिनिधी

डंपरच्या धडकेने प्रेरणा मोटेमल (२४) या तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घाटकोपर येथे घडली. डोंबिवली येथे राहणारी प्रेरणा ही तिची मैत्रीण आरतीसह घाटकोपर येथे दुचाकीवरून जात असताना सातारा को. ऑप. बँकेसमोर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका डंपरने उडवून डंपर चालक फरार झाला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली प्रेरणा गंभीर जखमी झाल्याने तिचा रूग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञात डंपर चालकाविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.

स्काय वॉकविरोधात आज मुलुंड बंद
मुंबई, १५ मार्च / प्रतिनिधी

मुलुंड पश्चिम येथे बांधण्यात येणाऱ्या स्काय वॉकमुळे पादचाऱ्यांची सोय होण्यापेक्षा गैरसोयच जास्त होणार असल्याने स्काय वॉकचे काम थांबवावे, या मागणीसाठी मुलुंडमधील व्यापारी, नागरिकांनी उद्या १६ मार्च रोजी 'मुलुंड बंद' चे आवाहन केले आहे. एमएमआरडीएचा मुलुंड पूर्व व पश्चिम येथे स्काय वॉक बांधण्याचा प्रस्ताव आहे. स्थानिक नागरिकांनी स्कायवॉक विरोधात सह्यांची मोहिम राबविली असून १६ मार्च रोजी मुलुंड बंदचे आवाहन केले आहे.