Leading International Marathi News Daily

सोमवार , १६ मार्च २००९

मढीत कानिफनाथांच्या यात्रेत भाविकांनी मोठय़ा संख्येने दर्शन घेतले.

कानिफनाथांच्या जयघोषाने मढी दुमदुमली
पाथर्डी, १५ मार्च/वार्ताहर

कानिफनाथांचा जयघोष, तसेच रेवडय़ांची मुक्त उधळण करीत भाविकांनी रखरखत्या उन्हात मढी येथील कानिफनाथांच्या समाधीचे आज दर्शन घेतले. देवस्थान समितीने दर्शनासाठी या वेळी वेगळी व्यवस्था केल्याने मुख्य मंदिरावर नेहमीप्रमाणे गोंधळ न उडता भाविकांचे सुलभतेने दर्शन झाले.

‘राजकीय आरक्षण मागू नका’
शरद पवार यांचा मेटे यांना सल्ला

नगर, १५ मार्च/प्रतिनिधी

शैक्षणिक, आर्थिक आरक्षण मिळणे फारसे अवघड नाही. मात्र, राजकीय आरक्षण मागू नका असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षण समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. सुमारे पाऊण तास चाललेल्या या चर्चेत त्यांनी आरक्षणवाद्यांची समजूत काढली.

शब्दार्थाच्या गमतीजमती
सतराव्या शतकाच्या मध्यावर इंग्लंडमध्ये स्टुअर्ट घराण्याचा दुसरा चार्ल्स राज्य करीत होता. त्याला मूळबाळ नव्हते. त्याच्यानंतर गादीवर कोणी यायचे याची चर्चा सुरू झाली. खरंतर त्याचा धाकटा भाऊ वारसाहक्काने गादीवर येऊ शकत होता. पण तो रोमन कॅथॉलिक असल्याने त्याला तो हक्क मिळू नये म्हणून पार्लमेंटमध्ये ‘एक्सक्लुजन’ म्हणजे ‘वगळणे बिल’ आणले गेले.

गारपिटीच्या तडाख्याने शेतकरी उद्ध्वस्त
अडीच हजार हेक्टर क्षेत्रातील पीक वाया

राहाता, १५ मार्च/वार्ताहर

प्रवरा परिसरातील १५ ते २० गावांना शनिवारी संध्याकाळी गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला. सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील उभ्या पिकांचे नुकसान झाले, तसेच काही ठिकाणी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली. हातातोंडाशी आलेले पीक अशा प्रकारे वाया गेल्याने शेतकरी पुरता कोलमडून पडला.दरम्यान, अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांना दिल्या. त्यानुसार आज महसूल व कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी गावोगावी पाहणी करून पंचनाम्याचे काम सुरू केले.

अपंगांच्या विकासासाठी नगरमध्ये अकादमी स्थापणार - दीपा मलिक
नगर, १५ मार्च/प्रतिनिधी

अपंग व्यक्तींचा सर्वागीण विकास व्हावा, यासाठी मार्गदर्शन करणारी अपंग अकादमी शहरात सुरू करण्याचा मानस असून, यासाठी उद्योजक, दानशुरांचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय पॅरालम्पिक खेळाडू दीपा मलिक यांनी केले.नवी दिल्लीत राष्ट्रीय अ‍ॅडव्हेंचर बाईक शो ‘कॅस्ट्रोल मोस्ट पॅशनेट बायकर हंट’चे उद्घाटन मलिक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. नाशिक-त्र्यंबकेश्वर-नाशिक असा ५५ किलोमीटरचा मोटारसायकल प्रवास करीत श्रीमती मलिक यांनी नुकतेच दुसरे वर्ल्ड लिम्का रेकॉर्ड नोंदविले. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

भटक्या विमुक्तांकडून विखेंच्या नावाचा आग्रह
राहाता, १५ मार्च/वार्ताहर

नगर लोकसभा मतदारसंघातून खासदार बाळासाहेब विखे यांना उमेदवारी देण्याची मागणी प्रदेश काँग्रेसप्रणीत भटक्या विमुक्त जाती-जमाती विभागाच्या वतीने मुंबईतील बैठकीत करण्यात आली. संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आमदार धोंडीराम राठोड व प्रदेश काँग्रेसचे नेते महादेव शेलार यांच्या उपस्थितीत या बाबतचा करण्यात आला. भटक्या विमुक्त जाती-जमाती विभागाचे नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र खेमनर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आमदार धोंडीराम राठोड, महादेव शेलार, आमदार सुभाष चौहान यांची भेट घेऊन विखे यांनाच उमेदवारीची मागणी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनाही निवेदन देण्यात आले. मुंबईतील बैठकीला संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खेमनर, अशोक कोळेकर, युवराज चितळकर, यमनाजी आढाव, सुरेश आव्हाड, संजय शेळके, गोविंद कुटे आदी उपस्थित होते.

वादळी पावसाने आश्वी परिसरातील गावांचा वीज, पाणीपुरवठा विस्कळित
राहाता, १५ मार्च/वार्ताहर

आश्वी परिसरात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने खंडित झालेला वीजपुरवठा आज रात्रीपर्यंत सुरळीत झाला नव्हता. बाभळेश्वर ते आश्वी या वीज वितरण कंपनीच्या मुख्य वाहिनीवर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याने आश्वी परिसरातील १० ते १५ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी नागरिकांचे हाल झाले. आश्वी येथील वीज उपकेंद्राला बाभळेश्वर येथून वीजपुरवठा करण्यात येतो. शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे बाभळेश्वर ते आश्वी वीजवाहिनीवर अनेक ठिकाणी झाडे पडली. वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक गावांच्या सार्वजनिक पाणीयोजना बंद होत्या. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुख्य वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीवरील अडथळे दूर करण्यात आल्याने आश्वी येथील उपकेंद्रात वीजपुरवठा सुरू झाला. परंतु उपकेंद्रातील वायरिंग जळाल्याने परिसरातील गावांना सायंकाळपर्यंत वीजपुरवठा होऊ शकला नाही. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम वीज वितरण कंपनीचे कर्मचारी करीत होते. आश्वी परिसरातील वीजपुरवठा रात्रीच्या वेळी खंडित झाल्यास केवळ अधिकारी व कर्मचारी निवासी राहत नसल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागते.

महिलांनी निर्णयक्षम बनावे - नागवडे
श्रीगोंदे, १५ मार्च/वार्ताहर

महिलांनी न्यूनगंड बाजूला ठेवून राजकारणासह समाजकारणात सहभाग घ्यावा. पदाधिकारी महिलांनी स्वतला अबला न समजता प्रशासन चालवावे, असे आवाहन अनुराधा नागवडे यांनी केले. जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडिया लाईफ इन्शुरन्सच्या वतीने तालुक्यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महिलांचा गौरव समारंभ आयोजित केला होता. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून नागवडे बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रतिभा पाचपुते होत्या. यावेळी सभापती अनिता शिंदे, माजी सभापती लता पाचपुते, तसेच अनुराधा जगताप, संगीता खामकर, तसेच कंपनीचे एस. एल. नरसिंहन, श्रीकृष्ण पणके, भिवराज मडके हे अधिकारी उपस्थित होते. नागवडे म्हणाल्या की, घर सांभाळून संस्कृती जतन करणारी महिला कोणतीही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू शकते. पुरुषांच्या बरोबरीने शहरात आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत.

हुंडेकरी मोटर्स आयोजित क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
नगर, १५ मार्च/प्रतिनिधी

हुंडेकरी मोटर्स आयोजित दुसऱ्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करीमभाई हुंडेकरी यांच्या हस्ते झाले. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अरुण जगताप, उद्योजक प्रकाश फिरोदिया, संजय बोरा, डॉ. विजय भंडारी, ब्रिजलाल सारडा, अशोक बाबर आदी या वेळी उपस्थित होते.
नगर महाविद्यालयाच्या मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्य़ातील २३ संघ सहभागी झाले आहेत. सामने प्रत्येकी ४० षटकांचे असतील. विजेत्या संघास २१ हजार रुपये रोख व फिरता चषक, तर उपविजेत्यास १५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. दि. ६ एप्रिलपर्यंत स्पर्धा चालणार आहेत. बाळासाहेब पवार यांनी प्रास्ताविक, तर माणिक विधाते यांनी सूत्रसंचालन केले. वसीम हुंडेकरी यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गणेश गोंडाळ, भरत पवार, अजय कविटकर, योगेश म्हसे, नीलेश पटेल आदी प्रयत्नशील आहेत.

‘आनंद यादव यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा न दिल्यास संमेलन उधळू’
नगर, १५ मार्च/प्रतिनिधी

महाबळेश्वर येथ होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा आनंद यादव यांनी राजीनामा न दिल्यास संमेलन उधळून लावण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राज्य संपर्कप्रमुख संभाजी दहातोंडे यांनी दिला. महासंघाची आज ओम गार्डन येथे बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांनी लिहिलेल्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीत संत तुकारामांबद्दल अवमानकारक उल्लेख आहे. यादव यांनी नैतिकतेचे भान ठेवून अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; अन्यथा संमेलन उधळून लावण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. बैठकीस महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी डौले, गंगाराम बोरुडे, सचिव रमेश बोरुडे, सुनील चौधरी, जालिंदर ढोकणे, सयाराम बानकर, रावसाहेब मरकड आदी उपस्थित होते.

अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी एस. वीरेश प्रभू रूजू
नगर, १५ मार्च/प्रतिनिधी

नगरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी मालेगाव येथील सहायक अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांची नियुक्ती झाली. त्यांनी आज पदाची सूत्रे हाती घेतली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेश पाटील यांच्या रिक्त झालेल्या जागेवर प्रभू रूजू झाले. ते आयपीएस असून, मूळचे कर्नाटकातील आहेत. सन २००५मध्ये त्यांनी भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला. आज पहिल्या दिवशी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सभेच्या बंदोबस्तावर त्यांनी देखरेख केली.